या ठिकाणाहून आपल्याला चांदणीच्या किंवा स्टारफिश च्या आकाराच्या कोडाई तलावाचे एक सुंदर दृश्य दिसू शकते. हा तलाव मानवनिर्मित आहे आणि कोडाईकनालचा मध्यबिंदू आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष तलावाला भेट देता तेव्हा तलावाचा आकार सहज लक्षात येत नाही. परंतु जेव्हा आपण अप्पर लेक व्ह्यू पॉइंट वरून पाहता तेव्हा तलावाचा चांदणीसारखा आकार लगेच लक्षात येतो.
मोईर पॉईंट
कोडाईतील हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण अप्पर लेक पॉईंटपासून कारने 15/20 मिनिटांच्या अंतरावर आहे. सर मोईर यांच्या स्मरणार्थ ह्या ठिकाणाला नाव दिले गेले आहे. त्यांनी १९२९ मध्ये हा रस्ता तयार केला होता. आपल्याला रस्त्याच्या उदघाटनाप्रीत्यर्थ उभारलेला एक स्तंभ बघायला मिळतो.
इथून दिसणारे दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे आहे. एक मनोरा उभारलेला आहे. तिथून आपण देखाव्याचा आणि त्या सुखद हवेचा आनंद घेऊ शकता. येथे एक लहान पार्क आहे आणि जवळपास काही छोटी दुकाने आहेत.
मोईर पॉईंटपासून, गाडीने सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर आणखी एक सुंदर ठिकाण आहे. त्याचे नाव पाईन ट्री फॉरेस्ट. ह्या परिसरात शेकडो उंचच उंच पाईनचे वृक्ष उभे आहेत.
सगळा परिसर सुंदर आहेच. आपण आरामात फिरू शकता. जंगलात घोडेस्वारी आणि इतरही काही प्रकार मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत. पण केवळ स्वतः च्या आनंदासाठी, जनावरांवर स्वार होऊन प्रवास करणे, मी निषिद्ध मानते त्यामुळे मी पायीच चालणे पसंत केले.
ह्या जंगलात फिरणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. उंच भव्य झाडे इतकी उंच वाढत आहेत जणू आकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला काही सांगावा देत आहेत. काय असेल ते मातीच्या पोटात शेकडो वर्षे दडलेले गुपित? ते ह्या झाडांनी कशाला सांगितले असेल का?
आपल्याला जमिनीवर पाईनची शंकूच्या आकाराची शेकडो फळे विखुरलेली दिसतात. पाईनच्या झाडाच्या खोडांवर काही प्रकारचे Lichen, म्हणजे आपण मसाल्यात दगडफूल वापरतो तसे, वाढलेले दिसते.
झाडांच्या शेंड्यावरून आणि झाडांच्या मधून दिसणारे सूर्यकिरण खरोखर जादूई दिसतात. तिथे सगळे जगच वेगळे दिसते!!
तिथल्या लोकांचे म्हणणे आहे की जंगलात काही प्रकारच्या वनस्पती आणि मशरूम आहेत, जे खाल्ल्यास आपल्याला निरनिराळे भास आणि भ्रम होतात. पण त्या वनस्पती न खाताही, फक्त उंच झाडांच्या मुकुटांकडे, सूर्याच्या किरणांकडे, जमिनीवर विखुरलेल्या शंकूच्या आकाराच्या फळांकडे आणि लांबच लांब खोडांच्या रांगांकडे पाहणे हे देखील आपल्याला दुसर्या जगात घेऊन जाण्यासाठी पुरेसे असते!!!
|
मोडेन पण वाकणार नाही! |
|
Lichen |
पाइन जंगलापासून सुमारे 10 मिनिटांच्या अंतरावर 'गुना लेणी' नावाचे आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पूर्वी या जागेचे नाव 'डेविल्स किचन' असे होते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुना' या कमल हसन च्या चित्रपटाचे चित्रीकरण याच परिसरात करण्यात आले होते आणि तो चित्रपट अतिशय लोकप्रिय झाल्यामुळे ह्या जागेचे नाव गुना लेणी असे पडले.
घनदाट जंगलात, अतिशय उंच डोंगरमाथ्यावर तयार झालेल्या या गुहा आहेत. गुहा धोकादायक आहेत आणि अनेक हायकर्स गुहेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना मृत्यूमुखी पडल्यानंतर आता या लेण्या लोकांसाठी बंद केल्या आहेत. परंतु नुसते या ठिकाणी भेट देणे देखील थरारक आहे.
जुन्या शोला झाडाची मुळे जमिनीवर वाढलेली दिसतात. त्या मुळांच्यामुळे बनलेला चक्रव्यूह, ह्या ठिकाणाची उंची, शेजारची खोल दरी आणि धुके असे सगळे मिळून हे स्थान अगदी रहस्यमय बनवतात!
इथे जाताना थोड्या पायऱ्या आहेत आणि साधारण अर्धा एक किलोमीटर चालायला लागते प्रवेशद्वारापासून इथे पोचायला. मग नंतर इथे किती फिरलो ते कळत पण नाही!!
खरे तर ह्या गुहा थ्री पिलर पॉईंटच्या मागच्या बाजूला आहेत. इथून जवळच, गाडीने अगदी १० मिनिट अंतरावर थ्री पिलर रॉक्स व्यू पॉईंट आहे.
थ्री पिलर रॉक्स व्यू पॉईंट
भव्य, विशाल, अतिउंच, गगनचुंबी अशी सगळी विशेषणे लावू शकाल असे हे तीन प्रचंड मोठे खडक आहेत. ते खडक आणि लगतची खोल खोल दरी असे दृश्य कधी न विसरता येण्याजोगे आहे.
साधारण चारशे फूट उंच असे हे खडक धुक्याच्या आवरणाने लपेटले जातात. क्षणार्धात जोरात वारा येतो आणि धुक्याला बाजूला करतो. पण धुके काही ऐकत नाही. वारा जरा बाजूला झाला की धुके परत येऊन हजर होते. हा खेळ किती वेळ बघावा आणि त्याचे किती फोटो काढावे? कितीही तास असेच जाउ शकतात. आपण मंत्रमुग्ध होऊन अशा नैसर्गिक चमत्कारांचे नवल करत राहतो.
दिवसभर खूप उत्साहाने अनेक ठिकाणे बघितल्यावर थोडी विश्रांती तर हवीच. आम्ही ठरवले की चला, बोटीत बसून विश्रांती घेऊ या!
हे तळे कोडाईकनाल चा केंद्रबिंदू आहे. म्हणजे सगळे अंतर मोजले जाते ते तळ्यापासून!! हे तळे आणि जवळचे ब्रायंट पार्क ही दोन्ही अतिशय लोकप्रिय ठिकाणे.
तळ्याच्या भोवतीचा साधारण ५ किलोमीटरचा रस्ता, चालणारे, पळणारे, सायकलस्वार सगळ्यांचाच आवडता आहे.
चांदणीच्या आकाराचे तळे, त्यातली निळी कमळे, धुक्याची शाल पाण्यावर आणि सुखद वारा अंगावर असे हे नौकानयन अगदी आनंदाचे आहे.
ब्रायंट पार्क
सन १९०८ मध्ये या उद्यानाची आखणी करणाऱ्या वन अधिकाऱ्याच्या नावावरुन या उद्यानाचे नाव ठेवण्यात आले आहे. २० एकरांचा हा परिसर असून, त्यात विविध रंगांची फुले, फिरण्यासाठी सुंदर रस्ते, हिरवीगार लॉन आहे. जानेवारी 2019 मध्ये आम्ही कोडाईकनालला गेलो होतो तेव्हा उद्यानात काही दुरुस्तीचे काम चालू होते. उन्हाळ्यात पार्कमध्ये वार्षिक फ्लॉवर शो आयोजित केला जातो. बहुतेकदा मे महिन्यात असतो.
सायलेंट व्हॅली
सायलेंट व्हॅली, कॅप्स पॉईंट, बेरीजाम तलाव इत्यादी ठिकाणांना भेट देण्यासाठी वन विभागाकडून विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. दररोज काही मोजक्याच वाहनांना वनक्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी आहे. म्हणून तेथे लवकर पोहोचणे चांगले आहे अन्यथा त्या रस्त्यावर, या भागात जाण्यासाठी थांबलेल्या वाहनांची लांबच रांग लागलेली असते.
मला हे आवडले की अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी लोकांना वनसाक्षर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. बेरीजाम तलावाच्या रस्त्यावर सायलेंट व्हॅली आहे. जर हवा स्वच्छ असेल तर आपल्याला खूप खोल दरी दिसेल. ते नक्कीच खूप सुंदर दृश्य असणार. मात्र आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा दरी धुक्याने भरलेली होती!
कॅप्स फ्लाय व्हॅली
नावावरूनच लक्षात येईल की इथे खूप वारा असेल! हलक्या वजनाचे काहीही म्हणजे वाळके पान, टिश्यू पेपर, कॅप असे काहीही, तुम्ही दरीत फेकायचा प्रयत्न केला की बुमरँग सारखे ते परत तुमच्याकडे येते!
बेरीजाम लेक व्यू पॉईंट
आता ही सगळ्याच पर्यटन स्थळांची खासियत आहे. ज्या तळ्याच्या जवळ आपण जाणार आहोत, तेच रस्त्यातून लांबून दाखवायचे! माहितीपत्रकात ठिकाणांची संख्या वाढवायला असे करतात की काय कोणास ठाऊक? पण इथून दिसणारे दृश्य सुंदरच होते त्यामुळे पर्यटकांची देखील काही तक्रार नसेल!
बेरीजाम तलाव
कोडाईकनाल जवळील काही शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारा हा जलाशय आहे. तलावामध्ये बोटिंगला परवानगी नाही. हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने इथे सकाळी 9.30 ते संध्याकाळी 3.30 वाजेपर्यंतच प्रवेश करण्यास परवानगी आहे, तेही वनविभागाचा परवाना असेल तरच.
हे वनक्षेत्र वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे आणि इथे काही दुर्मिळ औषधी वनस्पती देखील आढळतात. नैसर्गिक सौंदर्यासह, ह्या भागातील शांततेमुळे हे ठिकाण मन मोहवते. इथे नक्की भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे.
प्रवेशद्वाराजवळ एक मंदिर आहे. वनक्षेत्रात संधी मिळालीच तर, आपण काही वन्य प्राणी पाहू शकता. या प्रदेशाचे वैशिष्ट्य असलेल्या निळ्या लिली ह्या तलावात भरपूर प्रमाणात आहेत.
संरक्षित क्षेत्राच्या बाहेर येऊन आता कोडाईकनाल शहरात परत जाउ या!
कोकर्स वॉक
हे कोडाईकनालमधील एक लोकप्रिय आकर्षण आहे. हा एक किंवा दीड किमीचा एक छोटा रस्ता आहे. कोडाई तलावाच्या अगदी जवळ हे ठिकाण आहे.
हा रस्ता पर्वत आणि दऱ्यांनी वेढलेला आहे आणि इथून अतिशय सुंदर दृश्य दिसते. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्यामुळे बर्याच वेळा इथे गर्दी असते. पण दरीच्या बाजूला चांगले कुंपण केलेले आहे, त्यामुळे रस्ता तसा धोकादायक नाही. रस्त्याच्या कडेला काही विक्रेतेही छोटी दुकाने थाटून बसलेले आहेत.
कोकर्स वॉक जवळच्या डोंगरउतारावर कुरिंजीची फुले दिसतात. ज्यांना कुरींजी फुले माहित नाहीत, त्यांच्यासाठी सांगते की , नीलगिरी पर्वताला हे नाव आणि निळा रंग देणारी ही फुले आहेत. नील - निळा आहे तो कुरींजीच्या निळ्या रंगामुळे आहे. ही फुले नीलगिरी पर्वताच्या उतारावर 12 वर्षानंतर एकदा फुलतात आणि संपूर्ण पर्वतरांगा निळ्या करतात!
आम्ही अगदी थोडक्यात ह्या सुंदर दृश्याला मुकलो. 2018 मध्ये, कुरिंजीची फुले ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात फुलली. या कुरिंजी फुलण्याचा उल्लेख पंतप्रधान मा. मोदीजी ह्यांनी त्यांच्या 'मन की बात' मधे देखील केला! असो. आता २०३० ची वाट पाहू या!
जरी आम्ही संपूर्ण फुलोरा बघण्याचा आनंद गमावला होता, तरी आम्हाला काही उशीरा फुलणारी फुले मात्र बघायला मिळाली. पण दुर्दैवाने माझ्याकडे कुरिंजी फुलांचा एकही फोटो नाही. का? का म्हणून काय विचारता? त्याच कोडाईकनालच्या प्रसिद्ध आणि सुंदर धुक्यामुळे.
बर्याच वेळा असे घडते की अवघ्या काही मिनिटांत, दरी धुक्याने भरुन जाते आणि समोरचे काहीही दिसत नाही. जेव्हा आम्ही कोकर वॉक ला चालत होतो तेव्हा आम्हालाही त्याचा आनंद घेता आला.
असे म्हटले जाते की कधीकधी आपण या रस्त्यावर चालत असताना एक अभूतपूर्व दृश्य दिसू शकते. आपल्याभोवती इंद्रधनुष्याचे वलय असलेली आपली छाया ढगांवर उमटलेली आपण पाहू शकतो. आम्ही मात्र इतके भाग्यवान नव्हतो!!
|
Peach blossom |
|
Coakers Walk |
कोडईकनालमध्ये बघण्याजोगी आणखीही काही ठिकाणे आहेत. तेथे जवळच काही सुंदर धबधबे आहेत. वेधशाळा, संग्रहालये, मंदिरे, ट्रेकिंग, फन पार्क, वॅक्स म्युझियम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडीनुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार त्यास भेट देऊ शकता.
कोडाईकनालमध्ये शाकाहारी भोजन मिळविणे ही काही मोठी समस्या नाही. आपल्याला दक्षिण भारतीय शाकाहारी चविष्ट पदार्थ मिळू शकतात. शहरातील तलावाच्या परिसरात, आपल्याला बरीच शाकाहारी रेस्टॉरंट्स सापडतील.
कोडाईकनालमध्ये राहण्यासाठी, खूप पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही 'ल पोशे क्लब महिंद्रा' येथे थांबलो होतो. यामध्ये विस्तृत जागा आहे आणि सुंदर लँडस्केप केलेले आहे. एकूणच, एक चांगली देखभाल केलेली अशी ही सुविधा आहे. परंतु आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक असल्यास, ज्यांना चालायला त्रास होतो असे, तर त्यानुसार खोल्या निवडा. खूप मोठे आवार असल्याने आणि अनेकदा वरखाली चढणाऱ्या उतरणाऱ्या पायऱ्या असल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. काही खोल्या आहेत, ज्या समतल भागात आहेत. त्या निवडाव्या लागतील. आम्ही मात्र ह्या ठिकाणी राहण्याचा पुरेपूर आनंद घेतला होता.
तुम्ही पुरेसे आधी सांगितले तर, ते तुम्हाला तुमच्या आवश्यकतेप्रमाणे अन्न तयार करून द्यायचा नक्की प्रयत्न करतात. आम्हाला त्यांनी खूप चविष्ट विगन अन्न आणि पक्वान्ने करून दिली होती.
कोडाई कनाल ला वेगवेगळी उत्तम फळफळावळ पिकते. ही प्लेट पण तुम्हाला तेच सांगते आहे बघा!
चला! आता घरी जायची वेळ झाली! आम्ही कोईमतूरपर्यंत कारने आलो आणि मग तिथून मुंबईचे विमान घेतले. कोडाई पासून कोईमतूरला जाणारा रस्ता तर चांगला आहेच, आजूबाजूला दिसणारे दृश्य देखील सुंदर आहे!
#ClubMahindra #KurinjiThe NeelgiriFlower # Mankibaat #GunaCaves #PlacesToVisitInKodaikanal #KodaiKanalInTwoDays.
छान! कोडाईकॅनाल बघताना छान वाटतच पण या प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उज्वल अशा लेखामुळे आणखी छान वाटले
ReplyDeleteखूप सुंदर फोटो आहेत, त्यामुळे सहल सुंदर होऊन जाते
ReplyDelete