मानवी इतिहासाच्या विशाल ग्रंथात, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातल्या अनेक देशभक्तांच्या क्रांतीगाथांची वर्णने म्हणजे पुन्हा पुन्हा वाचावे, चिंतन मनन करावे असे अध्याय बनले आहेत. काही क्रांतिवीरांनी देशात राहून काम केले तर काहींनी देशाच्या बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
असेच एक महान क्रांतिकारक म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा. त्यांचा जन्म दिनांक ४ ऑक्टोबर १८५७ ला गुजरातच्या कच्छ मधल्या मांडवी गावात झाला.
अगदी लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा स्वर्गवास झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या श्यामजींचे शिक्षण त्यांचे ज्येष्ठ स्नेही मथुरा दास यांच्या मदतीने झाले. एक विद्वान इंग्रज मोनियर विल्यम्स हे संस्कृत इंग्रजी शब्दकोश तयार करण्यासाठी प्राच्य आणि पाश्चात्य भाषांमध्ये काम करत होते. श्यामजी कृष्ण वर्मांचे भाषा कौशल्य पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्यामजींना आपले सहाय्यक बनावे असे सुचवले. परंतु त्याआधीच स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन श्यामजींनी वैदिक धर्म आणि दर्शनाच्या प्रचारासाठी काम करण्याचे ठरवले होते. क्रांतिद्रष्टा श्यामजी कृष्ण वर्मा
१८७९मध्ये श्यामजी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेव्हा त्यांची भेट मौनियर विल्यम्स आणि इतर भारतीय नेत्यांशी, शिक्षण तज्ञांशी झाली. हे सर्वजण भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये सुधारणांसाठी मागणी करत होते.
लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून जानेवारी १८८५ मध्ये श्यामजी भारतात परत आले. त्यांनी रतलाम, उदयपू,र जुनागड रियासतीचे दिवाण म्हणून काम केले. हे काम करत असताना त्यांना इंग्रजांची कुटील नीती, षडयंत्र आणि अत्याचारांची चांगलेच ओळख झाली. संपूर्ण जगात आपला न्याय व उदारमतवाद ह्यांचा ढोल वाजवणारे इंग्रज लोक प्रत्यक्षात अन्यायी आणि हुकूमशहा होते.
जेव्हा चापेकर बंधूंनी इंग्रज सरकारला स्वातंत्र्यसंग्रामाची एक चुणूक दाखवली. तेव्हा जसे लोकमान्य टिळकांनी त्यांचे कौतुक केले तसेच श्यामची कृष्ण वर्मांनी देखील त्यांचे कौतुक केले. ते इंग्रजांना विरोध करू लागताच इंग्रजांनी त्यांच्यावर अंकुश आणायला सुरुवात केली. श्यामजींनी लोकमान्य टिळकांशी विचार विमर्श करून दुष्मनांच्या घरात जाऊनच त्यांच्यावर वार करण्याचे ठरवले. १८९७ मध्ये ते भारत सोडून लंडनला गेले.
१ जुलै १९०५ ला श्यामजींनी इंडिया हाऊसची स्थापना केली. इंडिया हाऊस हे भारतीय स्वतंत्रता संग्रामातील लंडनमध्ये असलेले मुख्यालय बनले. इथे नेहमीच देशभक्त जमत असत.
ब्रिटिश सरकारला भारतात ब्रिटिश राजनिष्ठ भारतीय अधिकारी कसे मिळतात? तर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधूनच हे अधिकारी निर्माण होतात! त्यामुळे जर का ह्या विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार केले तर ब्रिटिश सरकारला मोठा झटका बसेल. श्यामजी कृष्ण वर्मांनी आपले तन, मन आणि धन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्याचा संकल्प घेतला होता.
श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार सिंह राव राणा या दोघांनी मिळून भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. लोकमान्य टिळक त्यांच्याकडे योग्य छात्र पाठवत असत. लवकरच त्यांनी क्रॉमवेल रोडवर एक इमारत विकत घेतली व इंडिया हाऊस ची स्थापना केली. तिथे 25 विद्यार्थी आरामात राहू शकत. इथे एक मोठा हॉल देखील होता. त्यामुळे लंडनमध्ये राहणारे अनेक भारतीय विद्यार्थी तिथे सभांना येत असत.
लोकमान्य टिळकांनी सुचवलेले अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन इंडिया हाऊस मध्ये राहत होते. लाला हरदयाल, वीरेंद्र नाथ चट्टोपाध्याय, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा हे इंडिया हाऊसमध्ये राहणारे प्रमुख विद्यार्थी होते. तिथे ‘इंडियन सोशलॉजिस्ट’ नावाची एक मासिक पत्रिका प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. इथेच ‘इंडियन होमरूल सोसायटीची’ परिकल्पना तयार झाली. मॅडम भिकाजी कामा यादेखील श्यामजी कृष्ण वर्मांच्या सोबत स्वातंत्र्यासाठी काम करत होत्या. तिथेच राहून सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ तयार केला.
ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी श्यामजींवर होतीच. आपल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून श्यामजी लंडन सोडून पॅरिसला गेले. जाताना त्यांनी सावरकरांवर इंडिया हाऊसची जबाबदारी सोपवली. सावरकरांनी इंडिया हाऊसला भारतीय क्रांतीचे केंद्र तर बनवलेच पण कोणत्याही कायदेशीर बाबीत इंडिया हाऊस अडकणार नाही याचीही खबरदारी घेतली!
कर्जन वायलीच्या हत्येची योजना ह्याच इंडिया हाऊस मध्ये तयार झाली.
श्यामजींनी भारतात आणि भारताच्या बाहेर राहून भारताच्या स्वतंत्रता संग्रामात महान कार्य केले. युरोपमध्ये अनेक जणांना भेटून भारताची परिस्थिती, स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी समजावून सांगितली. क्रांतिकारकांना शक्य ती सर्व मदत ते तिकडून करत होते. पॅरिस नंतर श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंड मध्ये जिनेव्हाला गेले. आपल्या अनेक प्रकाशनांद्वारे त्यांनी भारतीय क्रांतिकारकांची प्रशंसा करत त्यांची बाजू जगाला समजावून दिली. स्वित्झर्लंड मध्येही त्यांनी ‘द इंडियन सोशलॉजिस्ट’ या मासिकाचे प्रकाशन करायला सुरुवात केली आणि आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामाला तलवारीची धार प्राप्त करून दिली. सतत ब्रिटिशांचा ससेमिरा त्यांच्या मागे असूनही ते कधीच ब्रिटिशाना शरण गेले नाहीत.
अखेर ३० मार्च १९३०च्या रात्री त्यांनी जिनेव्हामध्ये अंतिम श्वास घेतला. जिनेव्हा सरकारने या विचारवंत क्रांतीकारकाचे विधीपूर्वक अंतिम संस्कार केले आणि त्यांच्या अस्थी सांभाळून ठेवल्या.
श्यामजींनी म्हटले होते, “माझ्या अस्थी भारतात तेव्हाच नेल्या जाव्यात जेव्हा इंग्रजांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झालेला असेल.” आपण असे करंटे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ५५ वर्षे त्यांच्या अस्थी जिनेव्हामध्येच राहिल्या. अखेर २००३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या अस्थी भारतात आणण्याची सर्व कार्यवाही पूर्ण करून अस्थी भारतात आणल्या.
वीरांजली यात्रा |
क्रांतीतीर्थ |
क्रांतीतीर्थ |
क्रांतीतीर्थ |
क्रांतीतीर्थ मोठ्या दिमाखात महान क्रांतिकारक शामजी कृष्ण वर्मा यांना मानवंदना देत आहे.
श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांच्या आयुष्याचे चित्रण असलेले अगदी सजीव वाटणारे पुतळे आपल्याला त्यांची जीवनगाथा सांगतात. आपल्यासोबत पूर्ण वेळ एक मार्गदर्शक असतो.
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे |
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे |
इंडिया हाऊस प्रतिकृती व भानुमती आणि श्यामजी कृष्ण वर्मा पुतळे |
इंडिया हाऊस प्रतिकृती |
|
|
|
|
सुंदर परिसर |
इंडिया हाऊसची प्रतिकृती आहे. ज्यामध्ये भारतीय क्रांतीसंग्रामाचे वर्णन आहे. श्यामजी कृष्ण वर्मा व भानुमती वर्मा ह्यांचे अस्थिकलश आहेत. बाहेर क्रांतिकारकांच्या छायाचित्रांची व कार्याचे वर्णन करणारे फलक असलेली दीर्घिका आहे.
क्रांतिकारक प्रतिमा |
|
क्रांतीतीर्थ |
स्वच्छता, सौंदर्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार ह्यामुळे हे प्रेरणादायी स्मारक अविस्मरणीय ठरले आहे.
भूजमध्ये आपण नारायण सरोवर मध्ये धार्मिक,अध्यात्मिक यात्रेसाठी जाल, रोड टू हेवनला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी फोटो हवेत म्हणून जाल.
पण मांडवीला क्रांतीतीर्थावर मात्र राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी किंवा जागृत ठेवण्यासाठी अवश्य जा.
Comments
Post a Comment