तीर्थक्षेत्रे- आपापल्या आराध्य देवतांच्या, कुलदैवतांच्या मंदिरात सगळे जातात. आदर्श अशा राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना देखील भेटी दिल्या जातात. ह्या शिवाय प्रत्येक भारतीयाने भेट दिलीच पाहिजे अशी तीर्थक्षेत्रे म्हणजे युद्ध स्मारके. स्वतंत्र भारताने लढलेल्या युद्धांची स्मारके. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी उभारलेली गेलेली स्मारके.
का भेट द्यायची? - समूहाची स्मरणशक्ती अल्पजीवी असते ह्याचा प्रत्यय अनेकदा येतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या दिवशी सकाळी उफाळून येणारे राष्ट्रप्रेम दुपारनंतर पुसट होत होत नाहीसे होते. युद्धकथा असलेला एखादा चित्रपट आला की त्या आठवणी ताज्या होतात. ते तेवढ्यापुरतेच. प्रसार माध्यमे स्वतःच्या चष्म्यातून एखाद्या घटनेकडे पाहायला लावतात आणि प्रेक्षकांची विचारशक्ती झाकोळली जाते.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्धस्मारके पाहताना त्या घटनेची सत्य माहिती मिळते. आपले मत स्वतःच्या विचारानुसार तयार होते. आपल्या सैनिकांनी केलेला त्याग पाहून त्यांच्याविषयीच्या आदराने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. सैनिकांइतके मला जमले नाही तरी माझ्या राष्ट्राच्या सेवेसाठी, रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मला जमेल त्या पद्धतीने आणि जमेल ते सगळे मी करेन असा निश्चय मनात जागतो.
त्यामुळे युद्ध स्मारके पाहायला खरे तर शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर घेऊन जायला हवेच पण प्रत्येक भारतीय नागरिकाने देखील ती पाहिली पाहिजेत.
फक्त एक भान ही स्मारके बघताना, तिथे फोटो काढताना निश्चित बाळगले पाहिजे ते म्हणजे ही पर्यटन स्थळे नव्हेत. राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारी, स्फूर्ती जागवणारी तीर्थक्षेत्रे आहेत. त्याच गांभीर्याने तिथे वावरले पाहिजे.
कोणती पाहिली?- प्रत्यक्ष युद्ध जिथे झाले त्या स्थानाच्या जवळ उभारलेल्या युद्ध स्मारकांविषयी बोलायचे तर ह्या आधी आपण ब्लॉगपोस्ट मध्ये तवांग युद्ध स्मारकाविषयी तर वाचलेच आहे. शिवाय जैसलमेर जवळचे लोंगेवाला युद्ध स्मारक देखील मला पाहता आले आहे. आज लिहिते आहे ते नुकत्याच गेल्या महिन्यात पाहिलेल्या कारगिल युद्ध स्मारकाविषयी.
कारगिल युद्ध स्मारक - ऑपरेशन विजय स्मृतिस्थल
कारगिल युद्ध स्मारकाने सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या मनात विशेष स्थान पटकावले आहे.
द्रास जवळ तोलोलिंग टेकड्यांच्या पायथ्याशी श्रीनगर लेह रस्त्यानजीक हे स्मारक आहे. अगदी हमरस्त्यालगतच हे स्मारक आहे. म्हणताना जरी टेकड्यांच्या पायथ्याशी म्हटले तरी समुद्र सपाटीपासून साधारण नऊ हजार फूट उंचीवर हे स्थान आहे.
आम्ही काश्मीर मधील सोनमर्गहून कारगिल युद्ध स्मारकात गेलो होतो. युद्ध स्मारक पाहणे हेच आमचे उद्दिष्ट्य असल्याने आम्ही पुढे कारगिल गावात गेलो नव्हतो.
तुम्ही तुमच्या लेहलडाख ट्रीपमध्ये हे स्मारक पाहणार असाल तर लेहहून देखील तुम्हाला येत येईल. त्या वेळी आधी कारगिल गाव लागेल आणि मग स्मारक येईल.
रस्ता कसा आहे?- काश्मीरच्या बाजूने स्मारकाकडे येणारा हा रस्ता खूपच थरारक अनुभव देणारा आहे. इतक्या अवघड ठिकाणी रस्ता तयार करणाऱ्या सीमा सडक संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
अतिशय उंचावरून जाणारा चिंचोळा रस्ता, शेजारी अगदी खोल दरी आहे. खाली पाहिले की डोळे फिरतील इतकी खोल दरी आहे.
📷 कौस्तुभ पटवर्धन |
कधी पाहायचे ?- हिवाळ्यात इथे जाणे तर अशक्यच आहे. ह्या परिसरात तापमान अगदी कमी होते. बर्फामुळे रस्ते बंद होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यातच जावे लागते. साधारण मे ते ऑक्टोबर मध्ये जाणे सोयीचे असेल.
वाहनतळ?- स्मारकाच्या अगदी समोरच मोठा वाहनतळ
आहे. सरक्षेच्या कारणास्तव तुम्ही युद्धस्मारकात जाताना काहीही सामान सोबत घेऊन जाऊ शकत नाही. ते सर्व गाडीतच ठेवावे लागते.
खिशात कार्ड, पैसे घेऊन जाऊ शकता. आत एक लहानसे दुकान आहे. तिथे स्मृतिचिन्हे विकत घेण्यासाठी पैसे लागतात.
काय पहाल?- गाडीतून उतरल्यावर आपला प्रवास आणि इतर वैयक्तिक गोष्टींपासून बाजूला होऊन संपूर्ण लक्ष युद्ध स्मारकाकडे लागण्यासाठी मनोभूमिका तयार करते ते स्मारकासमोरचे हे दृश्य .
📷 कौस्तुभ पटवर्धन |
नंतर दिसते प्रवेशद्वार. इथे नाव नोंदणी केल्यावर मग आपल्याला आत जाता येते.
📷 कौस्तुभ पटवर्धन |
📷 कौस्तुभ पटवर्धन |
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताच्या इमारतीत ऑपरेशन विजयची म्हणजेच कारगिल युद्धाची माहिती देणारी एक चित्रफीत विनामूल्य दाखवली जाते. अत्यंत प्रभावी अशी ही चित्रफीत पाहून ज्याचे मन उचंबळून आले नाही असा एकही भारतीय नसेल. ती आधी बघून नंतर स्मारक बघितले तर आपल्याला स्मारक जास्त चांगले कळेल.
मध्यभागी आहेत माखनलाल चतुर्वेदी ह्यांच्या पुष्प की अभिलाषा ह्या कवितेतील काही काव्यपंक्ती.
इथे साधारण प्रत्येक तासातून एकदा, एक जवान कारगिल युद्धाची म्हणजेच ऑपरेशन विजयची समग्र माहिती देतो. इतक्या उंचीवर इतका वेळ सलग बोलणे ते देखील माईक न घेता, खड्या आवाजात हे आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी अशक्यप्राय आहे. त्या साठी शारीरिक बळाची तर आहेच, त्या शिवाय मनात धगधगत असलेल्या कर्तव्यभावनेची देखील आवश्यकता आहे.
स्मरण कुटीर -
वीरांचे फोटो, घटना कशा घडत गेल्या त्याचे वर्णन, काही वस्तू आणि प्रतिकृती ह्या सगळ्यांमुळे आठवणी जागवणारे आणि कायम आठवणीत राहणारे असेच हे संग्रहालय आहे.
वीरभूमी - अमरज्योतीच्या दुसऱ्या बाजूला आहे वीरभूमी. त्या युद्धात तसेच त्या भागात आत्तापर्यंत विविध चकमकीत, मोहिमांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे स्मरण करणारी वीरभूमी.
📷 कौस्तुभ पटवर्धन |
📷 कौस्तुभ पटवर्धन |
📷 कौस्तुभ पटवर्धन |
ह्या युद्धात भारत विजयी झाला पण त्यासाठी अनेक सैनिकांच्या प्राणांची किंमत मोजावी लागली. अनेक विशी बाविशीतील तरुण सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे ही नावे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात कोरलेली आहेतच. पण ह्यांच्याखेरीज आणखी शेकडो सैनिक धारातीर्थी पडले आहेत.
ह्या युद्धाने भारताच्या संरक्षण धोरणाला एक वेगळे आणि प्रभावी वळण दिले. युद्धे होऊच नयेत असे आपल्याला कितीही वाटत असले तरी जोपर्यंत आपल्या शेजारी देशांनांही किंवा खरेतर जगातील सर्व देशांना जोपर्यंत ते पटत नाही तोपर्यंत अतिशय भक्कम संरक्षण व्यवस्था आपल्याकडे असणे गरजेचे आहे.
ह्या युद्धस्मारकाच्या रस्त्यावरचे झोजिला पास, झिरो पॉईंट, द्रौपदी कुंड आणि प्रत्यक्ष रस्ता ह्याविषयी लिहायचे म्हटले तर ही पोस्ट खूप मोठी होईल. त्यामुळे त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहीन. ती देखील वाचायला विसरू नका!
तुमच्या काश्मीर पर्यटनात तुमच्याकडे वेळ कमी असेल तर श्रीनगरमधील एखादी बाग नाही पाहिलीत तरी काही बिघडत नाही. पण कारगिल युद्ध स्मारकाचा समावेश मात्र अवश्य करा. एक दिवस ह्यासाठी खास राखून ठेवा. जोपर्यंत तुम्ही कारगिल युद्ध स्मारक पाहत नाही तोपर्यंत तुमची काश्मीर किंवा लेह ट्रिप पूर्ण झाली असे म्हणूच नका.
"तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा आमच्या विषयी देशवासियांना सांगा आणि सांगा की त्यांचा भविष्यकाल सुरक्षित व्हावा म्हणून आम्ही आमचा वर्तमान समर्पित केला आहे. - भारतीय सैनिक "
Comments
Post a Comment