लुआंग प्रबांग एकदम संथ, शांत जीवनशैलीचे शहर आहे. इथे आल्यावर तुम्हाला तर वाटेल की जणू तुम्ही 1970च्या दशकात आहात! जीवनाची संथ गती, कमी गर्दीचे रस्ते, वैभवशाली संस्कृती व स्थापत्य, वातावरणातील अध्यात्मिकता, सुस्वभावी लोक आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या सर्वांमुळे लुआंग प्रबांग अगदी अनोखे शहर वाटते. लुआंग प्रबांगच्या जुन्या शहर भागातून निवांत फेरफटका मारणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. या भागातील इमारती आणि कॉफी शॉप्स पाहून लुआंग प्रबांग ही फ्रेंच वसाहत होती त्याची आठवण होते.
|
लुआंग प्रबांग
(From Pikist.com) |
|
चुली वरचा स्वैपाक! |
|
सुंदर मंदिरे |
|
सजावट
|
|
बौद्ध भिक्षु |
|
फुलं घ्या फुलं ..देवासाठी फुलं!!
|
बौद्ध मंदिरे सगळीकडे, अगदी पावलोपावली दिसतात.
|
Wat Sensoukhram
|
|
एका मंदिरातील बुद्धाची सोनेरी मूर्ती
|
|
That Makmo - Watermelon Stupa
|
|
पूजाविधीतील एक भाग
|
|
धर्म समर्पित तरुण
|
|
उच्च शिक्षण !! अभ्यास असा करायचा असतो!!! उंच भिंतीवर बसून..म्हणजे ते उच्च शिक्षण होते !!! |
मुळात लुआंग प्रबांग या नावाचा अर्थच मुळी रॉयल बुद्ध मूर्ती असा आहे. बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षू ह्या शहराला एक वेगळीच शांतता प्रदान करतात.बौद्ध भिक्षूंनी शहरात हिंडून भिक्षा मागायची ही इथली जुनी पद्धत आहे. शंभराहून जास्त बौद्ध भिक्षु पहाटेच मंदिरातून दीक्षा मागण्यासाठी निघतात. त्यांच्या रस्त्यावर भाविक लोक आधीपासूनच भिक्षा घेऊन तयार असतात आणि फोटो काढायला पर्यटक पण तयार असतात.
|
भिक्षाफेरी (From Pixabay)
|
Haw Kham किंवा Ho Kham नावाचा राजप्रासाद आता वस्तु संग्रहालयात रुपांतरीत झालेला आहे. आवर्जून बघायलाच हवे असे हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला लाओसच्या इतिहास आणि संस्कृती बद्दल खूप चांगली माहिती मिळेल. या आवारात अनेक राजेशाही इमारती आहेत, तसेच त्यांचे म्हणजे राजघराण्याचे वैयक्तिक वापराचे भाग देखील आहेत. जरी राजघराण्यातले लोक आता तिथे राहत नसतील तरी तो भाग, जणू काही ते तिथे राहातच असावेत, असाच ठेवलेला आहे. एका दारावर ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती आणि इंद्र यांच्या मूर्ती दिसतील. एका शिल्पात महेंद्र पर्वत आणि गंगा पण दिसेल!
पूर्वी लाओस, कंबूज (आत्ताच्या कंबोडियातील अनेक शतकांपूर्वी असलेल्या) ह्या हिंदू साम्राज्याचा एक भाग होता. त्यामुळेच आपल्याला इथे अनेक हिंदू देवदेवतांची चित्रे दिसतील. तसेच अनेक संस्कृत नावे पण आढळतील उदाहरणार्थ जयवर्मन, हरिहरालय, श्रेष्ठपुरा, द्वारावती. लाओसमध्ये अजूनही आपल्याला भारतीय धर्म, कला, संस्कृती आणि वास्तुशास्त्र ह्यांची छाप दिसते.
Pra Lak Pra Ram हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे आणि ते वाल्मिकी रामायण वर आधारलेले आहे. इथेही जरी रामच नायक असला तरी लक्ष्मणाचे नाव आधी येते. त्यामागचे कारण असे की रामाला राजा म्हणून जे करणे आवश्यक होते ते त्याने केले पण लक्ष्मणाने मात्र स्वतःच्या इच्छेने त्याच्याबरोबर वनवास स्वीकारला तसेच आयुष्यभर त्याला साथ दिली. त्याबद्दल गौरव म्हणून लक्ष्मणाचे नाव आधी येते!
या महाकाव्यात ते दोघं राजा Thattarathह्याचे पुत्र आहेत. ह्या काव्यात Nang Sida आहे,जिला लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे. इथे monkey Hanoumane आहे, जो त्यांना Sida चा शोध घ्यायला आणि युद्धातही मदत करतो. लाओसमध्ये लोक मानतात की रामायण हे जातक कथा आहे!
Wat Mai Suwannaphumaham (Mai Souvana Phoun Ram) हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. कारण मधल्या अशांततेच्या काळात, दीर्घकाळ पर्यंत ह्या मंदिरात प्रबांगची मूर्ती राहिलेली होती आणि शिवाय त्यावेळी हे मंदिर राजघराण्याचे मंदिर म्हणून पण कार्यरत होते.
इथे रामायण कथेतील चित्रे लाकडी भिंतींवर, सोनेरी पत्र्याच्या प्लेटिंगवर चित्रीत केलेली आहेत. हे नक्कीच लुआंग प्रबांग मधील चित्तवेधक मंदिर आहे आणि आणि त्यामुळे अर्थातच सर्वात जास्त लोक आणि प्रवासी ह्या मंदिरात जातात आणि फोटो काढतात.
|
सीता
|
|
राम, लक्ष्मण, सीता |
राजवाड्याच्या परिसरात Haw Phra/Pra Bang याचे मंदिर आहे. ही तीच मूर्ती जिचे नाव शहराच्या नावा सारखेच आहे. लुआंग म्हणजे शाही आणि प्रबांग म्हणजे बुद्धाची सोनेरी मूर्ती. लाओसच्या इतिहासात या मूर्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
|
Haw Pra Bang
|
|
एकाग्रता !! देवळाच्या दुरुस्तीचे आणि सौन्दर्यीकरणाचे काम चालू होते.
|
रॉयल म्युझियम परिसरातील हॉल मध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून बघावा असाच आहे. इथे तुम्हाला लाओ संस्कृतीची एक झलक पाहायला मिळेल. या Royal Ballet theatre मध्ये बहुतेकदा Phra Lak Phra Lam ही नृत्यनाटिका चालू असते. ही माहिती वाचून तुम्हाला या नृत्यनाटिकेविषयी उत्सुकता वाटत असेल तर ह्यातील काही भाग तुम्ही युट्युब वर देखील बघू शकता.
|
Royal theatre cultural show
|
|
रोयल थियेटर, लुआंग प्रबांग
|
Pak Ou Caves
चुनखडीच्या खडकात असलेल्या, एकावर एक अशा या दोन गुफा आहेत. लुआंग प्रबांगहुन इथे जाण्यासाठी मेकॉन्ग मधून बोटीने जायला लागते. या प्रवासात अत्यंत मनोहारी असे सृष्टीसौंदर्य बघायला मिळते.
या गुहांमध्ये बुद्धाच्या अक्षरशः हजारो मूर्ती ठेवलेल्या आहेत. ह्या गुहातून जलदेवतेचा वास आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे अनेक शतके, खरेतर जवळपास दोन हजार वर्षे हे एक पूजास्थान म्हणून मानले गेलेले आहे.
|
Pak Ou caves - मधून दिसणारी नदी
|
|
गुंफेकडे जाणारा मार्ग
|
|
वरच्या गुंफेकडे जाण्याचा मार्ग
|
काही छोटी गावे पारंपरिक लाओ पद्धतीच्या गावांप्रमाणे अजूनही ठेवलेली आहेत. पर्यटक त्यातील काही गावांना भेट देऊ शकतात. तिथे जाण्यासाठीही बोटीनेच जावे लागते.
|
बोटीसाठीचा पेट्रोल पंप! |
|
राइस वाईन तयार होते आहे.
|
|
भाजलेली केळी
|
|
जाता जाता खायला खाऊ!
|
|
केशरचना |
अर्थातच बाजारातून स्थानिक कलाकुसर खरेदी करण्यास तुम्ही विसरणार नाहीच! हातमागावर तयार केलेली वस्त्रप्रावरणे तसेच स्थानिक लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या सगळ्यांनी बाजार ओसंडून वाहत असतो.
|
लुआंग प्रबांगच्या बाजारातून घेतलेली विणलेली
सुंदर शाल
|
Mount Phousi वर चढून संपूर्ण गावाचे मनोरम दृश्य पाहणे आणि अत्यंत सुंदर अशा Tat Kuang Si धबधब्यांना भेट देणे अजिबात विसरू नका. ही दोन्ही ठिकाणे बघायचे आमचे राहूनच गेले आहे.
|
Kuang Si waterfall (from Pixabay)
|
आता नेहमीचे पर्यटकांचे प्रश्न
लुआंगप्रबंग स्वस्त आहे का?
नाही, स्वस्त नाही. विशेष करून तुम्हाला हे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर लक्षात येईल! रस्त्यांवर खूप सगळे स्थानिक अन्न अगदी स्वस्तात विकायला असते.
पण ते व्हिगन आहे का किंवा शाकाहारी आहे का हे तुम्हाला कळणार नाही. जर का नशिबाने एखादा दुकानदार तुम्हाला इंग्रजी बोलणारा भेटलाच तर तुम्हाला नक्कीच स्वस्त स्थानिक अन्न खाता येईल. पण नाही तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांना विशेष रेस्टॉरंटमध्ये जायला लागेल.ती महाग जरूर आहेत पण तिथले अन्न मात्र अत्यंत चविष्ट आहे. आग्नेय आशियातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असल्याने लुआंग प्रबांगला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते.
लुआंग प्रबांग सुरक्षित आहे का?
तुम्ही ऐकले असेल की लाओस हा जगातील सर्वात जास्त बॉम्ब टाकले गेलेला देश आहे. व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला लाओसवर जबरदस्त बॉम्ब हल्ले झाले.
किती बॉम्ब टाकलेले असतील? सरासरीच काढायची तर दर आठ मिनिटाला एक. आणि असे किती दिवस? तर दिवसाचे चोवीस तास, अशी नऊ वर्ष. त्यातले कित्येक न फुटलेले बॉम्ब अजूनही लाओस मध्ये सापडतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन नांगरताना किंवा ग्रामीण भागातील मुलांना खेळताना ते बॉम्ब सापडतात आणि त्यांना काही कळायच्या आत ते बाँम्ब फुटून लोक जखमी होतात.
मी वाचले आहे की अजूनही सरासरी लाओसमधील रोज एक माणूस ह्या बॉम्ब मुळे मरतो आहे. असेही म्हणतात कि लाओस पुन्हा पूर्णपणे सुरक्षित व्हायला, या बॉम्बच्या भीती तून मुक्त व्हायला अजून दोनशे वर्षे लागतील. दोन महासत्तांमध्ये झालेल्या शीत युद्धाचा एका तटस्थ देशावर झालेला हा महाभयंकर परिणाम आहे. पण अर्थातच तिथे पर्यटक म्हणून गेल्यावर तुम्ही अशा आडबाजूच्या जागांना जाणार नाही आणि त्यामुळेच लाओस आणि लुआंग प्रबांग हे प्रवाशांसाठी सुरक्षित आहे.
आपल्या समृद्ध वास्तुशैलीच्या आणि कलात्मकतेच्या वारश्यामुळे लुआंग प्रबांग खूप विलक्षण शहर आहे. शहरात फ्रेंच वास्तुशैली आणि पारंपारिक लाओ वास्तुशैलीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. हा सर्वच वारसा अतिशय चांगल्या तऱ्हेने जतन केला गेलेला असल्यामुळे, युनेस्कोने लुआंग प्रबांग ला विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
Wa varnan vachun pherphtaka maralyacha Anand miltoy
ReplyDelete