नेमेचि येतो मग पावसाळा आणि पावसाळ्यात सह्याद्रीतून प्रवास करण्याची उत्सुकता देखील! मुंबई पुणे रस्ता असो किंवा रेल्वेचा मार्ग, पावसाळ्यात हिरवा मखमली अंगरखा लेवून दिमाखात मिरवत असतात, कौतुक करून घ्यायला आपल्याला बोलावत राहतात! गेल्या पावसाळ्यात ही दरवर्षीची परंपरा त्या दुष्ट क्रूरकर्मा कोविड १९ ने खंडित केली. पण ह्यावर्षी मात्र आम्ही दोन व्हॅक्सिनचे चिलखत घालून तयार होतो. एक महत्वाचे कारण होते डेक्कन एक्स्प्रेस ला नव्याने लावण्यात आलेला व्हिस्टा डोम. म्हणूनच पुण्याला काही काम निघताच आम्ही ती संधी लगेच साधली. ज्यांना अजून व्हिस्टा डोम म्हणजे काय हे माहिती नाही आहे त्यांच्या साठी, व्हिस्टा डोम हा भारतीय रेल्वेने बनवलेला जागतिक दर्जाचा असा रेल्वे डबा आहे. त्यात खास काय? तर त्यातून आजूबाजूचे दृश्य फारच सुंदर दिसते. का? कारण त्याला भल्या मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत आणि एक काचेची केबिन देखील आहे. Vista Dome Coach खिडक्या जवळपास ५ ते सहा फूट रुंद आहेत. त्यामुळे मध्ये गज, कडा असा कसलाही अडथळा न येता, प्रवासी बाहेरची हिरवाई, डोंगर, दऱ्या, झरे, धबधबे ...