गेल्या पोस्टमध्ये, आपण होतो दिरांग ला! तिथला सुप्रसिद्ध, सुंदर सूर्योदय देखील आपण पाहिला होता. निसर्गरम्य दिरांग शहराच्या सौंदर्यामुळे आमच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या आणि आम्ही उत्सुकतेने से ला पास दिसण्याची वाट पाहत होतो.
तिबेटियन भाषेत ला म्हणजे पास. त्यामुळे खरे तर नुसते से ला म्हणणे पुरेसे आहे! मात्र ह्याचा उल्लेख सर्वत्र से ला पास असाच केलेला आढळतो.
अरुणाचल मधील वाहन जाण्याजोग्या सर्वात उंच रस्त्यांपैकी हा एक रस्ता असल्याने, तुमचा प्रवास खूपच रोमहर्षक होतो. तवांग ला बाकी भारताशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने संरक्षणाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता खूपच महत्वाचा आहे.
समुद्रसपाटीपासून अंदाजे 13,700 फूट उंचीवर, आपण अरुणाचलच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग आणि तवांग दरम्यानच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडतो. हवामान थंड असले आणि बर्याच वेळा रस्ता बर्फाच्छादित असला तरी बीआरओ (सीमा रस्ता संस्था) हा रस्ता प्रवासासाठी खुला राहील यासाठी खूप प्रयत्न करते. वर्षाकाठी, फक्त काही वेळा, तुफान बर्फवृष्टीमुळे, मुसळधार पाऊस पडल्याने किंवा दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होतो.परंतु रहदारीसाठी रस्ता खुला व्हावा म्हणून दुरुस्त करण्यासाठी बीआरओ सर्व प्रयत्न अगदी त्वरित करते .
से ला पासला जाताना चारदर तवंग रस्ता |
हा रस्ता एनएच 13 चा एक भाग आहे आणि मला तो तुम्हाला Google नकाशात दाखवायला आवडेल. म्हणजे तो रस्ता कसा आहे हे आपल्याला कोणतेही वर्णन न लिहितासुद्धा नीटच कळेल!
भारत सरकारने तवांग पर्यंत एक बोगद्यातून रस्ता तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला असून, तो २०२२ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळेची बचत होईल. हा बोगदा पूर्ण झाल्यावर, तो रस्ता पाऊस आला, बर्फ पडला तरी वर्षभर सुरु राहील आणि तवांगशी सतत संपर्कात राहता येईल.
जेव्हा भूभाग खूपच कठीण आणि दऱ्याखोऱ्यानी बनलेला असेल तेव्हा रस्ते तयार करणे सोपे काम नाही. से ला तलावाजवळील से ला स्मारक, आपल्याला रस्ते तयार करताना आलेल्या अडचणी, त्या साठी धारातीर्थी पडलेले शिपाई याबद्दल सांगते.
इथे आहे अरुणाचल प्रदेश मधील सर्वात सुंदर तलावांपैकी एक तलाव- से ला तलाव.
बर्फाचे तरंग |
📷 Girish Tilak |
अनिवार्य फोटो! 📷Girish Tilak |
ह्या फोटोतल्या स्मितहास्यावर जाऊ नका. हे फक्त फोटोपुरते आहे! हवा खूप थंड होती. अंगात हुडहुडी भरत होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असल्याचे श्वास घेताना जाणवत होते.
📷 Girish Tilak |
तलावाभोवती चालण्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे. पण इतक्या थंड हवेत कोणाचीच त्या रस्त्यावरून जाण्याची हिंमत होत नव्हती!!
या फोटोमध्ये आपण बर्फाच्छादित पर्वत शिखरे आणि वळणा वळणाचे रस्ते पाहू शकता.
या तलावाचे, ह्या भागातील बौद्ध लोकांसाठी, लामांसाठी खूपच आध्यात्मिक महत्व आहे. दलाई लामा यांनी बर्याचदा या ठिकाणाला भेट दिली आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की या भागात 101 लहानमोठे तलाव आहेत.
जेव्हा आपण या प्रदेशात प्रवास करतो, तेव्हा नक्कीच असे वाटते की 'शांग्री ला' खरोखर अस्तित्त्वात असल्यास, ते खरंच, इथेच असेल.
आता आम्ही जसवंतगढ युद्ध स्मारकाकडे निघालो होतो. ही शौर्य व पराक्रमाची कहाणी सांगणारी जागा आहे.
चौथी तुकडी, गढवाल रायफल्सचा रायफलमन जसवंसिंग रावत हे १९६२ च्या भारत चीन युद्धात नुरानंग येथे तैनात होते. गढवाल रायफल बटालियनने चिनी सैनिकांशी जोरदार लढाई केली. त्यांच्या आक्रमणांना उत्तर दिले. परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे बटालियनला माघार घ्यावी लागली.
त्यावेळी जसवंतसिंगने आपल्या दोन अन्य सैनिक साथीदारांसह ह्या चौकीवर तळ ठोकला. चिनी सैनिकांवर गोळीबार करत राहिले. त्यामुळे माघार घेणाऱ्या बटालियनला, दुसर्या तळावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी वेळ मिळाला.
दुसर्या दिवशी त्याचे दोन साथीदार देखील युद्धात मरण पावले, पण असे म्हणतात की जसवंतसिंग एकट्याने ७२ तास ही चौकी सांभाळत होते. चिनी सैन्याला त्यांनी रोखून ठेवले होते.
आक्रमक चिनी सैन्याने 17 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांना ताब्यात घेऊन ठार केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना महावीर चक्र देण्यात आले. गोष्ट इथेच संपत नाही. जसवंतसिंग असे एकमेव सैनिक आहेत जे मृत्यू नंतरही भारतीय सशस्त्र सेनेच्या सेवेत होते.
ते सेवेत असते तर जशी बढती मिळाली असती, तशी अगदी नियमित बढती त्यांना देण्यात आली. त्यांचे सामानदेखील इथे ठेवले आहे. त्यांच्या बुटांना दररोज पॉलिश केले जाते. 2002 मध्ये ते कॅप्टन म्हणून निवृत्त झाले.
हा शूर देशभक्त मृत्यू नंतरही आपल्या राष्ट्राची सेवा करत राहिला आणि त्या भागात तैनात असलेल्या सैनिकांना ते अजूनही धोक्यांची सूचना देतात, वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात असे म्हटले जाते.
स्मृतिस्थळ |
जसवंतसिंग स्मारक |
जसवंतसिंगांना रोज लागतील अशा सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. युनिफॉर्मला रोज इस्त्री होते, बुटांनादेखील रोज पॉलिश होते.
या स्मारकावर लष्करी अधिकारी तैनात आहेत. ह्या स्मृतिस्थळाला ते 'बाबा का मंदिर' असे म्हणतात. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की येथे तैनात असलेले अधिकारी व इतर कर्मचारी मांस, मासे इत्यादी पदार्थ खात नाहीत. इथे असताना पूर्णपणे शाकाहारच घेतात. .
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात, एक पूजा होते आणि स्मारकात एक कार्यक्रम आयोजित केला जातो. ऑक्टोबर २०१९ च्या शेवटी आम्ही जसवंत गडला भेट दिली तेव्हा ही जागा वार्षिक समारंभासाठी सज्ज होत होती.
एक छोटेसे संग्रहालय आहे जिथे बंकर उभे केले आहेत. ते पाहून आलेल्या पर्यटकांना सैनिक कसे जगतात हे समजते.
जेव्हा आपण इथे उभे राहून, लष्करी अधिकाऱ्यांकडून, युद्धाबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या सैनिकांच्या खडतर आयुष्याची आणि कष्टांची तीव्र जाणीव होते. त्यांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो, आपल्या कुटूंबापासून दूर रहावे लागते आणि समाज त्यांच्या ह्या त्यागाची जाणीव क्वचितच ठेवतो. इथून निघताना मनातील, आपल्या देशाच्या सैनिकांविषयीचा आदर, सन्मान आणि अभिमान जास्तच तीव्र झालेला असतो.
जवळच एक लहान रेस्टॉरंट आहे. ते लष्कराने चालवलेले आहे. येथे तुम्ही ताजे बनविलेले, गरमगरम, नाश्त्याचे पदार्थ आणि काही केक्स, डोनट्स इत्यादी खाऊ शकता. इथे मिळणारे उत्पन्न जसवंतगडच्या देखभालीसाठी वापरले जाते.
इथे आपण चवदार स्नॅक्स खाऊ शकता, त्याबरोबर मोफत दिला जाणारा गरम गरम चहा, हवा तेवढा पिऊ शकता आणि तवांगच्या प्रवासासाठी स्वत: ला तयार करू शकता!
#IndiaChinaWarMemorial #MustVisitPlaceInArunachal #SelaIconicPlace #101LakesNearTawang #BeautifulLakeNearTawang #JasawantSinghRawat #72Hours
NH13 Omg😶
ReplyDeleteसलाम जसवंतसींगजीना 🙏🙏🙏
मस्त लिहलेस
भारत माता की जय!!
DeleteNH 13 खूपच भारी आहे. आपल्याला बघताना असे वाटते, तो बांधला जाताना किती अवघड गेले असेल?!
Delete