मागील पोस्टमध्ये आपण सेला आणि जसवंतगढ युद्ध स्मारकाला भेट दिली होती. युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर आम्ही तवांगकडे निघालो. जाताना वाटेत नुरानंग फॉल्सना भेट दिली.
नुरानंग फॉल्स हे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात आहेत. त्यांना जंग फॉल्स किंवा बॉंग बॉंग फॉल्स असे देखील म्हणतात. जास्त लोकांना अजून हे ठिकाण माहिती नाही. त्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी नसते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने इथे खूप शांतता आहे. धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्याचाच काय तो आवाज!
शंभर मीटरवरून पडणारा हा धबधबा खूपच छान दिसतो. पाण्याचा वेग, सर्वत्र उडणारे तुषार ह्या सौंदर्यामुळे काळे डोंगर आणि हिरव्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर हा शुभ्र पांढरा धबधबा शोभून दिसतो. तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हाला इंद्रधनुष्ये देखील दिसू शकतात.
तिथेच एक छोटेसे जलविद्युत केंद्र आहे. मला वाटते की ह्या जलविद्युत केंद्रासाठीच तिथे येणारी पक्की सडक बांधली गेली असावी.
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक पायवाट आहे. थोडी निसरडी असणारी ही पायवाट तुम्ही ट्रेकिंग साठी शिकलेली कौशल्ये वापरायची संधी देते! पण ह्या वाटेने गेलात तर तुम्ही अगदी तळाशी, म्हणजे जिथे धबधबा जमिनीवर पडून तवांग नदीला मिळतो तिथे पोचू शकता.
तवांगपासून साधारण ४० किलोमीटर वर असणारे हे धबधबे पाहायला जरी जास्त पर्यटक येत नसले, तरी ते धबधबे सिनेमातून मात्र आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहेत.
माधुरी दीक्षित च्या कोयला ह्या सिनेमातील एक गाणे इथे चित्रित झाले होते. लोक धडपडत त्या पायवाटेने अगदी खालपर्यंत जाण्याचे एक महत्वाचे कारण हे देखील आहे, की जिथे माधुरी दीक्षितचे फोटो निघाले अगदी तिथेच आपलेही फोटो असावे!!
जरी तवांगपर्यंतचे अंतर फक्त चाळीस किलोमीटर असले तरी डोंगरदऱ्यांचा रस्ता असल्याने पोचायला वेळ लागू शकतो. जाताना तुम्हाला उत्तर हिमालय पर्वतरांगा दिसत राहतात.
तवांगमध्ये खूप लवकर सूर्य मावळतो आणि उगवतो. हवा अगदी थंड आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. हवामानाची स्वतःला सवय होण्यासाठी थोडी विश्रांती आवश्यक आहे. मला वाटते तीन दिवस आणि तीन रात्री तुम्ही तवांगसाठी ठेवू शकलात तर उत्तम होईल.
तुम्हांला सगळ्यांना हे माहितीच असेल की तवांग पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ह्या जिल्ह्याच्या सीमा चीन आणि भूतान ला टेकलेल्या आहेत. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, स्फटिकशुभ्र पाण्याची किंवा बर्फाची असंख्य तळी, विरळ लोकवस्ती, लहान लहान गावे आणि सौहार्दपूर्ण लोक ह्या सगळ्यामुळे पर्यटन स्थळांच्या यादीत तवांग अगदी वरची जागा पटकावून बसले आहे. खासकरून तवांग मध्ये तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य आणि धार्मिक शिकवणुकीचा महिमा अनुभवता येतो.
दुसऱ्या दिवशी आम्ही अशा जागेला भेट दिली ज्या जागेमुळे शहराला आणि जिल्ह्याला तवांग हे नाव मिळाले आहे. शहरापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर असलेला हा बौद्ध मठ, भारतातील सर्वात जुना व सर्वात मोठा मठ आहे. जगात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातला सर्वात मोठा बौद्ध मठ ल्हासा, तिबेट येथे आहे.
तवांग ह्या नावाची उत्पत्ती अशी आहे, त+ वांग. त म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेला. घोड्याने निवडलेली जागा ती तवांग. कथा सांगते की एक लामा, बौद्ध मठ स्थापन करण्यासाठी जागा शोधत होता. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून तो खूप फिरला. पण मठाला हवी तशी जागा काही मिळाली नाही. शेवटी त्याने ठरवले की आपण ध्यान लावून ईश्वराचे काही मार्गदर्शन मिळते का पाहूया!
त्याने ध्यान लावून झाल्यावर डोळे उघडले तर त्याचा घोडा गायब झाला होता. लगोलग त्याने घोडा शोधायला सुरुवात केली. खूप वेळ शोधल्यावर अखेर घोडा एका थोड्या सपाट अशा डोंगरमाथ्यावर सापडला. हा ईश्वराचा संदेश आहे असे मानून घोडा जिथे सापडला त्या जागी मठाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे मेरा लामा लॉरडे गाईतसो ह्यांनी १६८१ मध्ये हा मठ स्थापन केला.
ह्या मठाला ग्यालडेन नामगे लहात्से असेही म्हणतात. त्याचा अर्थ आहे, स्वच्छ रात्री दिसणारे स्वर्गीय नंदनवन. तवांगला येताना हिमालयाच्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून तुम्हाला अधून मधून हा मठ दिसत राहतो. त्याच्या पिवळ्या छपरांवर सूर्याची किरणे पडतात तेव्हा तो विशेष चमकतो. हा मठ इतका भव्य आहे की पर्वताच्या पार्श्वभूमीवर दूरवरून तो दिसतोच दिसतो.
तवांग मठ |
हा मठ एखाद्या किल्ल्यासारखाच बांधला आहे. त्यात भिक्षु, विद्यार्थी ह्यांची निवासस्थाने, वाचनालय, संग्रहालय, मंदिर सर्व आहे. तो अशा मोक्याच्या ठिकाणी आहे जिथे पश्चिम कामेंग, तिबेट आणि भूतान येथून येणारे मार्ग एकत्र येतात.
तवांग मध्ये तुम्हाला तिबेटचा खूप प्रभाव पाहायला मिळतो. तिबेट मधील सर्वोच्च धार्मिक स्थानी असणारे दलाई लामा (चौदावे ) ह्यांना चीनने तिबेटवर कब्जा केला आणि अतोनात छळ करायला सुरुवात केली म्हणून, तिबेट सोडून निर्वासित होऊन, १९५९ मध्ये भारतात आश्रय घ्यायला लागला. सध्या ते उत्तर भारतात धरमशाला ह्या गावी राहतात. ते अनेकदा तवांग ला भेट देतात. तेव्हा तेव्हा त्यांची भेट ही जगातील अनेक वृत्तपत्रांची बातमी बनते. त्याचे कारण आहे चीनची ह्याविषयातील नाराजी आणि तवांगच्या बाबत भारत चीन संबंधात आलेला तणाव.
प्रवेशद्वार |
मंदिर आणि शाळेकडे जाणारा रस्ता |
आम्हाला तिथे खूप शेळ्या आणि मेंढ्या बघता आल्या. बहुधा शेळीच्या दुधापासून काहीतरी पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प पण मठाच्या आवारात असावा.
शाळेची इमारत |
शिक्षण आणि व्हिटॅमिन D! |
अजून एक वर्ग |
अनेक लहान लहान भिक्षु तिथे शिकत आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीतील जे काय मला समजले ते असे, प्रत्येक बौद्ध घरातील एक तरी मुलगा ह्या शाळेत शिक्षण घ्यायला पाठवला जातोच.
जपचक्रे |
अशी चक्रे परिसरात अनेक ठिकाणी आहेत. 📷 Pradnya Sathe |
मंदिरात बुद्धाची एक खूप उंच मूर्ती, तसेच इतर अनेक लहान मूर्ती, चित्रे, लेखन, पूजेचे साहित्य, नैवेद्य हे सगळे पाहायला मिळते. हे मंदिर खूप रंगीबेरंगी दिसते.
८ मीटर उंच बुद्ध मूर्ती |
मंदिरातील अजून एक मूर्ती |
आवारात अजून पण काही मंदिरे, प्रार्थना सभागृहे आहेत. इथे तुम्ही पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू तसेच दाखवले जाणारे नैवेद्य बघू शकता.
आम्हाला एका हॉलमध्ये मंत्रांचे पठण ऐकायला मिळाले. खूपच खास होती ती सगळीच प्रक्रिया. तुमच्यासाठी इथे व्हिडिओत दाखवते.
आवारात एक संग्रहालय आहे. तिथे अत्यंत प्राचीन अशी कागदपत्रे, वस्तू, ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्वाचे संदर्भ बघायला मिळतात. प्राण्यांपासून बनवल्या गेलेल्या काही विचित्र वस्तू पण बघायला मिळतात. तिथे जरी गाईड सेवा उपलब्ध नसली तरी सर्व नावे रोमन लिपीत लिहिलेली आहेत.
तवांग मध्ये अजून पण खूप आहे बघण्याजोगे. स्थानिक लोक ज्याला 'बिग बुद्धा टेम्पल' म्हणतात ते आहे. तवांग युद्ध स्मारक तर चुकवून चालणारच नाही. तिथे संध्याकाळी एक ध्वनिप्रकाश कार्यक्रम पण असतो. एक दिवस बुमला पास ला जायला राखून ठेवायला हवा. इथे फक्त भारतीय नागरिकच जाऊ शकतात, ते देखील विशेष परवानगी घेऊन. पुढच्या पोस्ट मध्ये मी ह्या सगळ्याबद्दल नक्की लिहिणार आहे.
ह्या पोस्टचा समारोप करते आहे, तवांग महोत्सवाच्या वर्णनाने. आम्हाला अगदी अनपेक्षितपणे हा वार्षिक महोत्सव बघायला मिळाला. तिथे स्थानिक संगीत, नृत्य, नाट्य, तसेच देशभरातील नामवंत म्युझिक बँड्स असे सगळे बघायला, ऐकायला मिळते. कार्यक्रम एका मोठ्या मैदानात असतो आणि सगळ्यांसाठी मोफत असतो. स्टेडियम सारखी बसण्याची व्यवस्था, हिंडायला भरपूर जागा असलेला हा महोत्सव असतो. तुम्हाला स्थानिक जीवनाची इथे ओळख होऊ शकते.
तवांग महोत्सव |
तवांग महोत्सव |
तवांग महोत्सवाला जाण्यासाठी पर्यटक जसे उत्सुक असतात तसेच स्थानिक लोक देखील ह्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. आम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो तिथला कर्मचारीवर्ग देखील महोत्सवाला जाण्यासाठी उत्सुक होता!
त्या मैदानात हस्तकला, स्थानिक झाडे, खाद्यपदार्थ ह्यांचे देखील स्टॉल्स होते. तुम्ही इथे स्थानिक खास पदार्थ खाऊ शकता. मला तिथे दरवळत असलेला भाजल्या जाणारा मांसाचा वास अजिबातच सहन झाला नाही.
अरुणाचल मधील खाद्यपदार्थ आणि त्यात वापरले जाणारे घटक ह्यात खूपच वैविध्य आहे. मला स्थानिक स्टॉल्स वर जिथे, घटक काय आहेत हे नीट कळू शकणार नाहीत, तिथे खायची हिंमत झाली नाही!! तुम्ही जिथे उतरला आहात त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी अन्न बनवून घेणे हाच अरुणाचल मध्ये उत्तम पर्याय आहे!!
#PlacesToSeeNearTawang #TawangFestival #TawangMuseum #WhatYouShouldKnowBeforeVisitingTawang
किती छान स्वच्छ अणि मोठा परिसर आहे.
ReplyDeleteहो!! स्वच्छ, सुंदर आणि शांत!
Deleteफोटो ,व्हिडिओ ,लिखाण सगळं अप्रतिम !!
ReplyDeleteधन्यवाद अरुंधती!! तुझ्यासारखे नियमित वाचक ब्लॉग लिहित राहण्याची प्रेरणा देतात!
Delete