|
Lahaina Banyan tree |
|
Lahaina Banyan tree |
|
Lahaina Banyan tree |
|
Lahaina Banyan tree |
Ficus Benghalensis, मराठीत ह्याला आपण वड म्हणतो, ह्या वृक्षाचा विस्तार प्रचंड होऊ शकतो. ह्या फोटोतील वडाचे झाड आहे अमेरिकेतील हवाई बेट समूहातील माउई मधील लहाईना ह्या गावातील. भारतातील मिशनऱ्यांनी भेट दिलेले हे झाड १८७३ मध्ये इथे लावले गेले.
सप्टेंबर २०२२ मध्ये जेव्हा आम्ही लहाईनाला गेलो तेव्हा दीडशे वर्ष वय असलेल्या ह्या झाडाचा विस्तार होता साधारण ४०० मीटरपेक्षा देखील जास्त आणि उंची होती जवळपास ६० फुटा! हवाईमधील हा सर्वात मोठा वृक्ष तर आहेच पण अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृक्षांपैकी एक आहे. वडाच्या खाली झेपावणाऱ्या शेकडो पारंब्या, त्याचे कधी एकमेकांत गुंतून झालेले जाळे, तर कधी अगदी कोवळी लवलवती टोकेसगळे लक्ष खिळवून ठेवणारे असेच होते. त्यातील कितीतरी पारंब्या जमिनीत रुजून पुन्हा त्याचे मोठे वृक्ष झालेले आहेत.
ह्या झाडाला, ह्या परिसराला भेट देणे हा एक विलक्षण अनुभव होता. लहाईना गाव ज्या हवेसाठी प्रसिद्ध आहे ती गरम हवा, कडक ऊन ह्या वृक्षाखाली येताच अगदी मवाळ होऊन जाते. सुखद थंडावा अनुभवाला येतो. जमिनीवर पडलेली ऊन सावलीची जाळी, झाडाच्या खोडांवर सतत वरखाली करणाऱ्या खारी, झाडाला लागलेली लाल चुटुक फळे खाण्यासाठी येणारे वेगवेगळे पक्षी, शेकडोंच्या संख्येत असलेली कबुतरे, झाडाखालच्या बाकांवर बसलेले अनेक पर्यटक, त्यांची विविध फोटो सेशन्स ह्या सगळ्यांमुळे हा परिसर गजबजलेला आहे, जिवंत आहे.
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
बनियन कोर्ट ह्या नावाने ओळखला जाणारा हा परिसर लहाईना गावाचा केंद्रबिंदू आहे. ह्याच्या डावीकडे आहे जुने कोर्ट हाऊस, लहाईना किल्ला आणि त्याच्या पलीकडे लहाईना बंदर. उजव्या बाजूने जातो लहाईना मधील सुप्रसिद्ध फ्रंट स्ट्रीट.
हे झाड अनेक कारणांनी लक्षात राहते. भारतातून आलेले व हवाईला भेट दिले गेलेले म्हणून, ह्या जातीचे वृक्ष भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहेत म्हणून, ह्या जातीचे नावच भारताच्या नावावरून आहे म्हणून, त्याच्या सावलीची शीतलता सुखावून टाकते म्हणून, हिरव्या रंगाच्या अनेक छटा मन मोहून टाकतात म्हणून..किती कारणे सांगावीत!
|
Lahaina Banyan Court |
|
Lahaina Banyan Court |
|
Old Court House Museum - History of Banyan Tree |
जवळच असलेल्या ओल्ड कोर्ट हाऊस मधल्या म्युझियम मध्ये आपल्याला लहाईनाचा इतिहास बघायला मिळतो.
|
Old Court House |
१८५९ मध्ये बांधली गेलेली ही इमारत अनेक सरकारी ऑफिसेस, पोस्ट ऑफिस, कोर्ट म्हणून वापरली जायची. तळमजल्यावरचा प्रशस्त हॉल लहाईना मधील नागरिकांचे संध्याकाळी भेटण्याचे ठिकाण होते. ह्या इमारतीच्या तळघरात जेल होता. कोर्ट नव्या जागी गेल्यावर ही इमारत ओल्ड कोर्ट हाऊस म्हणून ओळखली जाऊ लागली. १९८५ पासून आता ही इमारत लहाईना हेरिटेज म्युझियम तसेच इतर सांस्कृतिक संस्थांसाठी वापरली जाते.
लहाईना एक ऐतिहासिक शहर आहे. कामेहमेहा राजवटीत काही वर्षे हवाईची राजधानी लहाईना येथे होती. तेव्हा ह्या ठिकाणी राजाचा राजवाडा होता. जवळच जुन्या किल्ल्याचे अवशेष जतन करून ठेवलेले आहेत.
|
Lahaina old fort |
फार पूर्वी म्हणजे हजार दीड हजार वर्षांपूर्वी लहाईना गोड्या पाण्याचे भरपूर स्रोत असलेले एक सुंदर आणि समृद्ध गाव होते. इथे मिळणारी ताजी फळे, भाज्या, धान्य खलाशांना फार आवडत असत. त्यामुळे लहाईना बंदरात नेहमीच जहाजांची ये जा असे. मऊ वाळूचा सरळ किनारा जहाजांना नांगर टाकण्यासाठी सोयीचा होता. अनेक लढायांना आणि संकटांना तोंड देऊनही गाव उभे होते.
१८०२ ते १८०३ मध्ये इथे राजा कामेहमेहा आणि त्याचे हजार सैनिक येऊन राहिले होते. युद्धामुळे विस्कटलेली जनजीवनाची घडी त्यांनी परत नीट केली. शेत जमीन लागवडीखाली आणली. ही वर्षे लहाईनाच्या इतिहासातील शांतता आणि समृद्धीचा काळ मानली जातात. लहाईनाचे जुने नाव होते लेले. लेले म्हणजे बोटीतून उतरणे. अजून एक नाव होते कैवाईकी, ज्याचा अर्थ होता लहान बंदर. लहाईनाला जगाशी संपर्काची एक खिडकी मानले जायचे कारण परदेशातून येणारे खलाशी, व्यापारी, मिशनरी, लुटेरे, आक्रमक सगळे माउई मध्ये येण्यासाठी इथेच उतरायचे.
नंतर अनेक लोक इथे येऊन वसले. नवी फळे, नवी पिके आली. उसाची लागवड देखील होऊ लागली. हवामान बदलू लागले. दिवसेंदिवस हवा जास्त उष्ण आणि कोरडी होऊ लागली. ऊन जास्त तीव्र होऊ लागले.
लहाईना मधील महत्वाचा रस्ता होता त्याचे नाव होते किंग्स रोड. राजा आणि राजपुत्रांच्या निवास स्थानाशी जाणारा रस्ता म्हणून किंग्ज रोड. आता त्याचे नाव आहे फ्रंट स्ट्रीट.
फ्रंट स्ट्रीट हे लहाईनाचे वैभव. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक किंवा दोन मजली इमारती. त्यात आर्ट गॅलरीज, कॅफेस, भेटवस्तूंची दुकाने, आईस्क्रीम, सॉर्बेटस आणि shaved ice ची दुकाने ओळीने असलेला हा रस्ता नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. तुम्ही हवाईला गेला असाल आणि Shaved ice खाल्लेला नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही हवाईला खऱ्या अर्थाने गेलाच नाही आहात!! इतकी तिथली shaved ice ची दुकाने प्रसिद्ध आहेत. Shaved ice म्हणजे काय प्रश्न पडला असेल तर तो असतो आपला बर्फाचं गोळा!
लहाईना हिस्टोरिक ट्रेल मधील अनेक महत्वाची ठिकाणे ह्या रस्त्यावर आहेत.
|
Vegan Sorbet |
|
Historic Baldwyn Museum (१८३४) |
|
View from front street |
|
View from front street |
|
View from front street |
|
Wo Hing Chinese Society Hall and Museum |
|
View from front street |
|
View from front street |
|
Master's reading room ( १८३४) |
रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे आहेत. कुकुई किंवा कॅन्डलनट हे हवाईचे राज्य झाड लहाईना मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.
लहाईनाचे हे सगळे वैभव आम्ही पाहिले ते सप्टेंबर २०२२ मध्ये. एक लहानसे सुंदर गाव म्हणून लहाईना आणि तेथील वडाच्या झाडाचा भव्य विस्तार कायम स्मरणात राहील.
आता ते लहाईना खरोखर फक्त स्मरणातच राहील, तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या आणि माझ्यासारख्या अनेक पर्यटकांच्या चिरस्मरणात राहील. ८ ऑगस्ट २०२३ ला लागलेल्या वणव्याने संपूर्ण लहाईना गाव भस्मसात झाले. केवळ १५टक्के इमारती थोड्या फार तरी बचावल्या. बाकी तर केवळ राखेचा ढीग उरला आहे.
अमेरिकेच्या इतिहासातील गेल्या शंभर वर्षातील वणव्याने लागलेली ही सर्वात भयंकर आग. आग लागल्याची सूचना देणारा सायरन वाजला नाही. लोकांना आपापली घरे दुकाने आगीने वेटाळेपर्यंत संकटाचा पत्ताच लागला नाही.
कळल्यावर गाड्या घेऊन लहाईनाच्या बाहेर जावे म्हणून सर्वजण निघाले, त्यामुळे रस्ताभर ट्रॅफिक जाम झाला. आगीच्या ज्वाळा तर वाढतच होत्या. शेवटी प्राण वाचवण्यासाठी लोकांनी समुद्रात उड्या मारल्या. तरीही खूप प्राणहानी झाली.
चक्रीवादळामुळे जोरात वारे वाहत होते. त्यामुळे आग जास्तच भडकली. लाईटचे खांब पडले. गवताने पेट घेतला. घरे दुकाने सगळे लाकडाचेच असल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. फ्रंट स्ट्रीट उजाड झाला. ऐतिहासिक इमारती नाहीश्या झाल्या. अतोनात वाताहत झाली. त्याची थरकाप उडवणारी भयंकर दृश्ये आपण सगळ्यांनी बातम्यांत पाहिली असतीलच.
ह्या बातम्या आल्या तेव्हा मनाला त्या दीडशे वर्ष जुन्या वडाच्या झाडाचीसुद्धा काळजी लागून राहिली. बातम्या आल्या की ते संपूर्ण कोळपले आहे.
त्यानंतर निसर्गप्रेमी लोक आणि वनस्पती शास्त्रज्ञ ह्यांनी अव्याहत प्रयत्न करून त्या झाडाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आतपर्यंत जळत राहिलेले खोड शांत व्हावे म्हणून ठराविक वेळाने सतत पाणी घातले गेले. ते शांत झाल्यावर मग त्याला सोसतील ती आणि तेवढी खते घातली गेली.
अजूनही लहाईनामध्ये राखेचे ढिगारे उचलण्याचे, हरवलेल्या लोकांना शोधण्याचे काम चालूच आहे. तिथे विषारी वायू, घटक द्रव्ये असण्याची शक्यता अजूनही शासनाला नाकारता येत नाही.
एक हसते खेळते सुंदर गाव नाहीसे झाले. कधीकाळी इथे एक टुमदार गाव होते असे आता आठवणीतच राहील. इमारती पुन्हा नक्कीच उभारल्या जातील. पण ते वेगळेच शहर असेल.
२०२३ च्या जागतिक पर्यटनदिनाच्या आसपास मात्र दोन चांगल्या बातम्या आल्या. त्या म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ ला म्हणजे आग लागल्यानंतर दीड महिन्याने, पहिल्यांदाच काही नागरिकांना आपली घरे कशी आहेत, काही उरले आहे का ते बघण्यासाठी लहाईना गावात जाण्याची अनुमती मिळाली.
दुसरी उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे सर्वांच्या प्रयत्नांना यश येते आहे. लहाईनाच्या सुप्रसिद्ध वडाला पालवी येते आहे.
निसर्गात विलक्षण शक्ती आहे, ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
#Lahaina #Maui #Hawaii #MauiFire #Wildfire #Cyclone #FrontStreet #LahainaBanyanTree #OldCourtHouse #BaldwynHouse #Ficus Benghalensis,
Comments
Post a Comment