ढासळलेले खांब, उडालेले छप्पर, कळसाचा पत्ताच नाही. भव्य आवारात सर्वत्र भग्न शिलाखंड पडलेले असे उध्वस्त मंदिर पाहून मन विषण्ण होते. विस्तीर्ण आवार, तुटक्या खांबांवरची आणि भिंतीवरची कलाकुसर, मुळातले ते तीन मजली मंदिर असावे असे वाटायला लावणारी रचना, सर्वच मंदिराच्या गतवैभवाची जाणीव करून देते. हे आहे मार्तंड सूर्य मंदिर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे संरक्षित असलेले स्मारक. पण तसे संरक्षित असल्याच्या खुणा मात्र प्रवेशद्वाराशी लावलेली पाटी सोडता कुठेही दिसत नाहीत. उघडे राहून, ऊन, पाऊस, वारा, बर्फ यांना तोंड देत हे मंदिर दरवर्षी आणखीच ढासळते आहे असे जुने फोटो पाहताना नक्कीच वाटते. मंदिराच्या आवारातील उद्यान हे स्थानिकांचे संध्याकाळी फिरायला येण्याचे किंवा सुट्टीच्या दिवशी सहलीला येण्याचे ठिकाण आहे. मंदिराच्या अवशेषांचे रक्षण करण्यासाठी कोणीही रखवालदार नसतो. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते भग्नावशेष दिवसेंदिवस अधिकच ढासळत आहेत. कार्कोट वंशाचा राजा ललितादित्य मुक्तपीड ह्याने आठव्या शतकात ह्या मंदिराचे निर्माण केले. राजा ललितादित्य हा काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत शूर आणि पराक्रमी ...