📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती. उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते. इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...