नेमेचि येतो मग पावसाळा आणि पावसाळ्यात सह्याद्रीतून प्रवास करण्याची उत्सुकता देखील! मुंबई पुणे रस्ता असो किंवा रेल्वेचा मार्ग, पावसाळ्यात हिरवा मखमली अंगरखा लेवून दिमाखात मिरवत असतात, कौतुक करून घ्यायला आपल्याला बोलावत राहतात!
गेल्या पावसाळ्यात ही दरवर्षीची परंपरा त्या दुष्ट क्रूरकर्मा कोविड १९ ने खंडित केली. पण ह्यावर्षी मात्र आम्ही दोन व्हॅक्सिनचे चिलखत घालून तयार होतो. एक महत्वाचे कारण होते डेक्कन एक्स्प्रेस ला नव्याने लावण्यात आलेला व्हिस्टा डोम. म्हणूनच पुण्याला काही काम निघताच आम्ही ती संधी लगेच साधली.
ज्यांना अजून व्हिस्टा डोम म्हणजे काय हे माहिती नाही आहे त्यांच्या साठी, व्हिस्टा डोम हा भारतीय रेल्वेने बनवलेला जागतिक दर्जाचा असा रेल्वे डबा आहे.
त्यात खास काय? तर त्यातून आजूबाजूचे दृश्य फारच सुंदर दिसते.
का? कारण त्याला भल्या मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत आणि एक काचेची केबिन देखील आहे.
खिडक्या जवळपास ५ ते सहा फूट रुंद आहेत. त्यामुळे मध्ये गज, कडा असा कसलाही अडथळा न येता, प्रवासी बाहेरची हिरवाई, डोंगर, दऱ्या, झरे, धबधबे पाहू शकतात. बाहेरचे दिसणारे दृश्य म्हणजे रेल्वे डब्यात लावलेली मोठमोठी पेंटिंग्स आहेत असा भास सतत होत राहतो!
https://youtu.be/G0p-Z6NB5LI
ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही हा व्हिस्टा डोम आतून कसा दिसतो ते पाहू शकता!
https://youtu.be/8o5w0dlUfVw
रुंद खिडक्या आणि पारदर्शक छत ह्यामुळे निसर्ग दृश्य तर मनोवेधक रित्या दिसतेच पण डब्याला एक खुलेपणा, मोकळेपणा येतो. मागे ढकलता येणाऱ्या खुर्च्या ३६० डिग्रीज मध्ये फिरवता देखील येतात.
The rotatable seats |
सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र केबिन आहे. त्यामुळे खुर्च्या फिरवत असताना सामानाचा अडथळा होत नाही.
मुंबई पुणे मुंबई प्रवास करण्याऱ्या डेक्कन एक्स्प्रेसचा हा डबा नेहमी संपूर्ण पात्रतेइतके म्हणजे ४४ प्रवासी नेतो आणतो, म्हणजे कायम पूर्ण भरलेला असतो. आरक्षण आधीच करणे नक्कीच आवश्यक आहे.
https://youtu.be/G0p-Z6NB5LI
देशातल्या अगदी थोड्या म्हणजे अगदी एका हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोग्या ट्रेन्सना असे डबे आहेत. त्यापैकी एक आपल्या डेक्कन एक्स्प्रेसला आहे ह्याचा आनंद आणि अभिमान आहे! आत्ताच जून २०२१ मध्ये सुरु झालेल्या व्हिस्टा डोम मधून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांच्या आणि झऱ्यांच्या रमणीय दृश्यामुळे हा अनुभव आणि प्रवास स्मरणीय आणि मनोरम होतो आहे.
Comments
Post a Comment