ह्या मंदिराला भेट देताना माझ्या मनात मोहिनीराज ह्या नावाविषयी कुतूहल होते. मोहिनी हे स्त्रीचे नाव आणि सहसा राज येते पुरुषांच्या नावाच्या पुढे. मग हे दोन शब्द एकत्र कसे आले? ह्याविषयी अपार कुतूहल मनात घेऊनच मी ह्या मंदिराला भेट दिली. मोहिनीराज मंदिर, महाराष्ट्र राज्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील, नेवासा ह्या गावी आहे.
मोहिनीराज मंदिर, नेवासा |
संत ज्ञानेश्वरांनी लहिलेल्या ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथात नेवाश्याचा उल्लेख आढळतो. हा ग्रंथ म्हणजे तेराव्या शतकात लिहिली गेलेली श्रीमद्भगवत गीतेवरील भावार्थ रचना आहे. हा ग्रंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो.
ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, " त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्रीमहालया असे. " ह्याचा अर्थ असा की श्रीमहालया क्षेत्राच्या भोवतीचा पाच कोसांचा भाग हा त्रिभुवनात पवित्र असून, हे क्षेत्र म्हणजे जणू जगाचे जीवनसूत्रच आहे. ज्ञानेश्वरी ह्याच परिसरात लिहिली गेली.
ज्ञानेश्वरीतील नेवासा ह्या गावाचा उल्लेख |
प्राचीन काळी नेवासा ह्या गावाचे नाव निधीनिवास, श्रीमहालया असे होते. ह्या गावाच्या अनेक प्राचीन ग्रंथात असलेल्या उल्लेखामुळे, पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांची उत्सुकता जागृत झाली. त्यांनी ह्या भागात उत्खनन करायचे ठरवले. उत्खनन मोहीम यशस्वी झाली आणि नेवासा क्षेत्रात मध्य पाषाणयुगातील अनेक हत्यारे सापडली. ह्या संबंधीचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आपण आंतरजालावर देखील वाचू शकतो.
ह्या मंदिरासंबंधीची कथा जरी पुरातन असली तरी मंदिर मात्र नवे आहे. किती नवे? तर हे मंदिर १७७३ मध्ये बांधले गेले असा उल्लेख सापडतो, म्हणजे अवघ्या २५० वर्षे वयाचे हे मंदिर आहे!
समुद्र मंथनाच्या वेळी मंथनातून जेव्हा अमृत आणि सुरा - दारु निघाली तेव्हा त्याची वाटणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सगळे अमृत देवांच्या वाट्याला येऊन ते अमर व्हावेत आणि दानवांच्या वाट्याला फक्त दारू जावी ह्यासाठी मोहिनीरूप घेतले गेले. मोहिनी म्हणजे जिचा मोह पडेल, भुरळ पडेल अशी सुंदर स्त्री. मोहिनीने हे वाटपाचे काम चोखपणे बजावले. देवांच्या वाट्याला अमृत आले आणि दानवांच्या मद्य.
ह्या मंदिरातील मूर्ती अर्धनारीनटेश्वराच्या रूपात आहे म्हणजे विष्णू आणि मोहिनी एकाच मूर्तीत आहेत. मूर्तीचा उजवा भाग विष्णुरूपातील तर डावा भाग मोहिनी रूपातील आहे. म्हणूनच ह्या मंदिराचे नाव मोहिनीराज मंदिर- मोहिनी आणि विष्णू मंदिर. असे म्हटले जाते की ह्या प्रकारची अर्धनारीनटेश्वराची मूर्ती असणारे हे एकमेव मंदिर आहे.
मोहिनीराज |
शिव पार्वती दोघे एका मूर्तीत, अर्धनारीनटेश्वराच्या रूपात अनेक ठिकाणी बघायला मिळतात. पण विष्णू आणि मोहिनी असे बघायला मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.
मोहिनीराज मंदिर गर्भगृह |
मोहिनीराजाची डावीकडची लहान मूर्ती, जिच्यावर अभिषेक होतो अशी पंचधातूची मूर्ती आहे. उजवीकडची तिसरी मूर्ती लक्ष्मीची आहे. अर्धनारीनटेश्वराचे मंदिर असल्याने पूजा विधीच्या वेळी भक्त देवाला साडी, खण आणि धोतर असे सगळे अर्पण करतात.
तेराव्या शतकात यादव राजवटीत प्रचलित असणाऱ्या हेमाडपंती वास्तुशैलीत हे सुंदर मंदिर बांधले गेलेले आहे. ह्या वास्तुशैलीला हेमाद्री/हेमाडपंतांचे म्हणजे यादव राजांच्या मुख्य प्रधानाचे नाव दिले गेलेले आहे. पण आता ज्या ज्या भागात नव्याने दुरुस्त्या झाल्या आहेत तिथे ही शैली कदाचित दिसणार नाही.
मोहिनीराज मंदिर, प्रवेशद्वार |
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या सुंदर मूर्ती आहेत. ह्या मूर्तींचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या हातात शस्त्रे तर आहेतच, पण एकेक पक्षी देखील आहे.
मंदिरातील कोरीवकामात अनेक सुंदर रचना दिसून येतात. चित्तवेधक भाग असा की अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना इथे आढळतात.
दर्शनी भागावरील सुंदर रचना |
कमळे, फुलांच्या आणि पानांच्या वेळी, हत्ती अशा अनेक रचना दर्शनी भागावर कोरलेल्या आढळतात. सज्जाच्या वरच्या भागात आपल्याला पानांचे तोरण असल्यासारखी रचना दिसते.
मुख्य प्रवेशद्वार |
मुख्य प्रवेशद्वार धातूचे बनवलेले आहे. त्याच्या लगत दगडी भागात आल्याला साखळी आणि घंटा, वेली, वर्तुळातील फुले अशा विविध रचना आढळतात. ह्या छायाचित्रात द्वारपालाच्या हातातील पक्षी जवळून दिसतो आहे. बहुतेक हंस असावा.
ह्या दारापर्यंत पोचण्यासाठी तीनचार पायऱ्या चढायला लागतात. दारातून मग दुसरा जिना सुरु होतो. त्याची पहिली पायरी खूपच उंच आहे.
कोरीवकामातील विविध रचना |
बाहेरच्या वेगळ्या बाजूने काढलेले छायाचित्र |
हे बाहेरील भागाचे अजून एक छायाचित्र. ह्यात वर मागच्या बाजूला तुम्हाला एक पांढरे गोलाकार बांधकाम दिसेल. तो मंदिराच्या सभागृहाच्या छताचा भाग आहे. खरे तर हेमाडपंती शैलीत नेहमी हे देखील उंच शिखर असते किंवा जिथे असा गोलाकार आहे तिथे त्यावर देखील मुख्य शिखराप्रमाणेच कोरीवकाम केलेलं असते. पण इथे मोहिनीराज मंदिरात त्या गोलाकार भागावर बाहेरच्या बाजूने कोरीवकाम केलेले नाही. केवळ एक छोटेसे शिखर आहे. कदाचित सभागृहावरील मूळ कळस काही ज्ञात अज्ञात कारणांमुळे नष्ट झाला असेल आणि मग हेमाडपंती शैलीपेक्षा वेगळे असे हे बांधकाम केले असेल.
सज्जा |
गर्भगृहाच्या/ गाभाऱ्याच्या शिखरावर म्हणजेच मंदिराच्या मुख्य शिखरावर खिडकीसारखा चित्तवेधक सज्जा दिसतो. पूर्वी कदाचित येथे देखील सुंदर मूर्ती असतील.
आपण मंदिरात प्रवेश करताच समोर सभागृह येते ते आडव्या चौरस आकाराचे आणि गाभारा आपल्या डावीकडे दिसतो. हे नेहमीपेक्षा वेगळे आहे. सहसा आपण मंदिरात प्रवेश गेल्यावर उभट चौरसाच्या आकाराचे सभागृह दिसते आणि मग तिथून समोरच गाभारा दिसतो.
त्यामुळे मग वाटले की कदाचित पूर्वी सध्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मुख्य दरवाजा असणार. सध्या मात्र तिथे भिंत घालून तो बंद करण्यात आला आहे. त्या बाजूने प्रवेश केला तर आपल्यासमोर उभ्या चौरस आकारातील सभागृह येईल आणि मग गाभारा समोरच दिसेल. मोहिनीराज देवस्थानात नेहमी जाणाऱ्या भक्तांकडे चौकशी केल्यावर कळले की खरेच काही दशकांपूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी पश्चिमेकडूनच मुख्य दरवाजा होता!
मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर कोरीवकाम केलेले सभागृह दिसते. छतावर रासक्रीडेत नाचणाऱ्या गोपी आणि कृष्णाच्या आकृती कोरलेल्या दिसतात. अतिशय प्रमाणबद्ध मानवी शरीराचा नमुनाच तिथे पाहायला मिळतो.
सभागृहाचे छत |
साखळीला अडकवलेल्या घंटा, कमल पुष्पे, पाने अशा सुंदर रचना कोरीवकामात वापरलेल्या आढळतात. खांबांच्या अगदी वर छत तोलून धरणाऱ्या यक्षांच्या आकृती आहेत. बहुतेक यक्षच असावेत. मंदिरातील खांबात आकारांचे आणि रचनांचे विविध प्रकार हाताळलेले दिसतात.
हे मंदिर शहराच्या मध्येच आहे. चहुबाजूने नागरी वस्ती आणि धावते रस्ते. गाडीबरोबर काढलेल्या ह्या फोटोमुळे तुमच्या लक्षात येईल की मंदिर किती उंच आहे! जवळपास ७५ फूट उंचीचे हे मंदिर आहे. माघ महिन्यात इथे मोठा उत्सव आणि जत्रा असते.
मोहिनीराज मंदिर, नेवासा |
एकाच मूर्तीत विष्णू आणि मोहिनी रूप असणारे असे हे अद्वितीय मोहिनीराज मंदिर. आपल्याला मातृका माहिती आहेत. त्यात देखील वैष्णवी असते. वैष्णवी म्हणजे विष्णूची सर्व आयुधे धारण करणारी देवी. वैष्णवी रूपातील मूर्ती आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पण असे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री असा देह असणारे विष्णूमोहिनीचे हे एकमेव मोहिनीराज मंदिर.
मोहिनीराजाच्या ह्या रूपातून आपल्याला विश्वातील स्त्रीपुरुष परस्परपूरकता, एकता आणि समानतेचा संदेश मिळतो.
Masta navin mahiti milalai
ReplyDeleteThanks Deepika!
Deleteनेवाशाला खांब्याचे मंदिर आहे एवढेच माहीत होते 🙏मोहिनीराज मंदिर माहित नव्हते 👍👍
ReplyDeleteहो!! लहानसे पण सुंदर आहे मंदिर. बऱ्याच जणांचे कुलदैवत आहे.
Delete