पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...