नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह. अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली. ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे. आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...