Skip to main content

श्री क्षेत्र गिरनार

गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे. 

श्री क्षेत्र गिरनार 
काय आहे गिरनार? 

गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. 

हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव. 

जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थांकरांची मंदिरे आहेत. 

कुठे आहे गिरनार ?

गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे,तलेटी नावाचे गाव आहे. 

गिरनारला लोक का जातात?

तेथील दत्त पादुकांचे दर्शन घेणे, तेथील वातावरणातील अध्यात्मिक सामर्थ्याचा अनुभव घेणे, अंबामातेचे दर्शन घेणे, कमंडलू तीर्थाचे दर्शन घेणे, गोरक्षनाथ मंदिराचे दर्शन घेणे, इतकी अवघड शिखरे चढताना स्वतःचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य तपासून पाहणे .. ही आणि अशीच अनेक कारणे असतात. प्रत्येकाचे आपापले कारण वेगळे. पण सगळ्यांना गिरनारला जायचे असते हे खरे. 

गिरनारला मी का गेले?

नित्य पूजा अर्चा, जप, वाचन, साधना, तपस्या असे कोणते ही सामर्थ्य आणि पाठबळ माझ्याकडे नव्हते. मी तितकीशी भाविकही नव्हते. पण तरीही मनाला गिरनारची ओढ मात्र नक्की होती. कदाचित हिंदू असणाऱ्या, भारतीय असणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात अशी ओढ असेल. 

अकल्पितरित्या या दिवाळीत तो योग जुळून आला. आता परत नव्या उत्साहाने, नव्या नजरेने गिरनारची वर्णने वाचायला घेतली आणि आधी वाटले होते त्याच्यापेक्षाही अवघड आहे चढून उतरणे हे लक्षात आले. पण एक चांगले होते की आम्ही अर्धे अंतर म्हणजे अंबाजी पर्यंत रोप वे ने जाणार होतो. 

थोडीशी मानसिक तयारी आणि थोडी शारीरिक तयारी सुरू केली. थोडे चालायला, पायऱ्या चढायला सुरुवात केली. तरी जाणवत होते की ही तयारी पुरेशी नाही. 

आणि एक दिवस अचानक जाणवले की आपण कुठले तरी युद्ध जिंकायचंय अशा अस्वस्थ मनाने का तयारी करतोय? गिरनारला जाणे ही तर प्रेमाने, विश्वासाने, श्रद्धेने अगदी सहज घडून यायला हवी अशी गोष्ट आहे. तशीच आपली मानसिकता हवी. ह्या विचाराने मग मनाला खूप स्वस्थता लाभली. 

तयारी

  •  हलके आणि सुटसुटीत कपडे

  • खांद्यावर घेता येईल अशी हलकी सॅक, ज्याच्यात आवश्यक गोष्टी म्हणजे फोन, पाण्याची बाटली, रुमाल, टोपी, थोड्या गोळ्या, पैसे आणि कार्ड याची प्लास्टिकची पिशवी,पाऊस आला तर पॉन्चो, अत्यावश्यक औषधे 

  • चांगले बूट जे आपल्या सवयीचे आहेत. 

ग्रहण?

केबल कारचे सर्वात पहिले म्हणजे सकाळी सात वाजताचे ऑनलाईन बुकिंग झाले होते. 

आदल्या दिवशी दुपारी आम्ही जुनागढ ला हॉटेलमध्ये पोचलो. तिथे शेजारी असलेल्या एका ग्रुपशी सहज बोलत होते. त्यांनी सांगितले की दुसऱ्या दिवशी ग्रहण म्हणून बहुतेक मंदिर बंद आहे. सगळी मंदिरे ग्रहणाच्या दिवशी बंद असतात. 

हा तर आमच्यासाठी मोठाच धक्का होता. असे काही असते याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती आणि ज्या गिरनारसाठी एवढ्या लांबून आलो, इतका प्रवास केला त्याचे दर्शन होणार नाही??? मनात खूप चलबिचल झाली. पण मग हॉटेलच्या डेस्कवर चौकशी केली. त्या मॅनेजरने अजून दोन-तीन ठिकाणी चौकशी करून, खात्री करून घेऊन सांगितले की उद्या मंदिर बंद नाही आणि मग कुठे जीवाला शांतता वाटली!

केबल कार 

नुकतीच आम्ही बातमी वाचली होती की दिवाळीच्या वेळेला गर्दी होणार म्हणून आणि नंतर नेहमीसाठीच रोपवे मध्ये जास्तीच्या केबल कार्स लावण्यात आल्या होत्या. आम्ही खुश झालो. याचाच अर्थ तिथे लावायला लागणारी लाईन कमी झाली. कारण जरी तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं असलं तरी, तुम्हाला वेळेचा स्लॉट मिळालेला असला तरी, आत जाण्यासाठी लाईन लावायलाच लागते. 

आम्हाला असेही कळलं होतं की जरी आमचे तिकीट सात ते आठ ह्या स्लॉट चे असेल तरी सध्या दिवाळी असल्याने गर्दी होईल म्हणून थोडं लवकर सुरू करतील. त्यानुसार आम्ही तिथे सहा वाजता पोहोचलो. 

केबल कार स्टेशन अतिशय अद्ययावत आणि सुनियोजित व्यवस्था असलेले असे आहे. तिथे रेस्ट रूम्स, प्यायचे पाणी सर्व सोय आहे. सर्व स्टाफ कर्तव्यदक्ष आणि वागणुकीला नम्र आहे. 

रोप वे - प्रतिक्षा गृह 
केबल कार 

खरोखरच साडेसहाला केबल कार निघाली आणि आम्ही अंबा माता की जय म्हणत अंबाजीच्या दर्शनाला सज्ज झालो!

दिसणारी हिरवाई, डोंगर शिखरे आणि केबल कार चढत असलेला तीव्र चढ हे सर्व खूप वेगळा अनुभव देणारे असे होते. 

केबल कार मधून 
केबल कार मधून 
केबल कार मधून 
केबल कार मधून - जैन मंदिर समूह 

केबल कार मधून जैन मंदिर समूह तसेच पाण्याने भरलेली तलाव सुंदर दिसतात. आपण उतरलो आणि काही पायऱ्या चढलो की लगेचच अंबाजी मंदिर येते. मंदिरात जाण्यासाठी देखील पुन्हा अगदी उभ्या चढाच्या पायऱ्या चढायला लागतात.

आत शिरताच मनाचे शांतवन व्हावे असा अंबामातेचा सुंदर मुखवटा आहे. गोलाकार, प्रसन्न आणि तेजस्वी तांदळा बघताना आपल्यालाही अत्यंत सकारात्मक अशी ऊर्जा मिळते. 

हजारो वर्ष जुने असे हे शक्तिपीठ आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक. 

हा मुखवटा पाहताना मला अंबेजोगाईच्या कुलस्वामिनीचे स्मरण झाले आणि शांताबाई शेळके ह्यांची कविता ही आठवली, ‘अशी अचानक दिसलीस माय?’ 

हे मंदिर समुद्रसपाटीपासून साधारण तीन हजार तीनशे फूट उंचीवर आहे. पूर्वी जे भाविक संपूर्ण गिरनार पर्वत चढू शकत नसत ते निदान अंबाजीपर्यंत तरी चढायचा प्रयत्न करायचे. 

अंबाजी मंदिरापर्यंत केबल कार झाल्याने आता सर्वांची खूपच सोय झालेली आहे आणि अंबाजीचे दर्शन सर्वांसाठी सुलभ झाले आहे

अंबाजी मंदिरा शेजारीच एक छोटे दुकान आहे जिथे प्रसाद वगैरे मिळतो. तिथेच काठ्याही असतात. त्यातून निवडून एक पातळ, गुळगुळीत, हाताला तुसं लागणार नाहीत अशी आणि भक्कम काठी निवडून मी दुकानदाराला पन्नास रुपये दिले. आपण परत आलो की काठी परत करायची असते आणि मग तो वीस रुपये आपल्याला परत देतो. 

सगळ्यांनी काठी नक्की घ्यावी असेच मी सांगेन. चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला काठीचा फार उपयोग होतो. 

अंबाजी मंदिर परिसरातून 
गोरक्ष टूंक आणि गुरुशिखर 
पायऱ्या 
शक्य तितका खोल आणि दीर्घ श्वास घेत मनात सतत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा मंत्र जपत मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या बऱ्यापैकी बांधलेल्या आहेत. अधून मधून काही ठिकाणी दोन्ही बाजूला कडे नाहीत. पण इतर ठिकाणी कठडा आणि काठी असा दोन्हीचा आधार घेत मस्त पायऱ्या चढता उतरता येतात. 

गिरनार हा जाताना चढायचा आणि येताना उतरायचा असा प्रवास नाही. एक डोंगर चढून उतरायचा, दुसरा छोटा डोंगर चढून उतरायचा आणि तिसरा चढायचा असं केलं की मग आपण गुरुशिखरावर पोहोचतो. परत येताना देखील तसाच उलट्या दिशेने प्रवास. जाताना देखील पायऱ्या चढायला आणि उतरायला लागतात आणि तसेच येताना देखील पायऱ्या उतरायला आणि चढायला लागतात. त्यामुळे दोन्ही वेळेला आपल्याला एनर्जी आणि उत्साह टिकवायला हवा हे मनात पक्के होते. 

अंबाजी मंदिरानंतर थोड्या पायऱ्या गेल्यावरच पुढे पाहिले आणि समोरचे उंचच उंच शिखर आणि भोवतालच्या खोल खोल दऱ्या पाहून डोळे क्षणभर भिरभिरले, पाय लटपटले. मग ठरवलं की आपल्या पुढच्या चार पायऱ्या इतकाच आपण आत्ता विचार करूया आणि तसेच केले. मग सगळेच सोपे होऊन गेले. 

सोपे होऊन गेले असे म्हटले तरी प्रत्यक्षात अधून मधून पाय लटपटले, धाप लागली, हृदयाचे ठोके अगदी कंठाशी पडतात असं वाटून गेले. त्या त्या प्रत्येक क्षणी थोडं चालून जाऊन पुढच्या कोपऱ्यावर टेकून क्षणभर उभे राहायचे, कुठेही बसायचे नाही असं मी केलं. तशीही बसायला फारशी जागा नसतेच. कुठे कुठे बाक आहेत पण ते तुम्हाला बसायला रिकामे क्वचितच दिसतील! पायऱ्यांवरच बसू शकता. पण मला वाटते की एकदा आपण बसलो की पुन्हा उठून उभे राहून चालायला सुरुवात करायला मनाची आणि शरीराची जास्त शक्ती लागते. म्हणून पूर्ण चढून उतरून येईपर्यंत कुठेच बसले नाही. 

गोरक्ष शिखर 

त्यानंतर येते ते गोरख शिखर. 

गुरुशिखर आणि गोरक्ष शिखर 

ह्यातील निळ्या पेनने मार्क केलेले ते गोरक्ष शिखर. पिवळ्या पेन ने मार्क केलेले गुरुशिखर. 

समुद्रसपाटीपासून साधारण ३६६६फूट उंचीवर हे गोरक्षनाथ टूंक आहे. इथे गोरखनाथांच्या पादुका आहेत. शेजारीच एक धुनी आहे. त्याचे समोर एक बाबांचा आश्रम आहे. पुढे उजवीकडे एक अशी जागा आहे की जिथून सरपटत जायला लागते. पण मी इतर कुठेही न जाता पायरीवरूनच गोरखनाथांच्या पादुकांना नमस्कार केला. मनोमन त्यांच्या भक्तीला वंदन केले आणि बाकी आश्रम, पाणपोई, गुहा हे न बघता सरळ वरचा रस्ता धरला. 

कुठेही फोटो काढायची अनुमती नाही. त्यामुळे माझ्याकडे ते फोटो नाहीत. 

कमंडलू तीर्थ 

 मध्ये वाटेत दोन कमानी लागतात. त्यातली डावीकडची कमान गुरुशिखरा कडे जाते तर उजवीकडची कमांडलू तीर्थाकडे जाते. तिथे एक सतत प्रज्वलित असणारी धुनी आहे जिथे दर्शन घ्यायचे तर सोमवारी पहाटे जायला लागते. तसेच त्या तीर्थाचे पाणी पिता येते आणि तिथे सतत अन्नछत्र देखील चालू असते. त्यामुळे गिरनार चढणारे लोक प्रसाद घेण्यासाठी तिथे अवश्य जातात. 

त्या उंचावर अन्नधान्य वाहून नेणे, थंडी- वारा- पावसाची तमा न करता तिथे स्वयंपाक करणे, नैवेद्य दाखवणे हे सर्व करणाऱ्या सेवेकऱ्यांना शतशः नमन. 

या सगळ्याचा खर्च खूप आहे. रोज अन्नधान्य वर पोहोचवण्यासाठी लागणारी मजुरीच काही हजारांच्या घरात आहे असे कळले. अर्थात तिथे जाणारे लोक यथाशक्ती, यथामती शिधा किंवा दक्षिणा देऊनच मग प्रसाद ग्रहण करतात. 

दोन रस्ते -दोन कमानी 

कमंडलू तीर्थावर जाण्यासाठी काही पायऱ्या उतरायला लागतात आणि अर्थातच परत येण्यासाठी काही पायऱ्या चढायला लागतात. हा साधारण दोन्ही मिळून हजार दीड हजार पायऱ्यांचा ऐवज आहे. त्यामुळे मी ठरवले की जाताना तर आपण इथे जायचे नाही. येताना बघुयात. वाटले तर जाऊयात. 

सरळ गुरुशिखराकडे चालायला सुरुवात केली. आपल्या आजूबाजूला अनेक जण चढत असतात, उतरत असतात. शिवाय आपल्या मनात चालू असलेल्या नामस्मरणाची सोबत असते. अगदी सेकंदभरही आपण एकटे आहोत याची काळजी व भीती वाटत नाही हे इथले वैशिष्ट्य वाटले. 

वाटेत अनेक डोली वाले आपल्याला विचारतात, डोली घ्या सांगतात. हे चढणे इतके अवघड आहे, तुम्हाला त्रास होईल असेही सांगतात. त्यांच्या मनातली आपल्याविषयीची काळजी आपण समजून घ्यायची आणि त्यांना नमस्कार करायचा!

माझ्या पांढऱ्या केसांनी तर अनेकांना प्रेरणा दिली! अनेकजण ‘वो देखो! वो दादीमा भी चढ रही है! तो हम तो चढ ही सकते है!” असे आपापसात म्हणताना ऐकू येत होते. 

एक हिंदी भाषिक ताई वरपर्यंत जाऊन नमस्कार करून, घामाघूम होऊन खाली आल्या होत्या. त्या मला कळवळून सांगत होत्या,”कावड (डोली) ले लो, बहुत तकलीफ होगी आपको” किती छान होते हे! अजिबात ओळख नसलेल्या कोणी आपली काळजी करणे! माझ्या आजूबाजूला सांगलीचा एक मराठी भाषिक ग्रुप चढत होता. त्यांच्या गप्पा ही ऐकू येत होत्या एखाद दुसऱ्या वाक्याची देवाण-घेवाण होत होती. 

पायऱ्या 
पायऱ्या 

पर्वत शिखरांचा चढ अगदी कमी अंतरात आपण चढतो. त्यामुळे पायऱ्या उभ्या उभ्या आहेत. केबल कार मध्ये चढायच्या आधी जेव्हा सिक्युरिटी चेक होतो, तेव्हाच त्यांनी पाण्याची बाटली काढून घेतली होती. पण मध्ये जी छोटी दुकाने लागतात, त्यातून मी पाण्याची बाटली घेतली होती. त्याचा अगदी लहानसा घोट अधून मधून घेतला. 

गुरुशिखराच्या जवळ चपला बूट काढायला जागा नाही त्यामुळे त्याच्या आधी एक साधारण पन्नास पायऱ्या जिथे थोडी तरी जागा आहे तिथे बूट काढले. 

श्री गुरुशिखर 

जेव्हा आपण वर चढून जातो तेव्हा तिथे दत्तगुरूंची पदचिन्हे - पादुका आहेतच. त्यामागे दत्तात्रयांची एक अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य आणि पादुकांचे दर्शन, चढण्याचा सगळा शीण नाहीसा करते. 

हजारो वर्ष जुने असे हे तीर्थस्थान. इथे प्रत्यक्ष स्वतः दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली असे सांगतात. ज्या ठिकाणी श्रीराम जाऊन आले आहेत, पांडव जाऊन आले आहेत असे हे स्थान. ज्या ठिकाणी अनेक सिद्ध पुरुष तपस्या करतात असे हे स्थान. 

वर अगदी आठ दहा लोकांपुरतीच जागा आहे. तेव्हा तिथे फार वेळ न थांबता खाली आले. थोड्या पायऱ्या उतरून मग उभे राहायला जागा मिळाली तिथे टेकून आपण काय पहिले त्याचे स्मरण केले. 

तिथे क्षणभर टेकले. आजूबाजूच्या पर्वतरांगा आणि सर्व दृश्य डोळे भरून पाहून घेतले. 

परिसर 

परतीचा प्रवास सुरू झाला. जसा चढण्याचा प्रवास आहे तसाच उतरण्याचा देखील आहे. असे हे अद्भुत ठिकाण! नुसता चढ किंवा नुसता उतार कुठेच नाही. दोन्हीत म्हणजे चढामध्ये आणि उतारात, खरे तर आयुष्यातच समतोल साधला जावा याचीच जणू ही शिकवण. 

काय मिळाले? 

न सांगता, न मोजता येणारे असे तर उदंड मिळाले. सांगता येण्याजोगे सांगायचे तर काही काळासाठी का होईना पण मनाची स्थिरता मिळाली. निश्चयाचे बळ मिळाले. आत्मविश्वास वाढला. शारीरिक क्षमता वाढवल्या पाहिजेत याची चरचरीत जाणीव झाली. एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून मी जायलाच पाहिजे अशा एका ठिकाणी मला जाता आले याचा आनंद मिळाला. 

पुन्हा रोप वे स्टेशन शी - परतीचा प्रवास 


Comments

  1. मस्तच ताई, have been to junagadh, but girnar la नाही गेले

    ReplyDelete
  2. मावशी मस्त एकदम. आवडलं. मुद्देसूद मांडणी झाली आहे. 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...