राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे परकीय आक्रमक पुसून टाकायचा प्रयत्न करतात, करतातच. जगभर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. कारण त्याशिवाय त्यांना त्यांची सत्ता निर्माण करता येणार नसते. पण मग त्या त्या देशातील, देशावर प्रेम असणारे लोक काय करतात हे जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण सांगते. आपल्याला सेऊल मधील ग्यानबोक पॅलेस याच्याविषयी वाचायला हवे.
-------------
तसा पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. शेवटची इंग्लिश गाईडेड टूर चुकते की काय अशी भीती वाटायला लागली होती. अनेक कोरियन युवक युवती राजवाड्याकडे जाताना दिसत होते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक कोरियन पोशाख घातले होते. फार छान दिसत होते ते सगळे. आम्ही गेलो होतो, कोरियाच्या सार्वभौमत्वाचे मानचिन्ह असलेल्या ग्यानबोक पॅलेसला ( Gyeongbok Palace ) भेट देण्यासाठी.
तिकिटाच्या काउंटर जवळच राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचे नाव आहे ग्वान्गमन गेट.(Gwanghwamun). सेऊलच्या पुरातन इतिहासाचे प्रतीक असलेले हे प्रवेशद्वार १३९५ मध्ये बांधले गेले आहे. आज हे प्रवेशद्वार कोरियाची ओळख बनलेले आहे. कोरियाच्या वास्तुशास्त्राप्रमाणे, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, राजाने राजवाड्यात कोणत्या दिशेने आत शिरायला हवे? आत शिरताच त्याच्या नजरेला काय काय दिसायला पाहिजे, कोणत्या दिशेला दिसायला पाहिजे? हे लक्षात घेऊन हे प्रवेशद्वार बांधले गेले होते.
मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताच नजरेला त्या राजवाड्याची भव्यता दिसते, विस्तार दिसतो आणि त्या मागे असलेल्या पर्वतरांगाही दिसतात.
ग्यानबोक पॅलेस |
ग्यानबोक पॅलेस |
हानबोक - पारंपारिक पोशाख |
हानबोक - पारंपारिक पोशाख |
ग्यानबोक पॅलेस |
सिंहासन |
नक्षीदार छत |
रँक स्टोन्स |
ग्यानबोक पॅलेस |
ग्यानबोक पॅलेस |
धूर बाहेर जावा म्हणून जी चिमणी केलेली आहे तिच्या भिंतीवर कोरियन मान्यतेनुसार शुभ चिन्हे कोरलेली आहेत. अक्षय तारुण्य दर्शवणारे पाईन वृक्ष, हरीण, कासव आणि औषधी वनस्पती आहेत. दीर्घायुष्य दर्शवणारा सारस पक्षी आहे. संपत्तीचे प्रतीक असणारे वटवाघूळ आहे, दुष्ट शक्तीपासून वाचविणाऱ्या देवी देवता आहात.
शुभचिन्हे |
याखेरीज बाकी राण्या किंवा जो राज्यावर बसणार आहे त्या राजपुत्राखेरीज बाकी सगळे राजपुत्र यांच्या राहण्याच्या जागा थोड्या बाहेरच्या बाजूला आणि एका इमारतीत अनेक जणांची राहायची सोय असावी तश्या आहेत.
ह्या सर्व इमारतींपासून थोडे दूर राजाच्या राज्यकारभाराच्या जागा, खास लोकांना भेटायची जागा अशा सगळ्या इमारती आहेत. राजघराण्याची वाचनालयाची देखील एक सुंदर इमारत आहे.
राजवाड्याच्या परिसरात अनेक सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण उद्याने आहेत. काही तळी आहेत. एका मानव निर्मित तळ्यात Gyeonghoeru नावाची इमारत आहे. प्रचंड मोठ्या दगडी खांबांवर अत्यंत सुंदर लाकडी इमारत. शोभिवंत फुलझाडे, तळ्यातील नितळ पाणी, मागे दिसणारा पर्वत ह्या साऱ्यामुळे सर्वच परिसर अतिशय नयनरम्य आहे. ह्या इमारतीत शाही मेजवान्या होत असत.
Gyeonghoeru |
Gyeonghoeru |
Gyeonghoeru |
जपानी, चिनी आणि रशियन लोकांनी सतत कोरियाच्या राज्यकारभारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. ह्याच वर्चस्वाच्या चढाओढीत Empress Myung-Sung जिला Queen Min असे देखील म्हंटले जाते, तिचा 1895 मध्ये याच राजवाड्यात खूनही झाला. जपानी सैनिकांनी पद्धतशीरपणे योजना आखून हे घडवून आणले होते असे म्हणतात.
राजवाड्यातील आधीच्या बागा काढून टाकून तिथे जपानी वनस्पती लावल्या गेल्या, ज्यायोगे शासनकर्त्या जपानी अधिकाऱ्यांना त्यांच्या सवयीचे दृश्य दिसू शकेल. त्याच वेळी कोरियन चेरी ब्लॉसम काढून टाकून जपानी चेरी ब्लॉसम लावला गेला होता.
राजवाड्याची ओळख असलेले, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, कोरियन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधले गेलेले राजवाड्याचे प्रचंड मोठे मुख्य प्रवेश द्वार देखील त्याच्या मूळ जागेवर हलवून दुसरीकडे नेले गेले.
त्याचाच एक भाग म्हणून कोरियाची राजभाषा जपानी केली गेली. कोरियन लोकांना त्यांची कोरियन आडनावे सोडून जापनीज आडनावे घेण्याची सक्ती केली गेली. शाळांमधून जुनी कोरियन लिपी आणि कोरियन इतिहास शिकवायला बंदी केली गेली.
कोरियन चेरी ब्लॉसम गेला, जापनीज आला. कोरियन भाषा गेली आणि जपानी आली. राजवाड्यातील कोरियन इमारती गेल्या आणि तिथे जपानी शासकांच्या कार्यालयांच्या, प्रदर्शनांच्या, त्यांच्या निवास स्थानांच्या इमारती आल्या. राजवाड्याच्या जमीनीची मालकी देखील जपानी गव्हर्नर जनरल कडे देण्यात आली.
जपानने केले त्यात विशेष वेगळे काही नाही. सगळे आक्रमक असेच करतात. पण आता कोरिया आपली संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, करते आहे ते मात्र विशेष उल्लेखनीय आहेत.
मी सुरुवातीला लिहिले होते की पारंपरिक कोरियन पोशाख ( Hanbok ) घातलेले अनेक तरुण-तरुणी राजवाड्याकडे जाताना दिसत होते. त्याचे कारण म्हणजे कोरियाच्या सरकारने असे जाहीर केलेले आहे की जर का तुम्ही पारंपरिक कोरियन पोशाखात असाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्मारकात येताना प्रवेश फी भरावी लागणार नाही! या आमिषामुळे म्हणा किंवा उत्तेजनामुळे म्हणा, अनेक कोरियन तरुण-तरुणी, जे एरवी अत्याधुनिक पोषाखात असतात ते, अशा ठिकाणी येताना पारंपारिक पोशाखात येत असतात. त्यांची फोटोसेशन तिथे चालू असतात. आपण अगदी इतिहासकाळात आहोत असेच ते पोशाख बघून वाटत असते.
जपानी सरकारने राजवाड्याचे मुख्य प्रवेश द्वार मूळ जागेपासून हलवले होते ते आता परत मुळ जागी आणले गेले आहे. राजवाडा मूळ रूपात परत आणण्याचा एकूण चाळीस वर्षे चालणारा असा हा भव्य प्रकल्प हातात घेतला गेलेला आहे.
जपानी राजवटीची आठवण करून देणारी इथली जपानी प्रशासकीय इमारत पाडली गेली. इमारत काही लहान-सहान नव्हती. जवळपास आपल्या संसदेइतकी मोठी आणि देखणी इमारत होती ती. पण ती पाडली गेली. ह्या आवारातील इतर सर्व जपानी इमारती देखील पाडल्या गेल्या. जुने नकाशे तसेच उपलब्ध असलेली छायाचित्रे बघून कोरियन वास्तू शास्त्राप्रमाणे, पूर्वी होत्या तशाच इमारती पुन्हा बांधण्याचे काम सध्या चालू आहे.
ह्या राजवाड्यातील जपानी चेरी ब्लॉसम काढून टाकून तिथे कोरियन चेरी ब्लॉसम लावला गेला आहे. कोरियन लिपी पुनरुज्जीवित केली गेली आहे.
आम्ही २०१९ मध्ये गेलो तेव्हाही राजवाड्यात थोडे काम चालूच होते. पण ते सर्व काम पूर्ण झाले आहे असे दोन तीन वर्षांपूर्वी बातम्यात वाचल्याचे आठवते.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लक्षावधी कोरियन लोकांना पुरुषांना जपानी सैन्यात भरती केले गेले आणि लढायची सक्ती केली गेली. अक्षरशः दोन पिढ्या यात संपूर्ण गारद झाल्या. कोरियन महिलांवर तर मरण बरे असा प्रसंग ओढवला. कारण त्यांना जपानी सैनिकांच्या कम्फर्ट वूमन म्हणून सेक्स वर्करचे काम करावे लागले. त्यांच्या घरातून, गावातून पळवून नेलेल्या या स्त्रिया इतक्या अनन्वित अत्याचारांना बळी पडल्या की युद्धानंतर ना त्या घरी परतल्या, ना त्यांच्या कुटुंबाने समाजापुढे त्यांची ओळख उघड केली. अनेक वर्षे, आपली काहीही चूक नसताना त्यांनी अज्ञातवासात, विपन्नावस्थेत, रोगांशी झुंज देत काढली. अगदी अलीकडे 2015 साली जपानने आपली चूक कबूल करून, कोरियन कम्फर्ट वुमन्स च्या कल्याणासाठी एक बिलियन येन देऊ केले व त्यांची जाहीर माफी मागितली.
साऊथ कोरिया आपली छिन्नविछिन्न झालेली संस्कृती आणि देशाची मानचिन्हे आता पुनर्स्थापित करत आहे. साऊथ कोरियाची गेली सत्तर वर्ष शांततेची नव्हतीच. अनेकदा राजवट बदलली. राजवट बदलली गेली पण कोणतीही राजवट आली तरी आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याचे प्रकल्प स्थगित किंवा रद्दबातल केले गेले नाहीत हे विशेष आहे.
या एकजुटीमुळे, देशाचे भले कशात आहे याविषयीची निखळ दृष्टी असल्याने, सर्व आव्हानांवर मात करत आज कोरिया जगात एक बलाढ्य शक्ती म्हणून मानला जात आहे.
अनेक वर्षांच्या परकीय राजवटीनंतर, दुसऱ्या महायुद्धातील आघातानंतर, शिवाय एकोणीसशे पन्नास-पंचावन्नमधला दोन कोरियातील लढा व त्यानंतर झालेले अनेक उठाव, राजवटीतील बदल, संघर्ष, निदर्शने, हरताळ, त्रस्त करणारा भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देऊन आज साऊथ कोरिया जगातील एक आघाडीचे प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आलेला आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर कोरिया अव्वल स्थानावर आहे. कोरियन सौंदर्यप्रसाधने आणि वस्त्रे आज जगभरातील चोखंदळ रसिकांना हवीहवीशी वाटत आहेत. कोरियन संगीत, टीव्ही सिरीयल्स आणि चित्रपट जगभरात गाजत आहेत. क्लिष्ट मानवी स्वभावाची व वागणुकीची कोरियन दृष्टीने मीमांसा करणारा पॅरासाईट नावाचा चित्रपट इतिहास घडवून गेला आहे. आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवातून पारितोषिके मिळवलेल्या ह्या चित्रपटाने २०२०च्या अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात अनेक नामांकने, अनेक पारितोषिके तर मिळवलीच पण परकीय भाषेतला असूनदेखील उत्तम चित्रपटाचे पारितोषिक मिळवणारा गेल्या 93 वर्षातला तो पहिला चित्रपट ठरला. आत्तापर्यंत इंग्रजी खेरीज इतर कोणत्याही भाषेतल्या चित्रपटाला हे पारितोषिक मिळालेले नव्हते.
कोरियाची सर्वच क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगती ही कोरियाने आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नाला मिळालेली दाद आहे, एक शुभचिन्ह आहे. मूळांकडे परत जाताना आकाशाला घातलेली गवसणी आहे. आपली पुरातन संस्कृती, आपली मानचिन्हे ह्यांचा बळी न देताही प्रगती साधता येतेच ह्याची खूणगाठ आहे.
ग्यानबोक पॅलेस |
Comments
Post a Comment