सिंगापूरमधील चांगी सगळ्यांना माहिती असते ते तिथे जगातील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक विमानतळ तिथे असल्याने. काही जणांना तिथली सुंदर चौपाटी आणि बोर्ड वॉक पण माहिती असतो. पण तिथे अजून एक गोष्ट विशेष आहे, तिथे एक जुने रामाचे मंदिर देखील आहे.
पूर्वाभिमुख मंदिर, गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असलेली देवता, तीन मंदिरांचे इथे झालेले एकत्रीकरण इतकेच त्या मंदिराचे वैशिष्ट्य नाही.
त्याच्या स्थापनेची कथा देखील विशेष आहे. ब्रिटिश भारतीय सैन्यातील एका सैनिकाने एका झाडाखाली रामाची आराधना करण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावातील लोक दर्शनाला येऊ लागले. हो! तेव्हा सिंगापूरमध्ये लहान लहान गावे, वस्त्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर,अथक धडपड करून तो सैनिक म्हणजे श्री. रामा नायडू ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून तिथे मंदिर बांधण्याची अनुमती आणि जागा मिळवण्यात यशस्वी झाले.
बांधकाम सुरु झाले. मंदिर भक्तांनी गजबजू लागले. हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवावे अशी मध्यंतरी एकदा मागणी झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण किंवा त्या भागातील विकासकामांसाठी मंदिर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे सिंगापूरमध्ये नवे नाही. अनेक मंदिरे अशी दुसऱ्या जागी हलली आहेत. सध्या ह्या मंदिरातदेखील अशी जागा बदललेली तीन मंदिरे आहेतच.
पण सुदैवाने, सर्व भक्त लोकांनी पुढाकार घेतला, स्थानिक लोक प्रतिनिधींचे सहाय्य मिळाले आणि मंदिर आपली होती तीच जागा टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले.
आज रामनवमी च्या निमित्ताने तर मंदिर भक्तांनी गजबजून गेले होते. मंदिरासमोरचा रस्ता क्रॉस करण्यासाठी प्रत्येक सिग्नल च्या वेळी भारतीय वंशाचे लोक घोळक्यांनी दिसत होते. नुसते हेच दृश्य पाहिले तर हा भारत नाही, सिंगापूर आहे हे खरेच वाटणार नाही!!
दर्शनासाठी मोठी रंग असली तरी कुठेही गडबड गोंधळ नव्हता. अनेक जण त्या व्यवस्थेसाठी काम करत होते.
विश्वरूप अंजनेयाची भव्य मूर्ती लक्षवेधक अशीच आहे.
श्रीराम, लक्ष्मण, सीता |
सहसा सिंगापूरमध्ये वैष्णव मंदिरात शिवपरिवार आढळत नाही. पण ह्या मंदिरात मात्र सर्व देवता एकत्र आढळतात.
Sree Parvathy |
Sree Shiv |
Sree Subramaniam |
इथे अर्थातच दाक्षिणात्य पद्धतीने मंदिर असल्याने कार्तिकेय म्हणजे सुब्रमणियम विवाहित आहे!
आज रामनवमीच्या निमित्ताने पूजा अर्चना होत होत्या. मंदिराच्या आवारातील एका सभामंडपात ह्या साठी खास व्यवस्था केलेली होती.
भाविक सतत दीप ओवाळून अर्पण करीत असल्याने झळाळती कोटी ज्योती ह्या अशीच अनुभूती होती.
#RamMandir #PlacesToVisitInSingapore #SreeRamarTemple #RamTempleSingapore
Comments
Post a Comment