उदगमंडलम!! किती सुंदर नाव! उदग - उदक (संस्कृत) म्हणजे पाणी आणि मंडलम (संस्कृत) म्हणजे प्रदेश आहे. पाण्याचा प्रदेश! जर तुम्ही उदगमंडलमला भेट दिली तर लगेच तुम्हाला कळेलच की हे नाव किती योग्य आहे! या प्रदेशात आणि आजूबाजूला अनेक तलाव आहेत. आकाशात पाणी भरलेले, कधीही बरसायला तयार असणारे ढग आणि धुके..खरोखर उदगमंडलम नाव सार्थ आहे!
तामिळनाडू सीमेवरील, नीलगिरी डोंगरभागात राहणारे तोडा लोक हे त्या भागाचे मूळ रहिवासी होते. तोडा भाषेत ह्या ठिकाणाचे नाव 'ओथकल मुंड' होते, ज्याचा अर्थ विकिपीडियानुसार ओथकल म्हणजे पर्वत आणि मुंड म्हणजे घर आहे. अजून एक धारणा अशीही आहे की टोडा भाषेतील, ह्या गावाच्या नावाचा अर्थ म्हणजे ओथका - एक दगड आहे आणि मुंड म्हणजे गाव आहे!!
बाकी सगळी कथा नेहमीप्रमाणेच आहे. काही ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांना हे ठिकाण खूप आवडले. त्यांनी कोईमतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले की ही जागा स्वित्झर्लंडसारखी आहे! त्यावेळी जॉन सुलिवान हे कोईमतूरचे जिल्हाधिकारी होते. ते आले, त्यांनी पाहिले आणि ते ह्या गावाच्या प्रेमात पडले.
त्यांनी तोडा लोकांकडून ही जागा मिळविली आणि तेथे त्यांनी एक बंगला बांधला. ब्रिटिश लोकांना उदगमंडलम किंवा ऊटकमंड असे उच्चार करता येत नव्हते म्हणून त्यांनी त्या जागेचे नाव ऊटी असे ठेवले. हे ठिकाण लवकरच ब्रिटीश शासकांसाठी, उन्हाळ्या सुट्टीतील आवडते विश्रांतीस्थान ब नले.
होईसळा राजांच्या, विशेषतः विष्णुवर्धनच्या काळात, बाराव्या शतकात देखील या शहराचे संदर्भ सापडतात.
तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील, उदगमंडलम हे भारतीय पर्यटक तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे.ते का? त्याचे अगदी नेमके कारण सांगायचे तर वर्षभर आनंद देणारे नैसर्गिक सौंदर्य, पर्वत आणि टेकड्या, तलाव, नद्या, झाडे आणि फुले आणि ह्यामुळे होणारे आनंददायी वातावरण असे देता येईल.
उडगमंडलम हे आरामात बघण्याचे ठिकाण आहे. घाईगडबडीने पाहण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे इथे नाहीत. फक्त बोटॅनिकल गार्डन, गुलाबाच्या बागेतून फिरा, तलावांमध्ये नौकाविहारासाठी जा किंवा जंगलात चालत जा आणि पर्वतांवर ट्रेक करा!!
सर्वात जवळचा विमानतळ कोईमतूर आहे. म्हणून आम्ही जानेवारी २०१९ मध्ये उदगमंडलमला गेलो होतो तेव्हा मुंबईहून कोइमतूर विमान घेतले आणि मग टॅक्सीने उदगमंडलमला गेलो. रस्त्याची अवस्था चांगली आहे. रस्त्याने जाताना दिसणारे दृश्य साधारण असे आहे!
|
Coimbatore To Udagamandalam |
|
Coimbatore To Udagamandalam |
|
Coimbatore To Udagamandalam |
प्याकरा तलाव बोटिंग
प्याकरा नदीवर असलेल्या धरणामुळे प्याकरा तलाव तयार झाला आहे. तेथे एक जलविद्युत केंद्र देखील आहे आणि अनेक धबधबे पाहायला मिळतात. या प्रदेशात जवळपास ९ महिने पाऊस पडतो. प्याकरा तलावामध्ये नौकाविहार करणे किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या बागेत फिरणे, दुकानात खरेदी करणे म्हणजे उदगममंडलला भेट देणार्या पर्यटकांचे आवडते काम आहे.
Pyakra Lake 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!
तलावाभोवती उंच झाडे अगदी दाट जंगल असावे तशीच आहेत. तलावामध्ये मातकट रंगाचे पाणी आहे. बोटीच्या इंजिनचा आवाज खूप येतो व आजूबाजूच्या शांततेवर ओरखडे उमटवतो.
उदगमंडलममध्ये दोन किंवा तीन मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये आहेत. आमचा ड्रायव्हर आम्हाला वॅक्स प्लॅनेटमध्ये घेऊन गेला होता. त्यावेळी ते एक लहानसे ठिकाण होते. आपण ते १५ - २० मिनिटांत पाहू शकतो.
नीलगिरी पर्वतरांगांमधील हे सर्वोच्च शिखर आहे! ट्रेकर आणि छायाचित्रकारांच्या साठी तर हे स्वप्न आहे. पण इतरांसाठी देखील काळजीचे कारण नाही. कारण आपण कारने अगदी वरपर्यंत जाऊ शकता! आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे.
हे पर्यटक तसेच स्थानिकांचे आवडते ठिकाण आहे. म्हणूनच, जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर जावे लागेल. वेधशाळेमध्ये दुर्बिणी आहेत, परंतु दुर्बिणीतून पहाण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा निराश होण्याचे कारण नाही. इथून नुसत्या डोळ्यांनी दिसणारे दृश्य देखील अप्रतिम आहे!
समुद्र सपाटीपासूनची उंची आणि सभोवतालच्या डोंगरामुळे खुपदा थंडगार वारा वाहत असतो. अगदी भरदुपारी ऊन असतानाही, हवामान खरोखर थंड होऊ शकते. म्हणून त्यासाठी तयार रहा.
येथे एक रेस्टॉरंट आहे जेथे आपण पकोडा आणि चहा, कॉफी सारख्या गोष्टी खरेदी करू शकता.
उदगमंडलम वनस्पति उद्यान
ही प्रचंड मोठी बोटॅनिकल गार्डन म्हणजे बागकाम विभागाने देखभाल केलेले एक सरकारी उद्यान आहे. ह्या उद्यानाचे एकूण क्षेत्र ५५ एकर आहे. १८४० मध्ये भाजीपाला लागवड म्हणून सुरू झालेला हा उपक्रम, हळूहळू १८४७ मध्ये एका सार्वजनिक बागेत परिवर्तित झाला. तेथे हजारो प्रकारच्या वनस्पती आणि फुले आहेत. एका दिवसात संपूर्ण बाग पाहणे अशक्य आहे.
येथे विस्तीर्ण लॉन, कन्झर्व्हेटरी, ग्लास हाउसेस, नर्सरीज आहेत. मे मध्ये वार्षिक फ्लॉवर शो आयोजित केला जातो, जो वनस्पतीशास्त्र अभ्यासक आणि वनस्पती प्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. बागेतील काही दृश्ये अशी आहेत.
Government Botanical Garden 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!
उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरचा रास्ता संध्याकाळी गजबजलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत.
उदगमंडल रोज गार्डन
उदगमंडलममधील आणखी एक आकर्षण म्हणजे गुलाबांचे उद्यान. हे एल्क हिलच्या उतारावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या रोझ गार्डनपैकी एक आहे आणि ह्या उद्यानाला वर्ल्ड फेडरेशन ऑफ रोज सोसायटीजकडून गार्डन ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या उद्यानाला भेट दिल्यावर डोळे तसेच मनदेखील सुखावून जाते. गुलाबांचे रूप, रंग, गंध विविध प्रकारचे आणि आनंददायी! या उद्यानात गुलाबांचे 20000 हून अधिक प्रकार आहेत.
छायाचित्रकारांसाठी एक छोटीशी सूचना - सकाळी लवकर बागेला भेट द्या. अन्यथा दिवस मध्यान्हीकडे झुकायला लागला की सूर्यप्रकाशाने फोटो न्हाऊन मग उजेडामुळे वाहून जातात!! डोंगरउतारावर असल्याने, संध्याकाळी लवकर अंधार पडत असणार!
फुलांची नावे अतिशय मनोरंजक अशी दिलेली आहेत आणि ती वाचून आपल्या चेहऱ्यावर नक्की हास्य उमटेल! बागेत सुंदर सजावट केलेली आहे. पर्गोला आणि गुलाबवेलींच्या कमानी आहेत. माझ्याकडे या बागेची अनेक छायाचित्रे आहेत! त्यापैकी काही येथे देते आहे.
आम्ही क्लब महिंद्रा, डर्बी ग्रीन, उटी इथे राहिलो होतो. ह्या रिसॉर्टमध्ये खूप सुंदर फुले आणि सक्युलंटस आहेत, जागेची रचना उत्तम आणि सौंदर्यपूर्ण आहे. रेस्टॉरंट मध्ये मिळणारे अन्न चविष्ट आहे तसेच रिसॉर्टमध्ये एक छोटेसे दुकान देखील आहे.
त्यांच्याकडे रेस्टॉरंट मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतातच. पण जर का तुमची काही खास गरज वा पथ्य असेल आणि ते तुम्ही पुरेसे आधी सांगितले, तर नक्की त्याप्रमाणे ते तुम्हाला अन्न तयार करून देतात. आम्ही विगन आहोत असे सांगितल्यावर त्यांनी आमच्यासाठी फार चांगले विगन पदार्थ आणि पक्वान्ने केली होती.
जेव्हा आपण उदगमंडलममध्ये असाल तेव्हा आपण नैसर्गिक तेले आणि अर्क अवश्य खरेदी करा. आम्ही लेमनग्रास- गवती चहाचा अर्क विकत घेतला होता आणि तो फारच चांगला होता.
येथे अनेक चॉकलेटचे कारखाने आहेत. आपल्याला हाताने तयार केलेली, विविध प्रकारची चॉकलेटस देखील मिळू शकतात. शहरात आणि आजूबाजूला चहाचे कारखाने आहेत. शहराच्या बाहेर, डोंगर उतारांवर अनेक चहाच्या बागा दिसतात.
नीलगिरी माउंटन रेल्वे
१९०८ पासून कार्यरत असणारी ही सिंगल ट्रॅक ट्रेन आहे. हा खूपच संस्मरणीय व गतकाळाच्या स्मृती जागवणारा प्रवास आहे. हा प्रवास करताना, आपण टाइम मशीन मध्ये बसून ७०-८० वर्षे मागे गेलो आहोत असे वाटू लागते.
नीलगिरीचे चढ-उतार, बोगदे आणि वळणे ह्या सगळ्यामुळे हा प्रवास रोमांचक होतो. आपण ट्रेनमधून दिसणारी दृश्ये कधीच विसरणार नाही इतकी ती सुंदर आहेत. घनदाट जंगले, हिरव्यागार गवताने आणि झाडांनी आच्छादित उतार आणि धुक्यात दडलेल्या दऱ्या आणि डोंगर.. हा प्रवास खूप सुंदर आहे!
उदगममंडलम ते मेट्टुपालम पर्यंतचे अंतर ४६ कि.मी. आहे आणि डोंगर चढ उतारांमुळे ते पार करण्यासाठी जाताना ५ तास आणि परत येताना ३ तास ३० मिनिटे लागतात. ऊटी टुरिझम- नीलगिरी रेल्वेच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, मार्गावर १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ वळणे आहेत!
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आणि कालका शिमला या दोन इतर रेल्वेबरोबरच ही रेल्वेगाडी, जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे.
या प्रवासासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आपल्याला खूप अगोदरच बुकिंग करावे लागेल, प्रवासाच्या दोन किंवा तीन महिन्यांपूर्वीच करावे लागेल.ती तिकिटे अगदी पटकन, संपूर्ण बुक होऊन जाऊ शकतात.
Entry! 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!
उदगमंडलम हुन आम्ही ह्या ट्रेन ने कुन्नूर ला गेलो आणि तिथून मग टॅक्सी ने कोडाईकनाल ला गेलो. निलगिरी पर्वताला निळेपण देणाऱ्या कुंजीर फुलांविषयी तर मी सांगितलेच नाही. ते आता कोडाईकनाल च्या पोस्ट मध्ये लिहीन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, कोविड लस मिळायची वाट पहा!!
#ClubMahindraOoty #ToyTrainOoty #BotanicalGardenOoty #WaxPlanet #WhatToSeeInOoty #OotyTrip #UdagmandalamTrain #InAndAroundOoty #KunjirFlowersOoty
You made me nostalgic. I worked in ooty
ReplyDelete