उंच पर्वतरांगा विस्तीर्ण पसरलेल्या, त्यात अगदी तळाशी चमचमणारी कोलोरॅडो नदी आणि तिच्यामुळे तयार झालेली ग्रॅन्ड कॅनियन - हे ठिकाण अमेरिकेला जाणाऱ्या प्रत्येक निसर्ग आणि साहसप्रेमी पर्यटकाच्या यादीत नायगारा आणि यलो स्टोन नॅशनल पार्कच्या बरोबरीने विराजमान असते.
कोलोरॅडो नदीमुळे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यात तयार झालेली जवळपास ४५० किलोमीटरची ही दरी. भूगर्भातील हालचालींमुळे वर उचलला गेलेला भूभाग, नदीचा प्रवाहामुळे सतत कापली जाणारी पर्वतरांग आणि तिच्या साठत जाणाऱ्या गाळामुळे तयार होणारी भूरचना, वाऱ्यामुळे झिजणारे पर्वतकडे ह्या सर्वांमुळे हे अद्भुत निर्माण झाले आहे.
ही दरी किंवा घळ काही ठिकाणी तर अगदी पावणेदोन किलोमीटर खोली गाठते आणि निसर्गाचे अद्भुत विश्व खुले करते. त्या पर्वतरांगातले वेगवेगळे थर पृथ्वीगर्भाचा लाखो वर्षांचा इतिहास सांगतात.
नजर पोचेल तिथपर्यंत सर्वदूर दिसणाऱ्या पर्वतरांगा आणि ही अजस्त्र घळ निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत ह्याचे सतत स्मरण करून देते. अजस्त्र ह्या शब्दाचा अर्थ तिथे अगदी साक्षात आपल्यासमोर उभा असतो आणि त्यापुढे माणूस बिंदुमात्रदेखील नसतो.
गुलाबी, लाल, फिका तपकिरी, फिका पिवळा कितीतरी रंगछटा तिथल्या पर्वतरांगांत आपल्याला दिसतात. उगवती आणि मावळती सूर्यकिरणे त्या रंगांना जादुई झळाळी प्रदान करतात. ह्या सगळ्या चमत्काराचे साक्षीदार होणे हौशी प्रवाशाला पुरेसे असते, पण साहसी प्रवासी तिथल्या दरीखोऱ्यातून हिंडतात. पर्वतशिखरांवर चढतात. तिथले आत्यंतिक विषम हवामान त्यांच्या मार्गात अडचणी आणते आणि हा प्रवास आव्हानात्मक करते. दरवर्षी इथे अनेक साहसी प्रवाशांचा बळी जातो आणि तरीही दरवर्षी इथे लाखो प्रवासी येत राहतात.ग्रॅन्ड कॅनियनची भुरळ त्यांना जणू खेचून तिथे नेते.
Trails |
हजारो वर्षांपासून रेड इंडियन्स जमाती ग्रॅन्ड कॅनियनमध्ये राहत होत्या. त्यांच्या विविध संस्कृती ग्रॅन्ड कॅनियनच्या साक्षीने बहरल्या. हे खुलेपण, निसर्गावर अवलंबून असणे आणि निसर्गाला धक्का न पोचवता जगणे हे त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनून गेले होते.
ह्यातील होपी ह्या जमातीविषयी, Washington मधल्या Smithsonian - National Museum Of American Indian मध्ये माहिती वाचली, एका परिषदेच्या निमित्ताने झालेल्या भाषणांचे काही तुकडे ऐकायला मिळाले आणि अक्षरश: थरारून जायला झाले.
जमिनीविषयीचा असा पूज्य भाव आता आपण हरवूनच बसलो आहोत का? सीमारेषा न आखता, मालकी हक्क न सांगता, केवळ आमचे पूर्वज इथे राहिले म्हणून आम्ही इथे राहणार असे त्यांचे म्हणणे आहे.
आज ईशान्य अरीझोनात त्यांचे reservation आहे आणि सगळी मिळून साधारण २०००० च्या आसपास ह्या जमातीची संख्या आहे.
होपी समूहाचे नृत्य बघण्याची संधी आम्हाला Grand Canyon National Park मधल्या होपी हाउससमोर मिळाली.
होपी हे होपितू -शिनूमू अशा मूळ नावाचे प्रचलित रूप आहे. होपीचा अर्थ आहे शांतताप्रेमी, सुसंस्कृत, सभ्य लोक. ईशान्य अरीझोनातील हे मूळ रहिवासी. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होपी हे नुसते नाव नाही तर ती एक वृत्ती आहे. पृथ्वीचा, निसर्गाचा, सर्व जगाचा सांभाळ करण्याची, त्या विषयी आदर बाळगण्याची वृत्ती. होपी असणे म्हणजे नैतिकता आणि नीतिमूल्यांचे जतन करणे. पृथ्वीचा रक्षणकर्ता मसावच्या सूचनांनुसार निसर्गाशी, सृष्टीशी तादात्म्य पावलेले होपी लोक. जमिनीला अत्यंत पवित्र मानणारे हे लोक. जमिनीला सीमेत बांधणे, तिचे तुकडे पाडणे आणि त्यावर मालकी हक्क सांगणे हे ह्या लोकांना माहितीच नाही.
नृत्याच्या ठिकाणी एक मातीचा चौथरा तयार केला होता. प्रथम सगळ्यांचे भले व्हावे म्हणून गायकाने केलेली मंत्रसदृश्य प्रार्थना, आळवणी.
पूर्ण जगाचे भले व्हावे म्हणून मंत्रसदृश्य गाणे म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्षणभर मनात उमटून गेले, हे तर होपी भाषेतील 'सर्वेपि सुखिन: सन्तु' च आहे!
नंतर एक तालवाद्य आणि एक तंतुवाद्य वापरून काही हेलांच्या आणि काही सुरांच्या साथीने होणारे नृत्य. नृत्याच्या पोशाखात पक्ष्यांच्या पिसांचा वापर खूप होतो. पावसासाठी, पीक चांगले यावे म्हणून किंवा त्या परमतत्वाशी जोडणारा एक दुवा म्हणून सगळ्यासाठी त्यांच्याकडे नृत्य आहे.
निसर्गाशी एकरूप होण्याचा भाव, कमीत कमी वाद्ये व कमीतकमी शब्दांच्या साथीने केलेले नृत्य पाहताना भारतातील आदिवासी नृत्याची आठवण येत होती. अखिल मानवजातीला जोडणारा एक अदृश्य धागा इथे क्षणमात्र आपले अस्तित्व जाणवून देतो हे खरेच.
#GrandCanyonNationalPark #GrandCanyonSouthRim #
#grandcanyon #arizona #travel #nature #usa #roadtrip #hiking #travelphotography #canyon #naturephotography #adventure #landscape #wanderlust #grandcanyonsouthrim #nationalparks #coloradoriver #visitarizona #lasvegas #explore #grandcanyonnps #landscapephotography #desert #america #vacation
#grandcanyon #arizona #travel #nature #usa #roadtrip #hiking #travelphotography #canyon #naturephotography #adventure #landscape #wanderlust #grandcanyonsouthrim #nationalparks #coloradoriver #visitarizona #lasvegas #explore #grandcanyonnps #landscapephotography #desert #america #vacation
Comments
Post a Comment