ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती.
सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच. देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले.
|
📷Cotrekker |
|
📷Sumati Dhembre |
ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल. (सर्वात उजव्या कोपऱ्यात लाल शर्ट मधील मला पाहायला विसरू नका!!) इतका चढ दिसत असला तरी हा दिवसातील सर्वात सोपा भाग होता किंवा आम्ही नुकतीच चालायला सुरुवात केली होती म्हणूनही तसे वाटत असेल. डोंगरकडयांवरून आम्ही चालत असल्याने दोन्हीकडची विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता.
|
📷Preeti Thakur |
जंगलातील पायवाट अधूनमधून दगडांनी सुनिश्चित केलेली होती. त्यातच मध्येच झाडांची मूळे येत होती. ऱ्होडोडेंड्रॉनची अनेक झाडे फुललेली होती. आमच्या टीम खेरीज दुसरे कोणीही दिसत नव्हते.
|
📷Sumati Dhembre |
इतकी चिंचोळी वाट होती. पण त्या दिवशी चालताना तसे विशेष जाणवले नव्हते. फक्त आम्हाला सूचना दिलेली होती की इतकी अरुंद जागा असेल तेव्हा वॉकिंग पोल टेकतांना डोंगराच्या बाजूला टेकायचा, दरीच्या नाही. कारण तिथे पानांखाली पोकळ जागा असेल तर दिसणार नाही आणि काठी घसरेल.
|
📷Preeti Thakur |
खरे तर कॅम्पमधून निघून पाऊणतासच झाला होता. पण इतके चढ उतार पार केल्याने बॅगसकटच दोन मिनिटे थांबलो होतो. हा एवढा चढ चढून गेलो की मग झंडी टॉप आलेच असते. तिथे असणार होता आमचा विश्रांतीचा टप्पा.
लवकरच झंडी टॉप आले. हवा स्वच्छ असती तर इथून हिमाच्छादित शिखरे दिसली असती. पण आज खूप ढग होते.
|
📷Sumati Dhembre |
|
📷Samrat Darda |
आम्हाला वाटेत खाण्यासाठी खाऊ म्हणून रोज एक सफरचंद आणि चणे, फुटाणे, खारका दयायचे!!संधी मिळाली की आधी सफरचंद खाण्याचे कारण म्हणजे तेवढीच बॅग हलकी होते आणि पाठीवर कमी ओझे वाहायला लागते!!आम्ही जिथे थांबलो होतो त्या ठिकाणालाच झंडी टॉप म्हणतात. नंतर कळले की त्या भागात टेकडीवरच्या सर्वात उंच ठिकाणाला झंडी टॉप किंवा झंडी धार म्हणतात. म्हणजे कदाचित असे अनेक झंडी टॉप प्रत्येक ट्रेकवर असतील!!
|
Jhandi Top 📷Supan Shah |
झंडी टॉपहुन निघाल्यावर रस्ता अधिक सुंदर झाला. जंगल अधिक घनदाट झाले. माथ्यावर झाडे झुलत होती. त्यांच्या पानांचे रंग विलोभनीय होते. ही बहुतेक भारतीय मेपलची झाडे असावीत. रस्त्यावर माती दिसतच नव्हती. झाडावरून गळून पडलेल्या वाळलेल्या पानांच्या पायघड्या होत्या. त्यात मध्येच कुठे गवतफुले फुललेली होती. कुठे कुठे ऱ्होडोडेंड्रॉनच्या पाकळ्या दिसत होत्या. |
📷Kedar Tembe |
|
राह बन जाये जब मंजिल 📷Samrat Darda |
कॅम्पमधून निघाल्या पासून आता जवळपास तीन तास झाले होते. सतत चढ उतार करून दगदग तर नक्कीच होत होती. पण समोर दिसणारे दृश्य असे असेल तर थकवा का जाणवेल? |
📷Supan Shah |
आता पुन्हा एकदा सगळीकडे ऱ्होडोडेंड्रॉन्स फुललेले दिसू लागले. त्यांचा आनंद घेणार इतक्यात पावसाला सुरुवात झाली. सगळ्यांची रेनकोट घालणे आणि बॅग कव्हर करणे ह्याची धावपळ झाली. पावसाने हात देखील गारठून गेले होते. त्यात रस्ता सतत चढ उताराचा.
|
📷Samrat Darda |
|
📷Samrat Darda |
असा चढाचा रस्ता पावसात पार केल्यावर आला पुन्हा उतार!! आज इतक्या तासात सपाट रस्ता फारच क्वचित मिळाला. |
📷Preeti Thakur |
चोहीकडे फुललेली लाल गुलाबी जांभळट फुले, त्यांच्या पाकळ्या गळून वाटेत पडलेल्या... ह्या सौंदर्यापुढे चढण उतरण ओलांडणे,पाऊस, दमणे सगळे क्षुल्लक होते! 'फूल खिलते रहेंगे दुनियामे ..रोज निकलगी बात फुलोंकी' ह्याच ओळी सतत आठवत राहिल्या.
पाऊस कमी झाला. तुलनेने थोडा सपाट भूभाग आला आणि मग आमची दुपारच्या जेवणाची जागा ठरली. आता कॅम्पमधून निघून पाच तास झाले होते. जेवणात आमच्या सोबतीला म्हणा किंवा राखणीला म्हणा दोन कुत्रे हजर होते. |
📷Cotrekker |
जेवणांनंतर परत चालायला सुरुवात केली. अजून बरीच मजल बाकी होती. पुन्हा उताराचा आणि चढाचा सिलसिला चालू राहिला. बऱ्याच वेळानंतर मग एक पठार आले.. सुप्रसिद्ध रोहिणी बुग्याल.
|
📷Cotrekker |
आता हा आमचा फोटो बघताना डिस्कव्हरी चॅनल बघतो आहोत असे वाटते. इतक्या विस्तीर्ण पठारावर आम्ही चालतो आहोत ते फक्त ठिपक्यांसारखे दिसतो आहोत. निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे ह्याची अगणित वेळा झालेली जाणीव पुन्हा एकदा नव्याने होते आहे.
|
📷Gravit Jain |
फार वेळ बसून चालणार नव्हतेच. अजून स्यालमी कॅम्पसाईट लांब होती. पुन्हा एक तीव्र चढ पार केला आणि मग आला अतिशय तीव्र उतार. आडवे आडवे पाऊल टाकत उतरले तरी तोल सावरताना पाय थरथरू लागले होते असा उतार. पावले ठाम होती पण त्यांच्यावरचे पाय मात्र थरथरत होते. म्हटले मी त्यांना ," असं करून कसं चालेल? पावले नेतील तिकडे जायलाच लागेल नं? मग थरथरायचे कशाला?" पण माझ्या counselling skills ची पायांनी पार ऐशी की तैशी केली आणि उतार संपेपर्यंत थरथरणे काही त्यांनी थांबवले नाही. एकच गोष्ट चांगली होती की थरथरत का होईना त्यांनी आपला वेग फारसा कमी केला नव्हता. त्यामुळे मी सर्वांच्या सोबतच राहू शकले. मागे पडले नाही. अर्थात उतरताना किंवा चढताना कधी हात द्यायला लागलाच तर केदार होता, ट्रेक लीडर साहिल होता, आमचे ट्रेक गाईड्स अमितजी आणि प्रमोदजी होते.
एक महत्वाचा धडा त्या दिवशी मिळाला की इतके तीव्र चढ उतार असतील त्या वेळी नी कॅप्स घालायला हव्या. मग दुसऱ्या दिवशीपासून नीकॅप्स घालायला सुरुवात केली आणि चढणे उतरणे खूपच सोपे झाले.
तसेच तुम्ही फोटोमध्ये आमच्या हातात वॉकिंग पोल्स पाहत असाल. त्याचा पण खूप फायदा होतो. स्यालमी कॅम्पसाईट वरून दिसू लागली आणि उरलेला उतार पटापट संपला.. किंवा निदान तसे वाटले तरी!!!
|
📷Sumati Dhembre |
|
📷Supan Shah |
आज आम्ही साधारण सात साडेसात तास चाललो होतो. खरे तर अंतर तसे ९. १ किलोमीटरच होते. पण सतत चढ आणि उतार आणि त्यात जंगलातल्या डोंगरवाटा त्यामुळे इतका वेळ लागला. अनेकदा उंचावर जात आणि नंतर उतरत अखेर आम्ही कालच्या कॅम्पपेक्षा दोनशे फूट खालीच आलो होतो.
|
📷Supan Shah |
त्या दिवसाविषयी आठवताना मी विचार करते की त्या दिवसाने मला काय दिले? संपूर्ण रस्ता कष्टप्रद होता हे तर खरेच. एरवी जे डोंगराचे चढ आणि उतार चित्रात, फोटोत किंवा लांबून बघताना मोहक वाटतात ते प्रत्यक्ष चालताना आपली फजिती करतात हे अनुभवले.
शिखरे दिसणार होती ती ढगाळ हवामानामुळे दिसली नाहीत. पक्षी दिसणार होते तेही पावसामुळे विशेष दिसले नाहीत. एक सुतार पक्षी दिसला तेवढाच. इतर ऋतुत ह्याच ट्रेकला आले असते तर कदाचित ते सगळे दिसले असते. पण आत्ता मला फुले दिसली त्याचे काय? ती कशी इतर वेळी दिसली असती? तेव्हा जे मिळाले नाही त्या विषयी खंत करत न बसता, जे मिळाले आहे त्याचे मोल जाणण्याचा धडा पुन्हा एकवार मिळाला.
'चरैवेती चरैवेती येही तो मंत्र है अपना' हे वारंवार स्वतःला सांगता आले.
एका दिवसांत खूप काही शिकता आले. आमच्या टीममध्ये मी सर्वात मोठी. त्यामुळे दोन दिवस माझा उत्साह, निश्चय आणि फिटनेस चे भरपूर कौतुक झाले होते. पण थरथरलेल्या पायांनी मला माझी खरी जागा दाखवली!! आणि त्या कौतुकाला खरेच पात्र व्हायचे असेल तर भरपूर व्यायाम सातत्याने करायला हवा हे ही शिकवले.
इतकेच काय कॅम्पवर आल्यावर मी स्नेहाला म्हटले सुद्धा ," मी इथेच थांबवू की काय ट्रेक?" अर्थात पुढे जायचे थांबवले असते तरी त्या कॅम्पवर कोणतेही वाहन येणे शक्यच नव्हते. आम्ही अगदीच दुर्गम ठिकाणी होतो. त्यामुळे तिथून कुठेतरी भरपूर चालत जाऊन मगच परत बेसकॅम्पवर जाता आले असते. पण स्नेहा म्हणाली,
"उद्याचा दिवस चाल .. मग बघू या!!!"
उद्याचा दिवस खूप छान असणार होता. संपूर्ण वाट घनदाट जंगलातूनच जाणार होती. शिवाय एक नदी लागणार होती.
#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking #travel #motivations #indiahikes #Baniyakund #Syalmi
Comments
Post a Comment