अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता पैसाचा खांब. खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि लेखनिक सच्चीदानंद बाबा असे चित्र पाहिलेले होते.पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते.पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी, ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. औरंगाबादला कितीदा जाते. औरंगाबाद पासून इतक्या तर जवळ आहे नेवासा. पण जोपर्यंत तुम्ही कधीतरी जाउ या असे म्हणता तोपर्यंत जाणे होतच नाही. जेव्हा तुम्ही ह्या दिवशी जाउ या असे नक्की ठरवता तेव्हाच जायला जमते!! तर अखेर काल मी जायचे ठरवले. दादाने लगेच हो म्हटले आणि गाडी चालवली म्हणून जमले. किती वैभवाचा होता तो प्रवास!! कारण अवघी 90 वर्षे वय पूर्ण केलेली आईदेखील सोबत होती. पाउस फार झालेला नसला तरी नाशिकला पाऊस झाल्याने ऎश्वर्य...