ढासळलेले खांब, उडालेले छप्पर, कळसाचा पत्ताच नाही. भव्य आवारात सर्वत्र भग्न शिलाखंड पडलेले असे उध्वस्त मंदिर पाहून मन विषण्ण होते.
विस्तीर्ण आवार, तुटक्या खांबांवरची आणि भिंतीवरची कलाकुसर, मुळातले ते तीन मजली मंदिर असावे असे वाटायला लावणारी रचना, सर्वच मंदिराच्या गतवैभवाची जाणीव करून देते.
हे आहे मार्तंड सूर्य मंदिर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे संरक्षित असलेले स्मारक. पण तसे संरक्षित असल्याच्या खुणा मात्र प्रवेशद्वाराशी लावलेली पाटी सोडता कुठेही दिसत नाहीत.
कार्कोट वंशाचा राजा ललितादित्य मुक्तपीड ह्याने आठव्या शतकात ह्या मंदिराचे निर्माण केले.
राजा ललितादित्य हा काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा होता. अजिंक्य राजा म्हणून तो इतिहासाला ज्ञात आहे. त्याने अरब आक्रमणापासून तर भारताचे रक्षण केलेच शिवाय तिबेट मधील आक्रमकांपासून पण केले. इतकेच नव्हे तर आपल्या राज्याचा विस्तार पार अफगाणिस्तान तसेच सध्याच्या उजबेकिस्तान, ताजीकीस्तान, किर्गिस्तानपर्यंत केला. कवी कल्हणाने लिहिलेल्या 'राजतरंगिणी' या काश्मीरच्या इतिहास विषयक काव्यग्रंथात ललितादित्याविषयी, त्याच्या पराक्रमाविषयी गौरवपूर्ण व सविस्तर लिहिलेले आढळते. ललितादित्याने काश्मीर प्रांतात अनेक मंदिरांची निर्मिती केली. अत्यंत सुंदर शिल्पकला व स्थापत्य असलेली ही मंदिरे होती. 'मार्तंड सूर्य मंदिर' हे त्यापैकीच एक आणि प्रमुख मंदिर.
भारतातील केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात हे मंदिर आहे. पहलगाम पासून साधारण चाळीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कधीकाळी या भागाचे नाव नक्कीच मार्तंड असणार. पण सध्या मात्र ते मट्टन गाव या नावाने ओळखले जाते. एखाद्या नावाचा अपभ्रंश किती विचित्र होऊ शकतो, तो झालेला अपभ्रंश कसा रुळतो आणि आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तो तसाच कसा राहतो ह्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे.
आठव्या शतकात जेव्हा हे मंदिर निर्माण केले गेले. पण काही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की मंदिराच्या पायाचा काही भाग त्याच्याही शेकडो वर्ष आधीपासूनच आहे. म्हणजेच त्याचा अर्थ हे मंदिर आठव्या शतकापेक्षाही पुरातन आहे. जेव्हा आठव्या शतकात हे मंदिर निर्माण केले गेले तेव्हा अशा उंचीवर बनवले होते की तिथून संपूर्ण कश्मीर घाटी दिसायची.
तेव्हा काश्मिरी वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना म्हणून सुप्रसिद्ध असलेले हे मंदिर आपल्या निर्माणानंतर पाच-सहाशे वर्ष वैभवाच्या शिखरावर होते. पंधराव्या शतकात शाह मीर घराण्यातील सिकंदर राजा बुतशिकन म्हणून ओळखला जातो. बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक. सिकंदराचा समकालीन इतिहासकार हसन अली लिहितो की मंदिरातील तर सोडाच पण लोकांच्या घरातील हिंदू देवतांच्या मूर्ती देखील सिकंदराने फोडून टाकल्या. हिंदू लोकांचे जबरदस्ती धर्मांतर करून त्यांना इस्लाम धर्माचे अनुयायी केले. ज्यांनी धर्मांतर करणे मान्य केले नाही त्यांचे शिरकाण केले गेले. सिकंदराने उध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांपैकी मार्तंड सूर्य मंदिर हे एक मंदिर.
हे मंदिर इतके भव्य होते, इतकी शिल्पे कोरलेली होती, इतके मजबूत होते की ते नष्ट करण्यासाठी सिकंदराच्या माणसांना एक वर्ष लागले.
सूर्य देवतेला समर्पित असलेली देशभरात काही मोजकी मंदिरे आहेत. ओरिसातील कोणार्क आहे, गुजराथमध्ये मोढेरा आहे. उत्तर भारतात विशेष आढळत नाहीत. त्यामुळेही काश्मीरमधील हे मार्तंड सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मंदिराच्या भव्य आवारात चारी बाजूंना दीर्घा म्हणजे गॅलरी म्हणावी अशी रचना असावी. कारण त्याचे अवशेष असलेले खांब आपल्याला दिसतात. मग कदाचित ही लहान लहान मंदिरे असावीत किंवा अभ्यासाची जागा असावी किंवा नुसता मंदिर रचनेतील सौंदर्य वाढवण्याचा एक भाग असावा. या गॅलरीच्या खांबांवरची नक्षी सुंदर असावी अशी कल्पना भग्नावशेषांवरून आपल्याला येऊ शकते. हे एकूण 84 खांब आहेत असे आपल्याला माहितीपत्रकात वाचता येते.
केवळ निसर्गाचा प्रकोप असता तर कदाचित मूर्ती इतक्या वाईट अवस्थेत दिसल्या नसत्या. विकृत मनोवृत्तीच्या माणसांनी तोडून, घाव घालून, घासून त्या खराब केल्या आहेत.
मुख्य मंदिरातील गर्भगृह, त्यासमोरच सभा मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लहान खोल्या यावरून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज आपण करू शकतो. गाभारा तर अगदी सगळ्या मूर्ती नाहीश्या करून ओसाड केला आहे.
'प्रत्नकीर्तिमपावृणु' हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे बोधवाक्य आहे. आपल्याला सगळ्या संरक्षित स्मारकांच्या पाट्यांवर हे वाचायला मिळते. त्याचा अर्थ आहे की चला प्रयत्न करू या. आपल्या पूर्वजांचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोचवू या. मात्र असे प्रयत्न या मंदिराच्या संरक्षणासाठी,संवर्धनासाठी आणि संरचनेसाठी होत आहेत की नाही याचा संभ्रम पडावा अशीच स्थिती मार्तंड मंदिराची आहे.
मार्तंड मंदिर फार कमी प्रवासी कंपन्या दाखवतात. पण आपण सर्वांनी जर का आपल्या काश्मीर पर्यटनात या मंदिराचा समावेश केला, या मंदिराला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून दिली, तर कदाचित जागृती निर्माण होईल आणि मंदिराचे संगोपन, संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होतील.
नॅशनल मॉन्युमेंट अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या अधिकृत चिन्हात मार्तंड मंदिराचा समावेश असल्याची बातमी मध्ये वाचली होती पण प्राधिकरणाच्या संस्थळावर मात्र हे चिन्ह अजून आलेले दिसत नाही.
इथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येईल असे ते दृश्य होते. भंगलेल्या नात्याची कहाणी आणि मागचे उध्वस्त मंदिर.
आरकीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया - ए एस आय ची साईट पाहिली तर त्याच्यावर काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला, कारगिल, पुलवामा अशा अनेक जिल्ह्यातील मंदिरांच्या म्हणजे अर्थातच मंदिरांच्या अवशेषांची स्थळे असलेली यादी सापडते.
कधीतरी ही सर्व मंदिरे निर्धोकपणे पर्यटकांना पाहता येतील अशी आशा करूयात.
—------
काश्मीर पर्यटनासाठी सूचना
१. श्रीनगर विमानतळाच्या बाहेर आलात की पुन्हा श्रीनगर विमानतळावर जाईपर्यंत बहुतेक् सगळ्या मोबाईलना रेंज नसते हे लक्षात ठेवावे.
२. भारतात सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारत असताना काश्मीरमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही रोख रकमेचा आग्रह धरला जातो.
३. टीप घेण्याविषयी आणि ती त्यांना हवी तेवढी घेण्याविषयी सर्व सेवा पुरवणारे आग्रही असतात.
४. हे सगळे असले तरी काश्मीर अत्यंत सुंदर आहे खरोखर धरतीवरचा स्वर्ग आहे. तेव्हा नक्की पाहायलाच हवे.
एकदम मस्त.
ReplyDeleteचीड चीड होते नकारात्मक विचारांमुळे आणि उदासीनतेमुळे. कलाकार आणि कलाकारी एवढ्या विपुल प्रमाणात आपल्याकडे होती आणि आहे पण विध्वंस केला ह्या सगळ्याचा, त्याने मन विषण्ण होते.