सगळीकडे नुसते हिरवेगार! हिरवळ, झाडे, कुठे कुठे दाट जंगल देखील. सगळा साधारण सपाट पठारी प्रदेश. तुम्ही ती हिरवाई न्याहाळण्यात मग्न असताना अचानक तुमच्या डोळ्यांसमोर येतो एक महाकाय खडक! महाकाय म्हणजे किती मोठा असेल? तर फक्त ६६० फूट उंच! सपाट प्रदेशात अचानक हा महाकाय खडक उगवल्याने आश्चर्य चकित झाला असलात तर खरी चकित होण्याजोगी गोष्ट अजून पुढेच आहे. ह्या महाकाय खडकावर चक्क एक राजवाडा आहे. ह्या खडकाला आता राजवाडा म्हणावे की किल्ला असा प्रश्न पडतो!
सिगिरिया 📷स्नेहा टिळक |
सिगिरिया 📷wikimedia commons |
सिगिरिया 📷स्नेहा टिळक |
श्रीलंकेतील डम्बुला शहराजवळील सिगिरिया किंवा सिंहगिरी हे UNESCO ने विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ह्या स्थानाला ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि पुरातत्वशास्त्रीय देखील महत्व आहे. शिवाय हे नगर विकास रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे.
पुरात्तत्व संशोधकांना सापडलेल्या काही वस्तूंच्या पुराव्यानुसार सिगिरियात ५००० वर्षांपूर्वी सुद्धा मानवी वस्ती होती. काही लोक म्हणतात की सिगिरियाचा राजवाडा म्हणजेच रावणाची सोन्याची लंका! इथे सोन्याने बांधलेला राजवाडा होता. काहीजण म्हणतात की तो राजवाडा कुबेराने (धनदेवता) जो रावणाचा सावत्र भाऊ होता त्याने बांधलेला होता.
काही जणांना वाटते की हा राजवाडा परग्रहावरील वासियांनी बांधलेला असणार अन्यथा ६६० फुटांवर कोणी मानव कसे काय बांधकाम करू शकेल?!
इतिहासतज्ञांच्या मते आणि श्रीलंकेत सापडलेल्या काही ऐतिहासिक वर्णनानुसार सिगिरिया ही राजा कश्यपाची राजधानी होती. राजा कश्यपाने, त्याच्या वडिलांना धातुसेन राजाला मारून सत्ता बळकावली. पण त्याला नेहमीच सिंहासनाचा खरा वारसदार असलेला त्याचा जो भाऊ होता, त्याची भीती वाटत राहिली. त्या भावाच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी कश्यपाने ही सुरक्षित जागा आपल्या राजधानीसाठी निवडली. राजा कश्यपाच्या राजवटीत (४७७-४९५ CE) मध्ये ह्या किल्ल्यातील बरीचशी बांधकामे झाली. काहीजणांच्या मते हा राजा कश्यपाचा रंग महाल होता.
राजा कश्यप अखेर त्या भावाबरोबर, मोग्गलनबरोबर झालेल्या लढाईत हरला व मृत्यू पावला. त्या नंतर राजधानी परत मूळ जागी म्हणजे अनुराधापूरला गेली आणि सिगिरियातील त्या खडकाच्या तळाशी असलेले राजवाडे बुद्ध भिक्षूंच्या विहारासाठी देण्यात आले. खडकावरील राजवाडा मात्र वापरला गेला नाही. त्या नंतर काही वर्षांनी बुद्ध भिक्षूंनी पण ही जागा सोडली आणि सिगिरिया अनेक वर्षे, अनेक शतके दुर्लक्षित राहिले, विस्मृतीत गेले.
सिगिरिया किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने पाणी भरलेला खंदक आहे. तो बघून कंबोडियातील अंगकोर ची आठवण होते. तिकीट खिडकी जवळ जल उद्याने आहेत.
तिकीट खिडकी जवळील जल उद्यान 📷स्नेहा टिळक |
एल आणि यू आकाराची अनेक जल उद्याने आकर्षक भौमितिक रचना करून निर्माण केली आहेत. आहेत. तिथे चार गार्डन्स ऑफ पॅराडाईज आहेत. त्या आत्मा, हृदय, प्राण आणि सार ह्यांचे प्रतिनिधित्व करून आत्म्याचा प्रवास दाखवतात.
खडक माथ्यावरून दिसणाऱ्या सिगिरिया च्या बागा. 📷स्नेहा टिळक |
आणखी थोडे उंच चढून गेलं की येते तिसरे जल उद्यान, एका अष्टकोनी तळ्याच्या रूपात.
अष्टकोनी तळे 📷स्नेहा टिळक |
आमच्या गाईडने आम्हाला सांगितले की त्या ६६० फूट उंच खडकाच्या माथ्यावर हायड्रॉलिक प्रणालीने खालून पाणी वाहून नेले जात असे. त्यातली काही कारंजी अजूनही चालतात असे तो म्हणाला, पण आम्हाला मात्र एकही चालू कारंजे बघायला मिळाले नाही.
मोठाल्या खडकांच्या रचना असलेल्या, गुहा असलेल्या बोल्डर गार्डन्स देखील पाहायला मिळतात.
खडकांचा बोगदा! 📷स्नेहा टिळक |
तिथल्या काही विटांच्या भिंती आणि पायऱ्या १५०० वर्षे जुन्या आहेत हे कळल्यावर आश्चर्य वाटते.
एका ब्रिटिश लेखकाने लिहून ठेवले आहे की त्या खडकाचा पृष्ठभाग चित्रांनी आभूषित केलेला होता. ४०० फूट लांब आणि १०० फूट उंच इतका भाग चित्रांनी भरलेला होता. किती सुंदर दिसेल हे दृश्य? ह्या विचाराने पण थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आता मात्र अगदीच थोडी भित्तिचित्रे शिल्लक आहेत. ती पाहून आपल्याला अजिंठ्यातील भित्तिचित्रांची आठवण होते.
चित्रसज्जा कडे जाणारा चक्राकार जिना 📷स्नेहा टिळक |
सुंदर भित्तिचित्रे 📷स्नेहा टिळक |
गाईडने आम्हाला सांगितले की ह्या भिंतीचा काही भाग गिलावा करून आणि घासून इतका गुळगुळीत केलेला होता, जणू आरसाच. त्यावर सूर्याचे किरण पडून परावर्तित व्हावे अशी योजना होती.
सैनिक चौकी? 📷स्नेहा टिळक |
नागफणा खडक 📷स्नेहा टिळक |
सिंहद्वार 📷स्नेहा टिळक |
सिंहद्वारातून वर जाण्यासाठी जिना 📷Commons Wikimedia |
वयस्कर लोक, शारीरिक व्याधी असणारे आणि लहान मुले ह्यांनी जाण्याजोगे हे ठिकाण आहे असे मला वाटत नाही. ते कोणी बरोबर असतील तर खाली जल उद्यानाच्या तिथे ते थांबू शकतात. १५०० आणि त्याही कमी अधिक उंची रुंदीच्या पायऱ्या आहेत. कुठे नुसताच चढ आहे. रस्ता नक्कीच अवघड आहे.
खडकमाथ्यावर पोचल्यावर मानवनिर्मित भले मोठे तळे दिसते, काही टेरेस गार्डन्स दिसतात, इमारतींची जोती/ पायाचे अवशेष दिसतात. इतक्या उंचावर पाणी कसे पोचवले असेल? विटा आणि अजस्त्र संगमरवरी शिळा ६६० फूट उंचीवर कशी पोचवली असतील? जर का आत्ता आहेत हे सगळे जिने तेव्हा नव्हते तर मग माणसे वर राजवाड्यात कशी जात असतील? आज खडकावर आडवे चर आणि खुणा दिसतात त्या खरेच ट्रॉली साठी किंवा लिफ्ट साठी तयार केलेल्या होत्या का? तेव्हा लिफ्ट्स खरेच असतील तर कोणता ऊर्जा स्रोत वापरात असतील? सैनिकी चौक्या असे ज्याला आज म्हटले जाते, ते उभे चर/ छोट्या गुफा इतक्या खड्या कातळावर कशा कोरल्या असतील? त्या खोदण्यामागे काय उद्देश असेल?
वरपर्यंत जाणे अवघड असले तरी तिथे पोचल्यावर त्या सगळ्या कष्टांचे सार्थक होते. खडकमाथ्यावरुन दिसणारे भोवतालच्या परिसराचे सुंदर दृश्य, राजवाड्याचे अवशेष आणि पुरातन टेरेस गार्डन्स ह्या सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तेवढा त्रास घ्यायला काहीच हरकत नाही.
पायात खाबड खुबड रस्त्याने चालायला आणि पायऱ्यांनी चढायला योग्य अशी पायताणे मात्र हवीत. सोबत पाणी न्यायचे मात्र विसरू नका. रस्त्यात किंवा वर खडक माथ्यावर काहीही मिळत नाही.
आम्ही पोचलो! सिगिरियामधील सर्वात उंच जागा |
हे सगळे प्रश्न आपल्याला पडत राहतात. ह्यात काहीच आश्चर्य नाही की स्वत:च एक आश्चर्य असलेले सिगिरिया हे श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे! प्रत्येक हौशी प्रवाश्यासाठी नक्की 'एकदा तरी भेट द्यायलाच हवी' अशी जागा.
राजवाडा - खडकावरला! 📷 Open source, Internet |
असे कितीतरी प्रश्न आहेत ज्याची अजून उत्तरे मिळायची आहेत. ती उत्तरे सापडेपर्यंत सिगिरिया एक गूढच राहणार आहे. श्रीलंकेत म्हटले जाते की सिगिरिया हे जगातले आठवे आश्चर्य आहे, ते मात्र खरेच पटते.
#MysteriousDestination #Vacation #PalaceOnRock
खूप छान माहिती आणि फोटोंमुळे वास्तूची भव्यता समजली.
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteWa khrech kiti ashray aahe na,khup mast vatate vachtana tuzyabrobar tithe firat aahot asech bhasate.
ReplyDeleteधन्यवाद!
Delete