अंगकोरवाट आणि बाकी मंदिरे पाहून झाल्यावर सियाम रीपहुन एक बोट राईड अवश्य घ्यायला हवी. तसेही कंबोडियात सगळीकडे पाण्याच्या कालव्यांचे जाळे असल्याने सगळीकडे पाणी दिसतच राहते. पाण्याच्या तलावात कमळे तर आहेतच! कंबोडियातील सर्वात महत्वाचे असे टोनले सॅप ( सब/सप - असा उच्चार तिथले लोक करतात. ) तळे जवळच आहे. गोड्या पाण्याचे अत्यंत विशाल असे हे तळे आणि ह्याच नावाची नदी. ऋतूनुसार हिच्या प्रवाहाची दिशा बदलते हे एक आश्चर्यच आहे. २५ डिसेंबर २०१२ ला उतरत्या दुपारी आम्ही ह्या नौकाविहाराला गेलो होतो. मेकाँगचे काय किंवा टोनले सपचे काय, पाणी अतिशय मळकट आहे. लाल माती मिसळून झालेला गढूळ रंग असावा तसे आहे. ह्या तळ्यात अनेक तरंगत्या वसाहती आहेत. गावंच म्हणा ना लहानशी. मग त्यात घरे, दुकाने सगळे काही आहे. प्रामुख्याने कोळी इथे राहत असले तरी इतरही अनेक जण राहतात. काहीजण तर जन्मभर इथेच राहिलेले आहेत. काहीजणांकडे अधिकृत कागदपत्रे कोणत्याच देशाची नसतात. असेही काहीजण इथे राहतात असे कळले. इथल्या मुलांसाठी दुसऱ्या देशातील लोकांनी सुरु केलेल्या तरंगत्या शाळा, धर्मस्थाने देखील पाहायला ...