बागेत अनेक मोठाले हॉल्स, छोट्या बागा व तळी आहेत. वेगवेगळे भाग आहेत. त्या भागांमध्ये वर ड्रॅगनची शिल्पाकृती असलेल्या भिंती आहेत.
|
The wall with rounded gates |
ह्या हॉल्सची नावे अतिशय काव्यमय आहेत, कदाचित त्या जुन्या चीनी कवितांच्या ओळी असू शकतात. काहींची नावे म्हणजे 'दहा हजार फुलांचे दालन', 'बिलो( गर्जना किंवा गडगडाट) ऐकण्याचा मंडप'!
बागेत काही विशेष संकल्पना घेऊन सुशोभित केलेले विविध भाग आहेत, उदा. विविध ऋतू. आमच्या गाईडने आम्हाला सांगितले की त्या काळी स्त्रियांना बाहेर जाण्याची परवानगी नसल्यामुळे, बागा अशा प्रकारे बनविल्या गेल्या की स्त्रिया घरात राहून देखील प्रत्येक ऋतूतील निसर्गाचे सौंदर्य उपभोगू शकतील.
या बागेत खडकांच्या विविध आणि उत्तम संरचना केलेल्या दिसतात. लाकडावरील कोरीव काम देखील फार सुंदर आहे.
चीनमध्ये प्राचीन काळी, घराचे डिझाइन, घरमालकाच्या दरबारातील हुद्द्यावर अवलंबून असायचे. घरात किती चौक असू शकतात, लाकडी फलकांवर कोणती रचना कोरली जाऊ शकते, छताचे डिझाइन कसे असेल, हे सर्व घटक घरमालकाच्या हुद्द्यावर अवलंबून असायचे. जर कोणी त्याविरुध्द गेला तर ती राजाशी प्रतारणा करण्याचा गुन्हा ठरवून त्या व्यक्तीस कठोर शिक्षा व्हायची.
|
Exquisite carvings |
|
Dragon walls |
|
Tea festival 2013 |
इतक्या शतकांच्या काळात बागांची मालकी बर्याच वेळा वेगवेगळ्या लोकांकडे गेली. ब्रिटिशांनी, चीनी विद्रोही आंदोलकांनी आणि जपानी लोकांनी लष्करी तळ किंवा शासन व्यवहारांचे कार्यालय म्हणूनदेखील ही बाग, त्यातील इमारती वापरल्या. बागेतल्या संरचना बर्याच वेळा नष्ट झाल्या. आज आपण पाहत असलेल्या बर्याच रचना नव्याने केलेल्या आहेत. बऱ्याच इमारती जुन्यासारख्याच पण नव्याने बांधलेल्या आहेत.
युयुआन गार्डन जवळच 'सिटी गॉड्सचे मंदिर' आहे. हे चौदाव्या शतकात बांधले गेलेले प्राचीन मंदिर आहे. गेल्या काही शतकात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचे रूपांतर झाले. पूर्वी हे इतर कोणते तरी मंदिर होते, नंतर ते सिटी गॉड्सच्या मंदिरात रूपांतरित झाले. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी मंदिर बंद करण्यात आले आणि त्या ठिकाणी दुकाने उघडली गेली. त्यानंतर, ते ताओ मंदिरात रूपांतरित झाले.
शांघायला भेट देणारे सर्व स्थानिक चीनी लोक ह्या मंदिरात नक्कीच भेट देऊन जातात. पर्यटक पण इथे मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते.
चीनी लोकांचा असा विश्वास आहे की मंदिरात प्रवेश करताना पुरुषांनी आपला डावा पाय प्रथम ठेवावा आणि स्त्रियांनी आपला उजवा पाय प्रथम ठेवावा. तुमचा गाईड तुम्हाला नक्कीच विचारेल की तुम्हाला याविषयी काय वाटते? असे करण्यामागे काय कारण असू शकते? उत्तर सोपे आहे, 'women are always right! - स्त्रिया नेहमीच योग्य असतात'!
कन्फ्यूशियस मंदिर
कन्फ्यूशियस ही चीनच्या इतिहासामधील एक प्रमुख व्यक्ती होती. ते तत्वज्ञानी, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म १५५१ बी.सी मध्ये झाला. त्यांचे मौलिक विचार आणि सिद्धांत आजही कन्फ्यूशियनिझम म्हणून प्रसिद्ध आहेत. चीन, कोरिया आणि जगातील इतर अनेक भागांत त्याचे अनुयायी आहेत.
शांघाय कन्फ्यूशियन मंदिर 13 व्या शतकात, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ असलेल्या कन्फ्यूशियसची पूजा करण्यासाठी बांधले गेले. त्यावेळी शांघाय एक लहानसे मासेमारांचे गाव होते. लवकरच हे मंदिर शिक्षणाचे केंद्र बनले आणि थोड्याच अवधीत ती चीनमधील सर्वात प्रतिष्ठित शिक्षण संस्था बनली.
या केंद्रात सरकारी नोकरीत, दरबारात नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असे.
बर्याच वेळा हे मंदिर विविध कारणांमुळे नष्ट झाले. कधी चीनी बंडखोरांचे हल्ले तर कधी परकीय सैन्याचे हल्ले. पण ते पुन्हा पूर्ववत बांधले गेले.
आज जेव्हा शांघाय ही चीनची व्यापारी राजधानी बनली आहे तेव्हा, इतक्या शतकांनंतरसुद्धा कन्फ्यूशियस मंदिर हे शांघायमधील एक प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळ आहे.
या मंदिर परिसरात अनेक मंडप, पॅगोडाज, ग्रंथालये, बागा आणि तलाव आहेत. तसेच दगडी कोरीव कामाचे अनेक उत्तम नमुने आहेत.
मंदिराकडे जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. असे म्हटले जाते की त्यातील एक मार्ग उपासकांसाठी आहे, एक विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एक ज्यांना सुंदर निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे!!
आपण चीनमध्ये असताना, तेथील टी हाऊसला भेट देणे हा एक विशेष अनुभव असतो. चीनमधील चहाचा सोहळा जपानमधल्या चहाच्या सोहळ्याइतका विधिवत नसतो. जपानमध्ये चहाचा सोहळा सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक अनुभवासारखा असतो. चीनमध्ये तो थोडा सांस्कृतिक आणि अधिक व्यावसायिक अनुभवासारखा वाटला! तिथे ते अनेक सुंदर कलाकृती तसेच विविध प्रकारचे चहा विकतात.
तिथे एक खास प्रकारचा चहा बघायला मिळाला. 'नाचणाऱ्या बाहुल्या' असे त्या चहाचे नाव होते. एक विशेष प्रकारची वनस्पती ग्लास मध्ये ठेवून त्यावर गरम पाणी ओतले की काही मिनिटातच ग्लासमध्ये बाहुल्या नाचू लागलेल्या पाहायला मिळाल्या.
|
Dancing Dolls! |
शांघाय वस्तू संग्रहालय
शांघायमधील बघायलाच हवे असे हे ठिकाण. हे पीपल्स स्क्वेअर पार्कमध्ये आहे आणि इथे प्राचीन चीनी कलाकृतींचा अद्भुत संग्रह आहे. १९९६ मध्ये बांधलेली ही पाच मजली इमारत आहे. यात बर्याच गॅलरीज आणि प्रदर्शने आहेत. पेंटिंग्ज, धातुकाम, लाकडी वस्तू, दगडांचे सामान, मौल्यवान रत्ने, शिल्पकला, सिरेमिक्स, चायनीज कॅलिग्राफी, नाणी, सीलस, शिल्पकला आणि इतर अनेक कला प्रकार इथे बघायला मिळतात. हे भव्य, दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असलेले व अतिशय चांगली व्यवस्था व निगा राखलेले असे संग्रहालय आहे.
|
Ancient Chinese Musical Instrument |
|
Twin bodied vase with enameled design of dragon and Phoenix |
अनेक दशके शांघायमध्ये फ्रेंच, पोर्तुगीज, अमेरिकन, ब्रिटिश भाग होते. शहराच्या त्या त्या भागात संबंधित देशाचा नियम आणि कायदा प्रचलित होता.
शांघाय शहराच्या मध्यभागी 'Xiantiandi' नावाचा एक समृद्ध भाग आहे. 'वाहनाला परवानगी नसलेल्या' ह्या भागात केवळ पादचारी मार्ग आहेत. अनेक सुंदर इमारती आहेत ज्या जुन्या आणि नवीन वास्तुकलेचे आश्चर्यकारक मिश्रण आहेत आणि ह्या भागात अगदी रोमँटिक वातावरण आहे. मला खात्री आहे कित्येक चीनी जोडप्यांचे फोटो ह्या भागातच काढले जात असतील! शांघायमध्ये राहण्यासाठी ही सर्वात महागडी जागा आहे. यामध्ये स्टाईलिश रेस्टॉरंट्स, सुंदर इमारती, कारंजे आहेत आणि रात्री बहरणारे क्लब्जदेखील आहेत.
|
Statues of Fortune, Prosperity and Longevity. |
|
outdoor Sitting in Xiantiandi |
ओरिएंटल पर्ल टॉवर
ही इमारत दिसली नाही असे होऊच शकत नाही! मी जेव्हा २०१३ मध्ये शांघायला पहिल्यांदा गेले होते तेव्हा शांघायमधील सर्वात उंच इमारतींपैकी ही एक इमारत होती. पण तेव्हाच इतर काही गगनचुंबी इमारतींचे बांधकाम चालू होते, ज्या पूर्ण झालेल्या, नंतरच्या ट्रीपमध्ये पाहता आल्या.
ह्या टॉवर मध्ये अनेक दर्शिका सज्जे आहेत. त्यातील सर्वात वरचा सज्जा आहे ३५१ मीटर म्हणजेच ११४८ फूट उंचीवर आणि ह्या सज्जाच्या बाहेरच्या भागाच्या तळाचा काही भाग पारदर्शक काचेचा आहे.
मी गेले होते तेव्हा आधी माझे जमिनीकडे लक्षच नव्हते. मी आरामात आजूबाजूला दिसणारे दृश्य पाहत होते. पण एकदा जमिनीकडे लक्ष गेले आणि इतक्या उंचावरून, पारदर्शक काचेतून दिसणारे, खालचे दृश्य पाहून नंतर मात्र घाबरगुंडी उडाली होती. अक्षरश: पुढचे पाउल उचलायला देखील खूप धीर गोळा करावा लागला!! अज्ञानात आनंद असतो म्हणतात ते हेच असावे बहुधा!
द बंड
बंड परिसर म्हणजे शांघायचे हृदय आहे. अनेक तरुण लोकांचे भेटण्याचे, फिरायचे ठिकाण आहे. नदीच्या बाजूचा हा परिसर आहे आणि अनेक प्रसिद्ध उत्तुंग इमारती आपल्याला इथून दिसतात. मी पहिल्यांदा गेले तेव्हा शांघायमध्ये अनेकदा असणारे प्रदूषण आणि धुके मला अनुभवायला मिळाले! त्यामुळे सगळे फोटो धूसर आहेत.
|
Monument Of People's Heroes Shanghai |
जरी प्रदूषण असले, सगळे धूसर दिसत असले तरीही संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी ही फार सुंदर जागा आहे.
शांघाय मध्ये अजूनही पुष्कळ काही पाहण्या, अनुभवण्या, लिहिण्याजोगे आहे. शांघाय टॉवर आहे, जवळच असलेली सुंदर सुंदर गावे आहेत. त्याविषयी परत कधीतरी लिहीन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.
#Chinasmoneypurse #TopMostCommercialCityInChina #Shanghai #FinancialDistrict #ShenCheng #PearlOfTheOrient #KongFuzi #JiaDing #TopThingsToSeeInShanghai
Comments
Post a Comment