फारा वर्षांपूर्वीची गोष्ट! 'संग नील उत्तम' शिकारीला निघाला होता. शिकारीसाठी पुढे जात जात तो एका नव्या प्रदेशात येऊन पोचला. तिथे त्याला एक अगदी वेगळाच प्राणी ओझरता दिसला. त्याला वाटले तो सिंहच आहे आणि म्हणून त्याने त्या नव्या प्रदेशाला नाव दिले 'सिंगापुरा '.
हे नाव आले होते संस्कृत शब्द सिंह आणि पुरा म्हणजे गाव, शहर ह्यावरून. सिंहपुर, सिंगापुरा!
'संग नील उत्तम' होता श्रीविजय साम्राज्याचा राजपुत्र. इतिहासाला तो 'श्री त्रि बुआना' म्हणून देखील ज्ञात आहे. श्री त्रि बुआना ही त्याची पदवी होती, अर्थ होता श्री त्रिभुवना - स्वामी तिन्ही जगांचा!
शतके लोटली. राज्यकर्ते बदलले. अनेक राजवंश प्रसिद्ध झाले आणि लुप्तदेखील झाले. सिंगापुरा अगदी मोक्याच्या जागी असल्याने मालवाहतुकीसाठी, व्यापारासाठी महत्वाचे बंदर म्हणून नावारूपाला आले.
मग सिंगापुराचे सिंगापूर कसे झाले? नेहमीप्रमाणे ह्या बदलाचे कारण होता एक ब्रिटिश अधिकारी सर थॉमस रॅफल्स. त्याने १८२२ मध्ये सिंगापुरा जिंकले आणि ब्रिटिश साम्राज्यासाठी एक व्यापारी बंदर म्हणून हा देश विकसित केला. जेते आपल्याला हवे तसे जिंकलेल्या देशाचे नाव बदलतात हे जगजाहीर आहेच.. तर असे झाले सिंगापुराचे सिंगापूर.
त्या नंतर सिंगापूरने अनेक उतार चढाव अनुभवले. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी आक्रमण केले आणि ब्रिटिशांकडून फेब्रुवारी १९४२ मध्ये सिंगापूर हिसकावून घेतले. तीन वर्षांनी चक्र फिरले, जपानला शरणागती पत्करावी लागली आणि सिंगापूर पुन्हा एकदा ब्रिटिश अंमलाखाली आले.
परिस्थिती सतत बदलत राहिली आणि अखेरीस ९ ऑगस्ट १९६५ ला सिंगापूर स्वतंत्र झाले. जरी स्वतंत्र देशाचे नाव अजूनही सिंगापुरा नसून सिंगापूरच असले तरी राष्ट्रगीतात मात्र बेरजया सिंगापुरा ( सिंगापुरा यशस्वी होवो. ) 'बेरजाया 'मलेशियन भाषेतील शब्द असून त्याचे मूळ बहुतेक संस्कृत मधील 'विजयी ' हा शब्द असावे. सिंगापुरा हा उल्लेख अजूनही एकदा येतो राष्ट्रगीतात, तो म्हणजे 'मजुला सिंगापुरा '. त्याचा अर्थ आहे सिंगापुरा सतत पुढे जात राहो, विकासमान होवो. सिंगापुरा हे नाव अशा रीतीने नागरिकांच्या मनात रुळत राहते.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत सिंगापूरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. आज सर्व उद्योगांना आपले ऑफिस सिंगापूरमध्ये असावे अशी निकड भासते. जगातील सर्वात मोठ्या मालवाहू बंदरांपैकी एक, जगभरातील प्रवाशांचे आवडते ठिकाण अशी आणि अश्या अनेक ओळखी निर्माण करून सिंगापूर, हा छोटासा लाल ठिपका जगाच्या नकाशावर अभिमानाने झळकत आहे.
सिंगापूर असा देश किंवा खरे तर असे शहर आहे, जिथे सतत काहीतरी बांधकाम चालू असते. मग ती नवीन रेल लाईन असेल, नव्या इमारती असतील किंवा प्रवाश्यांसाठी नवी आकर्षणे निर्माण करणे असेल, बांधकाम सतत चालू असते. सतत बदल हीच इथली न बदलणारी गोष्ट आहे!
Esplanade P.C. Sneha Tilak |
Merlion P.C. Sneha Tilak |
Trying to capture Singapore Skyline P.C. Sneha Tilak |
Merlion |
Reflections! |
Near Arts and Science Museum. |
Marina Bay |
Making Of Super Tree Grove (2015) |
Super Trees Grove ( 2022) |
जेव्हा सिंगापूरवर इतक्या सगळ्या ब्लॉग पोस्ट्स आत्तापर्यंत लिहिल्या गेल्या आहेत, पर्यटकांनी लिहिलेले लेख आहेत, अनेक व्हिडिओज आणि फिल्म्स आहेत, अनेक चित्रपटांतून सिंगापूर दिसलेले आहे, तेव्हा मी माझ्या ह्या सिंगापूर सिरीज मध्ये नवे काय लिहिणार असा प्रश्न पडला असेल ना?! तर मी लिहिणार आहे, माझ्या नजरेला दिसलेल्या प्रसिद्ध सिंगापूराविषयी तसेच त्यातील काही कमी प्रसिद्ध ठिकाणांविषयी... तेव्हा वाचत राहा - सिंगापूर सिरीज.
#WhatToSeeInSingapore #SingaporeTravel #GoSg #SingaporeAttractions #ExploreSingapore
खूप छान सुरुवात.
ReplyDeleteमस्त 👍
ReplyDeleteयेऊद्या नवंनवीन रंजक माहिती आणि खुसखुशीत टिप्पणी !
ReplyDeleteआता तर नक्कीच वाचणार
ReplyDeleteछान लिहिलय.
ReplyDelete