कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?
ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर पाहणार आहोत.
दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही इथले वातावरण फार सुखद आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे 'कड्यावरचा गणपती.'
पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता. आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ शकते. अतिशय नेत्रसुखद रस्ता आहे.
![]() |
रस्त्यावरून दिसणारे दृश्य |
अतिशय सुंदर जांभ्या दगडाचे, अनेक कमानी असलेले आणि अनेक कलशांचा कळस असलेले असे हे भव्य मंदिर आहे. गर्भगृह तसेच सभागृहावर अनेक लहानमोठे कळस आहेत. अतिशय अनोखी अशी वास्तुशैली आहे.
सभागृहात तसेच गर्भगृहातही आठ आठ कमानी आहेत. गर्भगृह अष्टकोनी आहे. गर्भगृहाच्या कळसावर २१ कळस आहेत. कळसामध्ये अष्टविनायक मूर्ती कोरलेल्या आहेत.
![]() |
कड्यावरचा गणपती मंदिर |
![]() |
कड्यावरचा गणपती मंदिर |
![]() |
प्रवेशद्वार |
ह्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराला २०० वर्षे होऊन गेल्यावर उदयपूरहून कारागीर आणून १९९० मध्ये पुन्हा एकदा जीर्णोद्धाराला सुरुवात झाली. पाच सहा वर्षे चाललेले हे काम अशा प्रकारे करण्यात आले की आता हा कळस संगमरवरी आहे असे वाटते.
मूर्ती स्थानिक पाथरवटांनी घडवलेली आहे. भव्य मूर्ती आहे. सोबत रिद्धी सिद्धीच्या लहान मूर्ती आहेत.
![]() |
गर्भगृह - गणेशमूर्ती |
माघातील गणेशजन्माचा इथे चार पाच दिवस मोठा उत्सव असतो. जवळच एक शंकराचे मंदिर आहे.
![]() |
शिवमंदिर |
![]() |
श्री गणपतीचे पाऊल |
![]() |
रमणीय दृश्य |
![]() |
प्रवेशद्वाराजवळील पाटी |
![]() |
भारतमाता सेवक बनो ! |
Comments
Post a Comment