नुवारा एलीया हे श्रीलंकेतील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक सुंदर ठिकाण आहे. संपूर्ण वर्षभर तिथे प्रसन्न हवामानाचे वरदान लाभलेले आहे. थंड हवा आणि धुके हे तेथील वातावरणाला आगळे सौंदर्य प्रदान करतात. नुवारा एलीया नावाचा अर्थ आहे 'दिव्यांचे शहर' किंवा 'सपाट भागात वसलेले शहर'. आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात खरेच ह्या शहरातले दिवे लांबून दिसत असतील.
कँडी कडून नुवारा एलीया ला जाताना आम्ही श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोधा इथे भेट दिली. चिन्मय मिशन, श्रीलंका ह्यांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे. वेवन्दन पर्वतरांगांमध्ये, समुद्र सपाटीपासून ३२०० फुटांवर असलेले हे मंदिर व परिसर निसर्गरम्य आहे.
हे मंदिर मुख्य रस्त्याच्या जवळ आहे. अगदी चढाचा, गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे. नंतर मग थोडा चढ आणि पायऱ्या मात्र चढायला लागतात. आम्ही २०१३ मध्ये तिथे गेलो होतो, तेव्हा तरी तिथे लिफ्टची सुविधा नव्हती.
असे म्हणतात की हा तोच भाग आहे जिथे श्री हनुमान सीतामाईचा शोध घेत होते. ह्या मंदिरात हनुमानाची भव्य मूर्ती आहे. जवळपास १२-१५ फूट उंच अशी.
Sri Bhakt Hanuman Temple,Rambodha 📷Wikimedia Commons |
Sri Bhakt Hanuman Temple,Rambodha 📷Wikimedia Commons |
डोंगरावर असल्याने ह्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य फार सुंदर आहे. आजूबाजूचे डोंगर, हिरवाई, चहाचे मळे, नद्या, शांतता हे सर्व बघून मनाला पण खूप शांती मिळते.
Temple Premises 📷 Sneha Tilak |
जवळ रामबोदा नावाचे धबधबे आहेत. हे नाव मुळात रामबोधाच असावे. श्रीलंकेत विशेषतः नुवारा एलीया च्या परिसरात अनेक धबधबे आहेत. घनदाट जंगलात असलेला हा धबधबा साधारण ३५० फुटांवरून खाली कोसळतो आहे.
Ramboda 📷 Sneha Tilak |
ह्या धबधब्यापासून आणि मंदिरापासून अगदी थोड्या किलोमीटर अंतरावर नुवारा एलीया शहर आहे.
नुवारा एलीया शहरात अनेक सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत. मला नाव आठवत नाही आता, पण आम्ही उतरलो होतो ते हॉटेल म्हणजे मोठा, छानसा, दोन मजली बंगला होता. तिथेच जेवण, ब्रेकफास्ट अशी सोय होती.
हॉटेलकडे जाणारा रस्ता खूप अवघड होता. ड्रायव्हरला त्या भागाची माहिती होती म्हणूनच तो गाडी नेऊ शकला. अत्यंत अरुंद, बाजूला दरी असा तो रस्ता होता.
आमच्या हॉटेलचे प्रवेशद्वार होते, त्याच्या बाजूला बाग होती. त्या बागेला वळसा घालून आपण मागच्या बाजूला गेलो तर आपोआप हॉटेलच्या दुसऱ्या मजल्याच्या दारासमोर पोचायचो इतकी त्या रस्त्याला चढण होती!
Nuwara Eliya 📷 Sneha Tilak |
Post Office 📷 Sneha Tilak |
ही विटांची सुंदर इमारत म्हणजे १९ व्या शतकात बांधले गेलेले पोस्ट ऑफिस आहे. ह्या इमारतीच्या सौंदर्यामुळे आणि ती जुन्या काळातील असल्याने आंतरराष्ट्रीय तिकीट दिनाच्या वेळी ह्या इमारतीचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट काढण्यात आले होते.
सभोवतालचे चहाचे मळे, बागा, प्रसन्न सुखद हवा ह्यामुळे नुवारा एलीया हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आवडीचे सुट्टीत जाण्याचे ठिकाण होते. ह्याला 'मिनी इंग्लंड' असेही म्हटले जायचे.
आम्हाला मॅकवूडस लाबुकली नावाचा चहाचा कारखाना बघता आला. १८४१ मध्ये सुरु झालेला हा कारखाना खूप प्रसिद्ध आणि ह्या भागातील सर्वात मोठा कारखाना आहे.
चहा तोडणीपासून ते चहा तयार होण्याची प्रक्रिया आपण इथे बघू शकतो. शिवाय त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये चहा आणि केक खाण्याचा आनंद पण अनुभवू शकतो... अर्थात पैसे देऊन!!
असे म्हणतात की ह्या कारखान्यातून लंडनच्या शाही कुटुंबाला चहा पाठवला जातो.
Mackwoods LabookellieTea Factory 📷 Sneha Tilak |
कारखान्याच्या अवतीभोवती सगळीकडे चहाचे मळे, लहान लहान टेकड्या आणि डोंगर आहेत. फार सुंदर दृश्य आहे. जवळच एक झरा किंवा खरे तर लहानशी नदीच वाहते आहे.
Tea Plantations 📷 Sneha Tilak |
हे नुवारा एलीया जवळचे गायत्री मंदिर आहे. मंदिरातील मुख्य देवता गायत्री असली तरी तिथे १०८ शिवलिंगे देखील आहेत. रावणाचा मुलगा मेघनाद इथे शंकराची आराधना करायचा अशी आख्यायिका आहे.
Gayatri Temple 📷 Sneha Tilak |
ह्याच मंदिराच्या जवळ आम्ही खरे पारिजाताचे फुल पाहू शकलो. सुदैवाने तेव्हा फुलांचा ऋतू देखील होता. ते भलेमोठे झाड, वृक्षच अंगा खांद्यावर मोठाली पारिजाताची फुले वागवीत होता. तिथले पुजारी महोदय म्हणाले हे एकेक फुल झाडावर महिना महिना टिकते.
पण मनात हा खरंच पारिजात आहे का, अशी उत्सुकता होती. म्हणून शोध घेतला तर भारत सरकारच्या पोस्टाच्या तिकिटावर असेच पारिजाताचे चित्र आहे.
Parijata Flower 📷 Sneha Tilak |
नुवारा एलीया हे श्रीलंकेतील अत्यंत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे हे सतत जाणवत राहते. हिरवळीत गुरफटलेल्या टेकड्या, सुंदर शांत जलाशय, खळाळते झरे, उंचावरून कोसळताना तुषारांचा वर्षाव करणारे धबधबे, सगळेच फार सुंदर आहे. शांतवणारे आहे. शहराच्या मध्यभागी गजबज, वर्दळ आहे, पण ती देखील गुदमरवणारी नाही. अर्थात हे सगळे वर्णन २०१३ मधले आहे. संपूर्ण जगभरातच शहरीकरण वेगाने होते आहे. कदाचित नुवारा एलीया चे पण झाले असेल.
तिथे सीता एलीया मध्ये सीता अम्मन मंदिर आहे. इथेच सीतेला बंदिवासात ठेवलेले होते. इथे पहिल्यांदा हनुमानाला सीतामाई दिसली.
Seetha Amman Temple 📷 Sneha Tilak |
Seetha Amman Temple 📷 Sneha Tilak |
Seetha Amman Temple 📷 Sneha Tilak |
Seetha Amman Temple 📷 Sneha Tilak |
Seetha Amman Temple 📷 Sneha Tilak |
Sri Hanuman Footprints Seetha Amman Temple 📷 Sneha Tilak |
मंदिराच्या मागील झऱ्यात हनुमानाची पदचिन्हे देखील दाखवली जातात.
जिथे सीतेला बंदिवान करून ठेवलेले होते त्या परिसराला अशोक वन किंवा अशोक वाटिका म्हटले जात असे. आता ह्या परिसरात हकगल बोटॅनिकल गार्डन्स आहेत.
Hakgala botanical garden 📷 Wikimedia Commons |
कोणी म्हणतात की सिगिरियाला रावणाचा महाल होता. त्याविषयी आपण मागेच एका पोस्टमध्ये वाचले आहे. असे दिसतेय की रावणाचे अनेक ठिकाणी महाल होते.
त्यातील बरेचसे महाल हे गुहांच्या आणि भुयारी मार्गांच्या जाळ्याने जोडलेले होते. त्यामुळे रावणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जात येत असे.
आम्हाला रावणाचे असेच एक निवासस्थान पाहायला मिळाले.
Road to Ravan Ella Cave 📷 Sneha Tilak |
रावण एला गुहांकडे जाणारा रस्ता अगदी डोंगरातला, जंगलातला, चढणीचा असा आहे. कदाचित ज्येष्ठ नागरिकांना चढायला अवघड वाटू शकेल.
रावण एला गुहेच्या जवळच रावण धबधबादेखील आहे. त्या परिसरात अनेक धबधबे आहेत आणि त्यातल्या अनेकांना एकापेक्षा जास्त नावेदेखील आहेत!!
Ravan Falls 📷 Sneha Tilak |
रामायणाशी संबंधित असे अजून एक महत्वाचे ठिकाण आम्हाला बघायला मिळाले ते म्हणजे सीतेने जिथे अग्निदिव्य केले ती जागा.
Agneepariksha 📷 Sneha Tilak |
हे झाड बोधीगयेतील मूळ बोधीवृक्षाची फांदी आहे असे म्हटले जाते. तिथेच एक बुद्ध मंदिर आहे. मागे एक प्राथमिक शाळा आहे. आम्ही गेलो तेव्हा बहुतेक मधली सुट्टी होती. त्या मुलांचा चिवचिवाट चालू होता!
श्रीलंका निसर्ग सौंदर्याने समृद्ध असा देश आहे. हवा उष्ण आणि दमट आहे. लोक बोलके आणि मदत करणारे आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. पण आपल्याला इतका वेळ नसतो. त्यामुळे खाजगी वाहन करणे सोयीचे ठरते.
आम्ही कोलंबो ते कोलंबो असे एक वाहन भाड्याने घेतले होते. संपूर्ण श्रीलंका प्रवासात ती गाडी आमच्यासोबत राहिली. स्थानिक भाषा व सामाजिक व्यवस्था जाणणारा वाहनचालक सोबत असणे चांगले असते.
शुद्ध शाकाहारी किंवा व्हीगन अन्नासाठी आम्हाला तेव्हा शोधाशोध करायला लागली होती. अर्थात ही २०१३ मधील गोष्ट आहे. आता स्थिती सुधारली असेल अशी आशा आहे.
#ramayan #Srilanka #footstepsoframayana #ravanresidence #nuwaraeliya #travelinsrilanka #tipsfortravelinsrilanka #whattoseeinsrilanka #visitsrilanka #ellasrilanka #seetainsrilanka
👌👌👍
ReplyDeleteआपण पाहतो तो पारिजात काय आहे
ReplyDeleteछान माहिती मिळाली. धन्यवाद
ReplyDeleteछान माहिती मिळाली. धन्यवाद
ReplyDeleteफार उपयुक्त माहीती.
ReplyDelete