तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हम्पी. तिसऱ्या शतकापासून ह्या शहराचे उल्लेख आहेतच. चौदाव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी. विजयनगर साम्राज्यासोबतच या शहराची देखील प्रगती झाली आणि जगातले एक अत्यंत श्रीमंत, भरभराटीला आलेले शहर म्हणून हम्पी मान्यता पावले. विदेशातून देखील व्यापारी हम्पीला येत असत.
चौदाव्या शतकाच्या आधीदेखील तिसऱ्या शतकापासून इतकेच काय, अगदी रामायण कालात देखील हम्पीचे उल्लेख आपल्याला सापडतात. अजून देखील ऋष्यमुक सारखी पर्वतांची नावे असतील किंवा पम्पा सरोवर, किष्किंधा अशी ठिकाणांची नावे असतील, आपल्याला सतत रामायणाचा संदर्भ दिसत राहतो. हनुमानाचे जन्मस्थान, राम लक्ष्मण हनुमानाला भेटले ते ठिकाण देखील ह्याच परिसरात आहे. त्यामुळे अनेक भाविक नेहमीच हम्पीला भेट देत असतात.
इतिहास संशोधकांसाठी, कलेच्या अभ्यासकांसाठी देखील हम्पी फार महत्त्वाचे आहे ते त्यातील एकाहून एक सुंदर, कोरीव काम असलेल्या मंदिरांमुळे! युनेस्कोने देखील या संपूर्ण भागाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे.
हम्पीतील खरे तर सगळीच मंदिरे पाहण्याजोगी आहेत इतकेच काय तिथल्या मोठमोठ्या, अजस्त्र शिळा देखील पाहण्याजोग्या आहेत. पण आज मी इथे लिहीणार आहे ते हम्पीतील विठ्ठल मंदिरा विषयी.
महाराष्ट्रातल्या सगळ्यांना या मंदिराविषयी एक कथा ऐकलेली आठवत असेल. आपल्याकडे कथा सांगितली जाते की संत एकनाथांचे पणजोबा, संत भानुदास मोठे अभ्यासक, कीर्तनकार आणि ईश्वरभक्त होते. विजयनगरच्या राजाने, पंढरपूरहून आपल्या राजधानीत नेलेली विठ्ठलाची मूर्ती, राजा कृष्णदेवराय यांच्याकडून भानुदास यांनी आपल्या भक्तीने पुन्हा पंढरपुरात आणली. असे म्हणतात की राजाने हम्पी मध्ये अतिशय वैभवशाली मंदिर विठ्ठलासाठी बांधले होते. पण विठोबाला पंढरपूरच्या साध्या भोळ्या भक्तांचे प्रेम जास्त मोलाचे वाटले.
तर हम्पीमध्ये विठ्ठलासाठी बांधलेले तेच हे विठ्ठल मंदिर. ' श्री विजय विठ्ठल मंदिर' असे देखील त्याला म्हटले जाते आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ते प्रसिद्ध आहे.
अनेक शतके जुने असलेल्या त्या मंदिराचे जे अवशेष आज आपल्याला पाहायला मिळतात, तेदेखील इतके भव्य, इतके सुंदर आणि आपल्या कलेने तसेच तंत्रज्ञानातील परिपूर्णतेने भारावून टाकणारे आहेत की मुळात हे मंदिर कसे असेल, त्याची आपण नक्की कल्पना करू शकतो!
हम्पीतल्या अनेक सुंदर कलापूर्ण मंदिरांपैकी सर्वात सुंदर म्हणता येईल असे हे विठ्ठल मंदिर, तुंगभद्रेच्या काठावर खूप मोठ्या क्षेत्रात वसलेले आहे. राजा देवराया दुसरा याच्या काळात ह्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि मग कृष्णदेवराय, आणि नंतरच्याही सगळ्या राजांच्या काळात मंदिर रचनेत भर घालणे सुरू राहिले. सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याचा अंत झाला, तेव्हाच हे काम थांबले. त्या वेळच्या वैभवाची अनेक वर्णने आपल्याला वाचायला मिळतात.
विठ्ठल रूपातील विष्णूला अर्पण केलेले असे हे मंदिर आहे. हंपी म्हंटल्यावर माहितीपत्रकावर किंवा कोणत्याही संस्थळावर जो फोटो येतो तो ह्या विठ्ठल मंदिरातील दगडी रथाचा! नव्या रुपये पन्नासच्या नोटेवर देखील ह्या मंदिराचा फोटो आहे!
दगडी रथ |
विठ्ठल मंदिर दगडी रथ 📷 Aniruddha |
विठ्ठल मंदिर, दगडी रथ. 📷 Commons Wikimedia |
विठ्ठल मंदिर, दगडी रथ. 📷 Commons Wikimedia |
ह्या रथावर कधीकाळी एक शिखर पण होते असे म्हणतात. याची काही दशकांपूर्वीपर्यंत चाके फिरत होती. एवढी भव्य दगडी चाके फिरणे हाच एक मोठा चमत्कार होता. लोकांनी सतत फिरवून ती चाके खराब व्हायला लागली तेव्हा शासनाने सिमेंट घालून ती चाके एकाजागी घट्ट बसवलेली आहेत.
या दगडी रथाच्या वर एक सभामंडप आहे आणि असे म्हणतात विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाचे हे मंदिर आहे. गरुडमंडपम असाही ह्या दगडी रथाचा उल्लेख केला जातो.
मंदिराच्या आवाराची कल्पना येण्यासाठी पुढील लिंकवर विडिओ नक्की बघा.
https://youtu.be/ob5wbvOtvEk
मंदिराच्या आवारात रंग मंडप, कल्याण मंडप, उत्सव मंडप अशा अनेक इमारती आहेत. शिल्पकलेचे सुंदर नमुने आपल्याला येथे बघायला मिळतात.
विठ्ठल मंदिर - शिल्पकला |
विठ्ठल मंदिर - शिल्पकला |
विठ्ठल मंदिर - शिल्पकला |
विठ्ठल मंदिर - शिल्पकला |
विठ्ठल मंदिर - शिल्पकला |
विठ्ठल मंदिर - शिल्पकला
|
इंग्रजांना या चमत्काराचा शोध घ्यावासा वाटला. दगडी खांबातून संगीत कसे उत्पन्न होते, ह्याच्याविषयी कुतूहल वाटले आणि म्हणून त्यांनी दोन खांब कापून ते उघडून पाहिले. आजही तिथे कापलेले खांब आपल्याला बघायला मिळतात.
मंदिराच्या बाहेर बाजारपेठेचे, दुकानांचे अवशेष दिसतात. लांबच लांब खांबांच्या रांगा देखील दिसतात. त्यावरून आपण कल्पना करू शकतो की एके काळी हे मंदिर किती प्रसिद्ध असेल!
https://youtu.be/COsQX84VaCw
पेट्रोल,डिझेलने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी,या मंदिराच्या आधीच एक किलोमीटर अंतरावर वर आपली वाहने ठेवायला लागतात. पण कर्नाटक पर्यटन महामंडळाने तिथे जायला एका बॅटरी कारची व्यवस्था केलेली आहे आणि तिकीट अगदी नाममात्र आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चालणाऱ्या ह्या कार खूपच सोयीच्या आहेत.
विष्णूचे मंदिर आहे, विठोबाच्या रूपातील कृष्ण आहे ह्याची खात्रीच संध्याकाळी चरून परत येणाऱ्या गायी पाहिल्यावर पटली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला विठ्ठल मूळचा महाराष्ट्रातील की कर्नाटकातील अशा चर्चा नेहमीच रंगतात. 'कानडा हो विठ्ठलु' सारखे अभंग अर्थाच्या अनेक छटा घेऊन येतात. पण त्या कोणत्याही चर्चेचा भाग न होता, हे विठ्ठल मंदिर, भारतीय शिल्पकलेचा एक अद्वितीय नमुना आहे इतके मात्र नक्की म्हणावेसे वाटते.
आताही हम्पी पाहून आल्यावर ते आपल्या स्मरणात कायमचे राहते. पूर्वी जेव्हा त्याच्या वैभवशाली रूपात होते तेव्हा तर कित्येक परदेशी व्यापारी आणि प्रवाशांनी आपापल्या दैनंदिनीत आणि पुस्तकातून हम्पीचा उल्लेख केलेला आढळून येतो आणि त्यातल्या काहींच्या मते तर हे जगातले सर्वोत्तम शहर होते!
#Vijaynagar #Hampi #Vitthal Mandir #Stone Chariot # Musical Pillars # 50rsNote #PlacesToVisitInHampi #travelphotography #hampidiaries #travel #karnataka #karnatakatourism #incredibleindia #travelkarnataka #architecture #photography #history #travelindia #temple #solotravel #unesco #unescoworldheritage #travelgram #ancient #photooftheday #hampitourism #heritage #nammakarnatakaphotographers #traveling #trip #india #wanderlust #storiesofindia #roadtrip #explore
खूप सुंदर किती सुंदर कोरीवकाम आहे. भव्य दिव्य देऊले.
ReplyDeleteधन्यवाद! अतिशय सुंदर मंदिर आहे.
Delete