गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे. श्री क्षेत्र गिरनार काय आहे गिरनार? गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव. जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत. कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे. गिरनारला लोक का जातात? तेथील द...