नुकतेच आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे लाओ PDR च्या पंतप्रधानांबरोबर covid-19 नंतरच्या काळातील जगा समोरील आरोग्य विषयक आणि आर्थिक आव्हाने याविषयी फोनवर संभाषण झाले. त्यावेळी लाओ PDR च्या विकास कार्यक्रमात असलेल्या भारताच्या सहभागाबद्दल लाओ PDR च्या पंतप्रधानांनी भारताला धन्यवाद दिले. Vat Phou हिंदू मंदिराच्या संरक्षण प्रकल्पात देखील भारताचा सक्रीय सहभाग आहे. हे एक पाचव्या किंवा सहाव्या शतकात बांधले गेलेले पुरातन शिवमंदिर आहे.
चीन आणि लाओस मधील रेल्वे मार्गाचे मेकोंग वरील लुआंग प्रबांग जवळील खांब बांधून पूर्ण झाले अशी बातमी जेव्हा एप्रिलमध्ये वाचली तेव्हापासून मला वाटायला लागले की लुआंग प्रबांग किती बदलेल या रेल्वे मार्गा मुळे आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे! तर त्याच्या आधीच मी पूर्वी ते कसे होते त्याच्या विषयी लिहायला पाहिजे.
काय आहे लुआंग प्रबांग आणि कुठे आहे?
तर लुआंग प्रबांग हे लाओस मधील एक अत्यंत रमणीय असे शहर आहे. लाओस देश सर्व बाजूंनी जमिनीने आणि वेगवेगळ्या देशांना वेढला गेलेला आहे. जर का तुम्ही जगाचा नकाशा बघाल तर तुमच्या लक्षात येईल की लाओस च्या सगळ्या बाजूनी थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना असे देश त्याचे शेजारी आहेत आणि समुद्र किनारा न लाभलेला असा आग्नेय आशिया तील तो एकमेव देश आहे
भूमीने वेढलेला लाओस (छायाचित्र नेटवरून साभार ) |
आम्ही लुआंग प्रबांग ला डिसेंबर २०१२ मध्ये गेलो होतो. त्यावेळी लुआंग प्रबांग चा विमानतळ म्हणजे एक मोठा हॉल होता..बास! अगदी मोजक्या फ्लाइट्स.. माझ्या आठवणीप्रमाणे बॅंकॉक, चीअंग मई आणि सियम रिप हून तिथे जायच्या. पण तेव्हा तिथे विमानतळाच्या विस्ताराचे कामही चालू होते. मी तर पहिल्यांदा इतका लहान विमानतळ पाहिला होता आणि त्याच्यामुळे असेल, त्या वातावरणाला काहीतरी एक घरगुती स्पर्श होता आणि संपूर्ण वास्तव्यात तीच भावना मनात राहिली.
लुआंग प्रबांग विमानतळ, 2012 (विकीपीडिया वरून साभार) |
विमानतळावर आम्हाला घ्यायला आमच्या हॉटेल ने गाडी व ड्रायव्हर पाठवलेला होता. तो आम्हाला त्या सुंदर शहरातुन घेऊन गेला आणि अचानक एका छोट्या गल्लीच्या जवळ गाडी थांबली. तिथे दुसरा माणूस आमची वाट पाहत होता. त्याने आमचे सामान उचलले आणि चालायला सुरवात केली. त्या गल्लीतून त्याच्या मागोमाग आम्ही चालू लागलो. तिथे रस्त्यावर लाईट नाही, पूर्ण अंधार, जवळपास कुठेही मला हॉटेलची इमारत काही दिसत नव्हती. आमचे सामान घेऊन चालणारा माणूस एका बांबूच्या पुलावरून खाली उतरायला लागला. खालती एक बोट आमची वाट पाहत होती आणि हे आमच्यासाठी खरोखरीच खूप मोठे आश्चर्य होते. मला अजून आठवतंय ते आश्चर्य, चंद्रप्रकाश आणि त्या शांत वातावरणात नदीच्या पाण्याचा बोटीमुळे होणारा आवाज.
पलीकडच्या किनार्यावर आम्हाला परत अनेक पायर्या चढायला लागल्या. जवळपास आम्ही दोन तीन मजले असावे इतकी उंची चढून गेलो. पण आताचा रस्ता हॉटेलचा असल्यामुळे सुंदर दिव्यांनी उजळलेला होता. याच्याइतका सुंदर प्रवास असूच शकत नाही.. अर्थात जेव्हा तुमचे सामान दुसरे कोणी वाहून नेत असेल तेव्हा!! नाहीतर इतकी उंच चढण होती ती. म्हणजे बाबा गाडी आणि व्हीलचेअर साठी तर त्या पायऱ्या अशक्यच. पण कोणी वयस्कर किंवा आजारी माणूस असेल तर त्याच्यासाठी पण खूप अवघड. आम्ही इथेच प्रवासातला एक मोठा धडा शिकलो. जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तर तेव्हा साधारणपणे तुम्ही हॉटेल पासून त्या शहराच्या महत्त्वाच्या भागा पर्यंतचे अंतर ध्यानात घेऊन हॉटेलचं बुकिंग करता. पण तेवढे पाहणे पुरेसे नाही, तर वाटेत काही नद्या आणि डोंगर आहेत का हे पण बघायला पाहिजे!! हॉटेल खूप छान होते. लहानशा, दोन मजली, लाओ पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारती परिसरात विखुरलेल्या होत्या. नशिबाने आम्हाला वरच्या मजल्यावरची खोली मिळाली होती. कौलारू छपराची आणि बाल्कनी मधून खाली बघितल्यावर चाफ्याची झाडेच झाडे (लाओ भाषेमध्ये त्याला चंपा म्हणतात). शिवाय नदी दिसत होती, डोंगर दिसत होते आणि जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा त्या वेळेला तर चंद्र प्रकाशाची जादू या पूर्ण आसमंतावर पसरलेली होती.
चाफा - चंपा |
लाओ एअर लाईन |
दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशात आम्हाला आमच्या परिसर जास्त चांगला पाहता आला. खूपच रमणीय परिसर होता. हॉटेलच्या नदीकाठी असलेल्या रेस्टॉरंट मध्येच आम्ही नाश्ता घेतला. तुम्हाला सांगते, त्यावेळेला मेकाॅंग अशी मळकट पिवळट मातकट रंगाची होती आणि आता मी मध्यंतरी वाचले की आता मेकॉंग चा रंग बदलून निळसर हिरवट झालेला आहे. मी असे ऐकले आहे मेकाॅंग ह्या नावाची उत्पत्ती मे+ नाम+ खोंग अशी आहे. मे म्हणजे आई, नाम म्हणजे पाणी आणि खोंग म्हणजे गंगा.
हॉटेलचे नदीतीरावरील रेस्टॉरंट |
ब्रेकफास्ट टेबल वरून दिसणारे दृश्य |
ब्रेकफास्ट |
हॉटेल मधून दिसणारे एक गाव |
नजर जाईल तिकडे पाणी आणि डोंगर! |
हॉटेल मधून दिसणारे विहंगम दृश्य |
सुख! |
सुंदर वर्णन !
ReplyDeleteनेहमी सारखे सुंदर
ReplyDeleteउत्सुकता निर्माण केलीस 👌