मानवी इतिहासाच्या विशाल ग्रंथात, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातल्या अनेक देशभक्तांच्या क्रांतीगाथांची वर्णने म्हणजे पुन्हा पुन्हा वाचावे, चिंतन मनन करावे असे अध्याय बनले आहेत. काही क्रांतिवीरांनी देशात राहून काम केले तर काहींनी देशाच्या बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. असेच एक महान क्रांतिकारक म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा. त्यांचा जन्म दिनांक ४ ऑक्टोबर १८५७ ला गुजरातच्या कच्छ मधल्या मांडवी गावात झाला. क्रांतिद्रष्टा श्यामजी कृष्ण वर्मा अगदी लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा स्वर्गवास झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या श्यामजींचे शिक्षण त्यांचे ज्येष्ठ स्नेही मथुरा दास यांच्या मदतीने झाले. एक विद्वान इंग्रज मोनियर विल्यम्स हे संस्कृत इंग्रजी शब्दकोश तयार करण्यासाठी प्राच्य आणि पाश्चात्य भाषांमध्ये काम करत होते. श्यामजी कृष्ण वर्मांचे भाषा कौशल्य पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्यामजींना आपले सहाय्यक बनावे असे सुचवले. परंतु त्याआधीच स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन श्यामजींनी वैदिक धर्म आणि दर्शनाच्या प्रचारासाठी काम करण्य...